आज ते हयात नाहीत. ते कथालेखक, स्तंभलेखक. गुन्हे कथालेखन हा त्यांनी आयुष्यभर हाताळलेला साहित्य प्रकार. साधी, सरळ, सोपी भाषेत कथाचित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात हातखंडा. अनेक कथासंग्रह प्रकाशित. उपप्राचार्य ते उपसंपादक पदावर कार्य केले. उत्तम वक्तृत्व. सूत्रसंचालक.
दिवंगत प्रा. एकनाथ आबूज.
त्यांनी बीडमध्ये कल्पना प्रकाशन सुरू केलं. आम्हा नवोदितांना हक्काचा मंच मिळाला. प्रकाशक कसा असावा याच उत्तम उदाहरण. माझी पहिली कादंबरी ‘पांढरा कावळा’ त्यांनीच प्रकाशित केली. राज्य शासनाचा साने गुरूजी पुरस्कार मिळाला. त्यांना इतका आनंद झाला. घरी बोलावून माझा सन्मान केला. दादासाहेब सादोळकर सोबत होते. पुढे कादंबरीस बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचा पुरस्कार लाभला.त्यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. तीही संपली. तिसरी आवृत्तीही प्रकाशित केली. आता चौथ्या आवृत्तीसाठी सर नाहीत याची सल मनात आहे.
माझ्या लेखनाविषयी भरभरून बोलत. तो आनंद चेहर्यावर स्पष्ट दिसायचा. ‘बटाटीची धार’ हा माझा कथासंग्रहही त्यांनीच प्रकाशित केला. पुन्हा एका कादंबरीची चर्चा झाली. मी लिहिणार होतो. ते प्रकाशित करणार होते. त्यांच्या पश्चात ती अपूर्ण आहे.
त्यांच्या सहवासात घडलो आम्ही. माझ्यासह अनेक मित्रही. मित्रनगरातील घर आमच्यासाठी संकुलच होते. आज तिथे सर नाहीत. पुस्तकंही नाहीत. सुने-सुने वाटते.
साहित्यिक दिशांचे होकायंत्रच जणू ते! आठव दाटतो.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
पुण्यनगरी मध्ये पूर्वप्रकाशित
Leave a Reply