साहित्यिक सहवासाचे जे जे प्रसंग आहेत ते सर्वच लिहायला हवेत असे मनापासून वाटते. पण खूप मर्यादा पडतात आणी जसे आठवते तसे लिहिलेही जाते. कधी कधी द्विरुक्तीही होत असते. पण अशा ओघवत्या लिखाणात ते लगेच टाळता येत नाही.
बहूतेक बऱ्याच साहित्य संमेलनाला, कार्यक्रमाला आम्ही काही साहित्यिक मित्र मंडळी एकत्र जात असू. त्यात कै. दादासो मनोरे हे ज्येष्ठवृंद व्यक्तिमत्व आमच्या सोबत होते. स्वानंद विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक होते. जनसंघाचे पुण्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांचा माझा व्यवसायाच्या निमित्ताने १९६८ सालीच परिचय झाला होता. तो खूप दृढ झाला. त्यांनाही साहित्याची आवड होती. साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाला आम्ही नेहमीच बरोबर जात असू. ते हरहुन्नरी होते. एकदा दैनिक सकाळ मध्ये भाटघर धरण भरल्यामुळे त्या धरणाचे सातही दरवाजे उघडल्याचा फ्रंट पेजवरच मोठ्ठा फोटो आला होता. त्यांचा मला फोन आला “आप्पा आजचा सकाळ बघा, आपण भाटघरला पाणी बघायला जावूया.” आम्ही काही मित्रमंडळी हौस म्हणून गेलो देखील . प्रचंड जलासागराचा लोट, त्यात धुवांधार पाऊस होता. माझे एक कार्यकारी अभियंता वर्गमित्र अरविंद गोस्वामी यांचे मुळे आम्हाला तेथील रेस्ट हाऊस सहज उपलब्ध झाले होते. त्यामुळे तिथे तिथल्या खानसामा कडून यथेच्छ जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेवून आम्ही परतलो होतो. ही घटना अविस्मरणीय आहे. अशी दादां मनोरे यांच्या सारखी उत्साही मित्र मंडळी असण ही भाग्य असतं.
धायरी, वडगाव पुणे येथे साहित्य संस्था सुरू करण्यास त्यांचे प्रोत्साहन असे. आज ते नाहीत याची खंतही आहेच. तेही मला लिहिण्यास , किंवा माझ्या संतचित्रे काढण्याच्या छंदास पाठींबा देत असत. मी त्यांना माझ्या भावगंध या काव्यसंग्रहास “दादा तुम्ही प्रस्तावना लिहा असे म्हटले होते.” पण ते म्हणाले, “तो अधिकार माझा नाही. तुम्ही मा.डॉ. न.म.जोशी सर किंवा डॉ. दभी. कुलकर्णी सरांची प्रस्तावना घ्या.” पुढे मला गुरुवर्य दभी. कुलकर्णी सरांनी प्रस्तावना दिली देखील.
त्याच भावगंध या काव्यसंग्रहाला कै. गुरुवर्य डॉ.दभी. कुलकर्णी सरांनी दिलेली मुक्त प्रस्तावना मी मुद्दाम सर्वांसाठी एक आठवण म्हणून मुद्दाम आपल्या सर्वांसाठी शेअर करत आहे.
(या बद्दल अनेक मतमतांतरे होतीलही असे दभी सर म्हणाले होते.)
(भावगंध काव्यसंग्रहाला मिळालेली प्रस्तावना.)
कवीता आडवी आणि उभी
काव्य रचनेचे दोन प्रकार आहेत. एक उभी कवीता तर दूसरी आडवी कवीता. आडवी कवीता ही सर्व परिचित आहे. प्रिय आहे. ही आडवी कवीता कवीच्या हॄदयातून निघते आणी रसिक श्रोत्यांच्या हॄदयापर्यन्त पोहचते. तिथे कवी आपल्या व्यक्तिगत, लौकिक भावना अभीव्यक्त करीत असतो. अशी कवीता वाचताना आपले लक्ष कवीतेतील शब्द, तिचा छंद किंवा तिच्यातील अलंकार याचेकडे फारसे नसते; कवीचेही नसते. कवीच्या मनात एक भावना उचंबळून आलेली असते आणि त्या भावनेचाच आविष्कार करणे हीच कवीची प्रेरणा असते. भावनेचा आविष्कार झाला की, त्याला मोकळे मोकळे वाटते. कवीच्या त्या उत्कट अशा आविष्कारामुळे आपल्यालेही मन उत्कट होते.
