मित्रहो, नमस्कार !
जीवनात सहवास, संस्कार, हे अत्यंत महत्वाचे ठरतात. लौकिकार्थी परिचय आणी आत्मिक समाधान सुख हे आपल्या जीवनात येणाऱ्या माणसांच्या आणी सुसंस्कारांच्या जडण घड़णीवर अवलंबून असते. आणी अशी संस्कारी, विवेकी वैचारिक सुसंगत आपल्याला लाभणं हा आपला भाग्ययोग असतो. कुटुंबातील जन्मदाते हेच आपले जीवनातील आद्य गुरु तर बाह्य जीवनात आपले शिक्षक हेच आपले गुरु असतात. त्यांच्या बद्दल आपल्या मनात सदैव आदर, कृतज्ञता असणं हे अत्यंत महत्वाचं !!!
प्रत्येक जीवनात हे जन्मदाते आणी गरुवर्य असतात. . हा निसर्ग आहे. . अशा निसर्गातच ईश्वरीय अनुभूती येत असते. . त्याच ईश्वराची कृपा होत असते ! तिथे श्रद्धा असावी. . ! प्रारब्ध योग ! संचित ! कर्मभोग ! भाग्ययोग ! या बाबत आपण सतत वाच्यता करीत असतो. . पण फक्त कर्म करणे आपल्या हातात असते. . आणी तेच कर्म विवेकबुद्धिला अनुसरुन केले तर जीवन आत्मसुखद असे प्रत्ययास येते. . म्हणून उत्तम सहवास, उत्तम संस्कार, उत्तम विचार, उत्तम आचार, उत्तम सात्विक आहार, उत्तम मित्र अशा गोष्टी समृद्ध, कृतार्थ जीवनाला पोषक ठरतात. . हे खरे !!
मला माझ्या अगदी बालपणा पासुन ओळखणाऱ्या असंख्य व्यक्ती आजही आहेत. आज माझ्या सत्तरी पर्यंतचा जीवन प्रवास आणी जीवनातील सारी स्थित्यन्तरे मलाही विलक्षण अकल्पित अशी जाणवतात हे सत्य ! पण आजची समृद्ध अवस्था ही केवळ जन्मदाते, त्यांचे संस्कार, माझे गुरुवर्य, मला लाभलेला सहवास, माझे मित्र, माझे कुटुंब यांचेच श्रेय आहे असेच मी म्हणेन. !!!
बालपण हे कष्टप्रद सर्वसामान्य गरीबीत गेले, पण संस्कारामुळे जे नव्हते त्याची खंत कधी वाटली नाही. प्रत्येक गोष्टित फक्त केवळ तड़जोड करणे एवढेच शिकायला मिळाले. समाधानाची व्याख्या कळाली. सर्वांच्याच प्रेमळ सहवासान तथाकथित दुःख वेदनांची तीव्रता नगण्य वाटली. घरचे वातावरण धार्मिक त्यामुळे सात्विक संस्कार घडले. गरीबी मुळे कष्ट करावे लागले. परिस्थितिची जाणीव झाली. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक समारंभात सर्वार्थांने सहभागी होता आले, त्यातूनही खुप काही शिकता आले. जीवन घडले. .
विशेष म्हणजे खुप मोठ्ठी मोठ्ठी आदर्श माणसे भेटली त्यांचा सहवास लाभला हाच खरा भाग्ययोग !!!
