या साऱ्या वातावरणामुळे आणि आवडीमुळे, डीएसके विश्वमध्येही माझी बरीच ज्येष्ठ मित्र मंडळी असल्यामुळे गुरुवर्य द.भी. कुलकर्णी सरांचेकडे माझे नित्य जाणे होत असे. अनेक ज्येष्ठ मान्यवर त्यांच्याकडे येण्यास उत्सुक असत. माझे आणी द. भी. सरांचे संबंध खुपच जवळचे आहेत हे सर्वश्रुत होते. दभी सर खवय्ये होते. हेही त्यांच्या माझ्यात साम्य होते. त्यांच्याकडे जाताना मी त्यांना फोन करत असे “सर आता येताना काय आणू? ते त्यांची फरमाईश सांगत असत. गरम वडे, कचोरी, मूगभजी भजी, सामोसे मी घेवून जात असे. त्यांच्याकडे तर गेल्यावर तर सर्वप्रकारची मिठाई असे गप्पा सोबत हीही चंगळ असे. असे सौहार्दपूर्ण आमचे मैत्रसख्य होते. कुठल्याही प्रकारचा अहंपणा सरांच्यात नव्हता! हे सरांचे वैशिष्ट्य होते.त्यामुळे मला तर त्यांच्या बाबतीत कधीच संकोच वाटला नाही. ते बरेच वेळा माझ्या घरीही येत असत. हीच गोष्ट गुरुवर्य न. म.जोशी सरांच्या बाबतीत होती. आम्ही बाहेर देखील ठराविक हॉटेल मध्ये जेवावयास जात असू. इतक्या मोकळ्या स्वभावाचे दोघेही होते.
दभी सरांच्या कडे मिठाई, नमकीन तर नम सरांच्या कडेही तोच प्रकार असे शिवाय फ्रुटस, ड्रायफ्रुटस काजू, बदाम, पिस्ता लगेच पुढे येत असे मला तर हे सारेच आवडत असे. (इतके मोकळे जवळचे संबंध होते) बहुतेक साऱ्याच प्रसिद्ध शाकाहारी हॉटेल्स मध्ये आम्ही जेवलो देखील.
आम्ही कुणी मोठे आहोत या गोष्टीचा लवलेश देखील मला यांच्यात कधी जाणवला नाही. खूप गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत पण लेखन मर्यादेमुळे ज्यास्त व्यक्त होता येत नाही. पण सारे अविस्मरणीय!
माझ्या सर्वच मित्रांच्या मनात त्यांच्या बद्दल आदर तर होताच पण त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीतिही होती. एकदा त्यांना मी ” माझी पत्नी गुजराथी आहे असे म्हटल्यावर ते पटकन म्हणाले, “हवे तमारा घेरे जमवा आवू पडशे.” मला आश्चर्य वाटले की सरांना गुजराती भाषादेखील येते आहे.
त्यांना गुजराथी पदार्थ देखील आवडत होते. ते घरी आले तरी किंवा मी त्यांना मुद्दाम बोलवतही असे. माझ्या आईचे व त्यांचे अनेक किस्से किंवा पुण्यातील जुन्या आठवणी रंगत असत. कवयित्री मंदाताई नाईक, ऍड. संध्याताई गोळे, स्मिताताई लाळे, शिरोडकर, शानभाग या कवयित्री भगिनींचेही तसेच कवी चं. गो. भालेराव, विजय हेर्लेकर, बसवेश्वर हिरेमठ अशी माझी अनेक मित्रमंडळी आम्ही त्यांचेकडे नेहमी जात असू.
साहित्य विषयक चर्चा झाली की ते अनेक साहित्यिकांच्या अनेक आठवणी सांगत असत. त्यांना आवडणाऱ्या कवींच्या कविताही ते अस्खलित म्हणून दाखवीत असत! विशेष म्हणजे साऱ्या रचना मुखोद्गत असत. मी तसेच माझे काही साहित्यिक, कवी मित्र कधी कधी आमच्या लेख किंवा काव्यरचना सरांना ऐकवित असू. छान वेळ जात असे. सरांचा सहवास म्हणजे साहित्य मेजवानी असे एकदा मी त्यांना माझी एक रचना म्हणून दाखवित होतो तेंव्हा सर म्हणाले कवीतेचं सादरीकरण जेव्हढं सुंदर लयीत तेव्हढीच कविताही सुंदर वाटते.