उभी कवीता यापेक्षा तशी फारच वेगळी असते. आता अर्वाचीन काळातील उदाहरणे द्यायची तर कवी बा.सी.मर्ढेकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, कवी बी .(नारायण मुरलीधर गुप्ते), ग्रेस हे उभी कवीता लिहिणारे कवी आहेत. अशी कवीता कवीचा भावनाविष्कार नसतो किंवा सुख, दुःख, प्रेम, भय अशा भावनांचा आविष्कार नसतो. शब्दातुन एक अनुभव निर्मिती त्या त्या कवीला करावयाची असते. शब्द, प्रतिमा, अलंकार, विचार यांनी युक्त असलेली ती निर्मिती असते. तिच्याशी वाचक संवाद साधत असतो. कवीच्या व्यक्तित्वाशी नव्हे. अशी कवीता अभिव्यक्तीच्या प्रेरणेतून निर्माण होत नसते; निर्मितीच्या प्रेरणेतून निर्माण होत असते. म्हणूनच Expression is not Creation असे म्हटले जाते .
आपण एखादे संगीत ऐकतो, एखादे शिल्प पहातो तेंव्हा आपण असे काही म्हणतो कां की या गायकाला काही सांगायचे आहे? या शिल्पकाराला काही सांगायचे आहे? नाही. उभी कवीता ही या अर्थाने संगीतसदृश्य, शिल्पसदृश्य असते. आपण अशा उभ्या कवीतेचे नाते कवीच्या प्रत्यक्ष व्यक्तित्वाशी जोडत नाही; आपण त्या कवीतेशीच संवाद साधतो. आपण तिचे मन, व्यक्तित्व, चरित्र तिच्यातूनच जाणून घेतो. ती कवीता स्वतःच्याच पायावर उभी असते म्हणूनच तीला उभी कवीता म्हणावयाचे.
दोनही प्रकारच्या कवीता सुंदर असतात हे वेगळे सांगावयास नको. आडवी काव्य रचना लिहिण्यासाठी कवीचे व्यक्तित्व हे अनेक अनुभवांनी समृद्ध असावे लागते. तसेच ते व्यक्तित्वही आविष्कारातुर असावे लागते. भाषेवर त्या कवीचे सहज प्रभुत्व असावे लागते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा व्यक्तीचे व्यक्तीत्व जितके समृद्ध तितकी ही आडवी कवीता प्रभावी ठरते.
उलट उभी कवीता ही स्वतःचेच समृद्ध व्यक्तित्व घेवून अवतीर्ण होत असते. वाचकास तिचे अंतरमन जाणून घ्यावे लागते. एकाच वाचनात किंवा श्रवणात ते अंतर्मन वाचकापर्यन्त पोहचतेच असे नाही. कवी बी – मर्ढेकर – चित्रे – ग्रेस यांच्या कवीता अनेक वाचकांना गुढ किंवा दुर्बोध कां वाटतात ते आता लक्षात येईल. साध्या भाषेत सांगायचे झाले तर आडवी कवीता ही समृद्ध व्यक्तित्वातुन निर्माण व्हावी लागते; तर उभ्या कवीतेला समृद्ध व्यक्तित्व असावे लागते.
कविवर्य वि.ग.सातपुते यांची कवीता आडवी आहे. त्यांनी प्रासंगिक गरजेतून लेखन न करता अधिक उत्कटतेने व्रतस्थपणे लेखन करावे ते आहे यापेक्षाही अधीक सुंदर आणि परीणामकारक होईल.
केशवसुतांनी म्हटल्या प्रमाणे कवीता आकाशीची वीज असते तर गोविंदाग्रजांनी म्हटल्या प्रमाणे अशी वीज ज्या झाडावर पड़ते ते झाड हसत हसत मरण पत्करते. हे माझे लिखाण खरे तर तसे वाचकांसाठी नसुन मुख्यतः सर्व कवी मित्रांसाठीच आहे.
द.भी.कुलकर्णी
पुणे.
(पुढील २६ व्या भागात मीच लिहिलेला दभी एक शब्दब्रह्मी साहित्य परिस स्पर्श हा प्रसिद्ध झालेला लेख देत आहे.)
© विग.सातपुते.
9766544908
दिनांक:- ८ – १२ – २०१८.
Leave a Reply