काशीचे महा महोपाध्याय कै. भाऊशास्त्री वझे, इंदुरचे कै. भालचंद्रशास्त्री भारती, अकोल्याचे कै, दिक्षित शास्त्री, सांगलीचे कै. ईश्वरशास्त्री, सातारचे कै, यज्ञेश्वर केळकरशास्त्री, कै. गोविन्दस्वामी आफळे अशी अध्यात्मिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वे यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. नकळत संस्कार घड़लेच त्यातून जीवन खऱ्या अर्थाने सावरले.. !वडिलोपार्जित कष्टप्रद व्यवसाय…. बुक बाइंडिंग, रूलिंग, कंपोझिंग, छपाई… पुढे सारेच वाढले. मैन्युफैक्चरिंग ऑफ पेपर स्टेशनरी, प्रकाशन, अशा व्यवसायात सातारा, पुणे, मुंबई या परिसरात व्यवसायाची व्याप्ती वाढली. . त्यातही समाधान लाभले. प्रकाशन व्यवसायात १९३५ सालापासून वडिलांच्या कारकीर्दीपासून आज पर्यन्त सुमारे ११६५ पुस्तके छापण्याचा योग लाभला त्यातून अनेक कवी व लेखक, साहित्यिकांचा जवळून परिचय व सहवास लाभला. या सुंदर मार्गदर्शक सहवासा मुळे साहित्य स्पर्श झाला आणी मी लिहिरा झालो. . . लिहू लागलो.
आज माझी स्वत:ची १६ पुस्तके प्रकाशित आहेत, अजुन ४ पुस्तके प्रकाशित होत आहेत.
१९६३ साली साताऱ्यात जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आमच्या डेक्कन एज्यूकेशन संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूल मद्धये भरले होते त्यावेळी मी इयत्ता नव्वीत असतानाच आम्हा सर्व विद्यार्थ्यानाच बऱ्याच साहित्यिकांना भेटता आले त्यांचा सहवास लाभला. योगायोगाने मला तर कै. आचार्य अत्रे यांच्याच रूमवर स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ३ दिवस त्यांच्या सोबत राहण्याच योग आला. अनेक दिग्गज म्हणजे त्यावेळचे संमेलनाध्यक्ष बॅरिष्टर न. वि गाडगीळ, श्री. के. क्षीरसागर, राम शेवाळकर, ना. सी. फडके, अशा अनेक महारथी साहित्यिकांना पहाण्याचा आणी त्यांच्या सह्या घेण्याचा योग लाभला हे परमभाग्यच !!!. . कै. दत्तोवामन पोतदार हे तर माझ्या आईचे नातेवाईक ते आणी कै. लोककवी मनमोहन नातू व कै. गोविन्दस्वामी आफ़ळे या प्रभृती चार दिवस आमच्या घरीच मुक्कामास होते. . हा दुग्धशर्करा योग होता. हेच वातावरण माझ्या आयुष्याला पोषक ठरले होते. . नंतर पुढे कै, शांताबाई शेळके, कै. प्रा. बलवंत देशमुख, कै. आनंद यादव, कै. वि. भा. देशपांडे, कै, द. वि. केसकर (वाई), कै, नंदू होनप (संगीतकार), कै. यशवंतजी देव (संगीतकार ), कै. द. भी. कुलकर्णी, डॉ. न. म. जोशी. डॉ. अशोक कामत सर, डॉ. द. ता. भोसले सर अशा अनेक प्रभृती मला मार्गदर्शक म्हणून लाभल्या यापरते दूसरे भाग्य ते कोणते ?. . . .
या सर्वांसोबत जे जे क्षण व्यतीत झाले त्या प्रत्येक क्षणांनी माझे आयुष्य समृध्द केले आहे. . आणी एक साहित्यिक, कवी म्हणून मला बिरुद लाभले आहे. ! हाच मनस्वी आनंद आहे.
पुढील लेखांकात मी या सर्व दिग्गजांच्या सहवासात जी चर्च्या झाली त्यातून मला जे उमजले ते प्रथम कवीते बद्दल ज्येष्ठ समीक्षक कै. डॉ. द. भी. कुलकर्णी (त्यांनी मला मानस पुत्रच मानले होते. त्यामुळे त्यांचा तर मला नित्य सहवास लाभला. ) यांचे मत मांडत आहे. . !
निश्चितच नवोदित कवींना मार्गदर्शक ठरेल. . . !!!!
— © विगसा
(अध्यक्ष:- महाकवी कालीदास प्रतिष्ठान पुणे. ४११०४१ )
फोन:- ९७६६५४४९०८.
१०-११-२०१८. (बेंगलोर)
Leave a Reply