नवव्या भागात ज्या घटनांचा उल्लेख केला त्याचे कारण म्हणजे या सर्व घटनांमुळे केवळ दैवयोगामुळे मला अनेक प्रस्थापित / नवोदित / ज्येष्ठ साहित्यिक , कवी , कलावंत , विचारवंत भेटले. प्रत्येकाची आठवण मनात घर करून आहे.
मी माझ्या मुद्रण / प्रकाशन व्यवसायात दरवर्षी सुमारे 5 दिवाळी अंक छापत असे. त्यातील ज्ञानदूत हा अंक मुंबईतून निघत असे. प्रसिद्ध नोगी कंपनी (माकडछाप काळी टूथ पावडर) यांच्या तर्फे मालक कै. प.सी.बोले व कै. तारा बोले हा दिवाळी अंक प्रकाशित करत असत. त्यांचे आणि माझे खुपच जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे मुंबईतही माझ्या खुप ओळखी झाल्या.
नोगी कंपनी काढत असलेल्या ज्ञानदूत या दिवाळी अंकाची छपाईची संपूर्ण जबाबदारी अनेक वर्षे माझ्यावर होती. तो अंक हा संपूर्ण धार्मिक आणि सुसंस्कृत विषयाला वाहिलेला होता. सर्वच लेख हे दर्जेदार असत . त्याच्या प्रतिवर्षं 3 / 4 हजार प्रति काढल्या जात असत. प्रचंड मागणी असल्यामुळे सर्व अंकांचे वितरण आधीच बुक झालेले असे. इतर 4 ही दिवाळी अंक माझ्याकडेच छापले जात असत. पण प्रामुख्याने माझे संपूर्ण लक्ष हे ज्ञानदूत अंकावर असे. या अंकात अनेक मोठे , ख्यातनाम लेखक , कवी सहभागी होत असत. त्यामध्ये कै. वि.वा. शिरवाडकर, कवी गंगाधर महांबरे , कवी ग्रेस , भा. रा . तांबे , बा.सी. मर्ढेकर , अनंत काणेकर , सुमन भडभडे , कै .प्रा. मालती देसाई , कै. मच्छीन्द्र कांबळे , व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके , ज्येष्ठ रेखाचित्रकार वारंगे , कै. सुरेश हळदणकर , पी. साळगावकर , महेश अरोंदेकर असे अनेक ज्येष्ठ साहित्यिक , कवी , कलाकार या अंकात लिहीत असत. योगायोगाने मीही मुंबईत असल्यामुळे यातील काही विभूतींचा आणि माझा छान परिचय झाला होता. संपर्क असे. मला माणसे जोडणे , माणसांच्यात रहाणे आवडत असे.
एका वर्षी याच ज्ञानदूत अंकासाठी ज्ञानेश्वरी व पसायदान या लेखासाठी मला मुंबईहून एक महत्वाचा लेख अर्जन्सी असल्यामुळे तो आणण्यासाठी नाशिकला कै. तात्या म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचे कडे जावे लागले होते. त्यावेळी तात्यांनी तो लेख सांगितला व मी तो लिहून घेतल्याचे आठवते आहे. तात्यांच्या अगत्यशील स्वभावाचा अनुभव अविस्मरणीय आहे. तात्यां सारख्या सारस्वताची भेट म्हणजे एक विलक्षण आनंद आहे हे मात्र खरे आहे. लेखन मर्यादेमुळे तो अनुभव इथे सविस्तर लिहिणे मी टाळले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्वच व्यक्तींचा माझा जवळून परिचय झाला होता. कार्यक्रमात वारंवार आमची भेट होत असे. ज्ञानदूत च्या एक लेखिका कै. मालती देसाई या एसएनडीटी कॉलेज ठाणे येथे प्राचार्य होत्या त्यांचा प्रामुख्याने ज्ञानेश्वरी , तुकाराम गाथा , गीता याचा विशेष अभ्यास होता. त्या निवृत्ती , ज्ञानेश्वर , सोपान , मुक्ताबाई , तुकाराम , भगवान श्रीकृष्ण या व्यक्तिरेखेबद्दल अभ्यासात्मक बोलत असत.
मुक्ताई या विषयावर त्या पूर्वार्ध व उत्तरार्ध या भागात मनस्वी श्रवणीय बोलत असत. त्या निवृत्तीनंतर पुण्यात वास्तव्यास आल्यावर पूर्वपरीचयामुळे त्या माझ्या घरी येत असत. आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आले. माझ्या पत्नीची व त्यांची विशेष मैत्री झाली.
अनेक कार्यक्रम त्यांचे पुण्यातही झाले. त्याचे श्रेय त्या मला देत असत. माझे गुरुवर्य डॉ. द.भी. कुलकर्णी , न. म.जोशी , आनंद यादव , म. श्री. दीक्षित , डॉ. उषाताई केळकर , डॉ.अशोक कामत यांचा आणि त्यांचाही परिचय झाला होता. माझ्या घरी त्या सातत्याने येत असत त्यामुळे माझी पुस्तकांची लायब्ररी व संतचित्रे त्यांच्या सुपरिचित झाली होती. त्यांना त्या लायब्ररीत माझे एक हस्तलिखित बाउंडबुक सापडले. ( ते बाऊंडबुक म्हणजे माझ्या अगदी तरुण वयात ( कॉलेजला) असताना मी माझ्या वाचन छंदातून संग्रहित केलेल्या नोट्स होत्या).ती वही त्यावेळी तशी सर्वश्रुत होती. अनेक मित्र , मैत्रिणींनी ती वही वाचली होती.मालतीताईंनी मला विचारले की मी वाचली तर चालेल कां ? ” मी म्हटले जरूर वाचा. चार दिवसांनी मालतीताई मला म्हणाल्या “आप्पा आहो किती सुंदर हा खजिना आहे. तुम्ही अजून कां छापला नाही.? पुढे ही गोष्ट त्यांनी कै. द.भी. कुलकर्णी सरांच्या कानावरही घातली. ती वही दभी सरांनीही वाचली , सरांनी देखील मला त्या वहिचे पुस्तक जरूर छाप असे सांगितले . त्या पुस्तकाचे नावही दभी सरांनीच साहित्य शिंपल्यातील मोती असे ठेवले , एवढेच नव्हे तर त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची कल्पना देखील गुरुवर्य दभी. कुलकर्णी सरांची होती. त्यांच्याच हस्ते या माझ्या 9 व्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. एका सिद्धहस्त लेखक व समीक्षक व्यक्तीने अगदी आपलेपणाने आणि हक्काने या पुस्तक प्रकाशनाच्या कामात माझ्यासारख्या व्यक्तीला मदत करावी , मार्गदर्श करावे म्हणजे हा दैवयोगच म्हणावा लागेल.
त्या पुस्तकात कै.प्रा.मालतीताई देसाई यांचा सुंदर अभिप्राय आहे. पण एका दुर्धर आजारामुळे पुस्तक प्रकाशनाच्या आधीच त्यांचे निधन झाले ही अत्यन्त दुःखद घटना ठरली. मृत्यू ही पराधीनता आहे पण अवेळी व अकस्मात जगातून निरोप घेण्याची वेळ यावी हे मात्र दुर्दैव आहे…!!
पण आठवणी मात्र सदैव जिवंत असतात.. (लेखन सीमा)
वि.ग.सातपुते.
9766544908
२२ – ११ – २०१८.
(पुणे मुक्कामी)
Leave a Reply