तू तर गातोस! मग तू सुरातच सादरीकरण करीत जा! मग मी माझ्या रचना त्यांना लयीत देखील म्हणून दाखवित असे. एकदा मी एक माझी रचना सादर केली.
मी उभा या क्षितिजी
जेथे आभाळही थांबलेले
पाऊल खुणात माझिया
माझेच मनभाव सांडलेले ।।धृ।।
वाटते मनोमनी मनभाव ते
सारे हॄदयांतरी कवटळावे
पाऊलेच माझी रुसली मजवरी
मी कुणा कुणा कुणा सांगावे
सारेच आपले ! हे सुखही आपुले
ते ! ते ! ते ! दुःखही आपुले ।।१।।
सामर्थ्य मनी अजूनही आहे
आकाशही ते धुंद पेलणारे
वाघरु या मनांतरिचे
प्रीतीने घट्ट घट्ट जखड़लेले
कुणा कुणा कुणा मी धरावे
मीच माझे हात बांधलेले ।।२।।
कसे दाखवावे शल्य अंतरीचे
मन सारे सारे रक्ताळलेले
झाले घायाळ सारे शर्थ प्रयत्नी
अंतरीचे श्वासही हे कोंडलेले
मानूनी दान त्या दयाघनचे
ढाळावे अश्रुही आनंदलेले ।।३।।
(ही तीन कडवी आहेत)
ही संपूर्ण काव्य रचना सर्व मित्रां सोबत लयीत सादरही केली.सरांना ती रचना खुपच आवडली! कधी कधी ते स्वतः एखाद्या कवीसंमेलनाच्या कार्यक्रमात मुद्दाम ही रचना मला सादर करायला सांगत असत आणि त्यावेळी बऱ्याच वेळा सर स्वतः व्यासपीठावरुन ती रचना ऐकण्यासाठी मुद्दाम श्रोत्यांच्यात जावून बसत. हा माझा दैवयोग होता!
त्यांनाही कै. कविवर्य म. म. देशपांडे यांची एक काव्यरचना खूप आवडत असे .ती त्यांना पूर्ण मुखोदगत होती ती त्यांनी म्हणून दाखविली होती. ती खालील रचना
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।१।।
व्हावे एवढे लहान
सारी मने कळो यावी
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।२।।
सर्व काही देता यावे
श्रेय राहु नये हाती
यावी लावता कपाळी
भक्ती भावनेने माती ।।३।।
फक्त मोठी असो छाती
दुःख सारे मापायाला
गळो लाज , गळो खंत
काही नको झाकायाला ।।४।।
राहु बनूनी आकाश
माझा शेवटचा श्वास
मनामनात उरावा
फक्त प्रेमाचा सुवास ।।५।।
ही कै. दभी.सरांना आवडलेली एक रचना!
सर परखड समीक्षक वृत्तीचे होते मग त्यांना जे आवडले, भावले ते निश्चितच साहित्यमूल्य निकषी असावे असे मला वाटते.
अशा अनेक घटना सरांच्या सहवासात घडत राहिल्या. त्यांनी मला मानसपुत्र मानले होते. त्यांचा साहित्यसरस्वती आशीर्वाद मला नेहमीच लाभला .
मी लिहित राहिलो. त्यांच्या बद्दल मी लिहिलेला एक लेख ” द.भी. कुलकर्णी एक साहित्य परिसस्पर्श या शीर्षकाने वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाला होता…
(पुढील सहवास भाग क्र.२४ मध्ये)
© विग.सातपुते
9766544908
दिनांक :- ५ – १२ – २०१८.
Leave a Reply