शिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच. नम. जोशी सर मूळ ता.पाटण जिल्हा सातारा येथील शिवाय त्यांचे पुणे येथील वास्तव्य सदाशिव पेठेत. माझे गाव सातारा आणि पुण्यात सदाशिव पेठेत माझ्या मुलाचे ऑफिस.
माझे ऑफिसमध्ये नित्य जाणे आणि शिवाय नम. जोशी सर रोज सदाशिव पेठेतील नृसिंह मंदिरात रोज न चुकता येणारच. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व. सहाजिकच या साऱ्या गोष्टींनी मी त्यांच्या कडे आकर्षिलो गेलो होतो. साहित्य क्षेत्रातील ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते. महाकवी कालिदास प्रतिष्ठान धायरी वडगाव पुणे हे जेंव्हा स्थापन झाले तेंव्हा ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी त्यांनी केलेले मार्गदर्शनपर केलेले भाषण आजही स्मरणात आहे. अत्यन्त निरपेक्ष बुद्धीने मनापासून आशीर्वाद देणाऱ्या व्यक्ती सोबत असल्या की आपले सारे मनसुबे सुफल होतात आणि ही अनुभूती आम्हाला सरांच्या सोबत आली आणी आजही येते आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत आषाढस्य प्रथम दिवसे या महाकवी कालिदास जयंतीनिमित्त आम्ही जो कार्यक्रम करतो आहोत त्या प्रत्येक कार्यक्रमाला गुरुवर्य डॉ. न. म. जोशी उपस्थित राहिले आहेत. हा संस्थेचा सन्मानच आहे असे आम्ही सर्वजण मानतो. अशा थोर विभूतींचा आम्हाला सदैव सहवास लाभला आहे. हे आमचे आम्ही भाग्य समजतो.
त्यांच्या सोबत मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आहे. कै. लोककवी मनमोहन नातू यांच्याशी सरांचा खुपच घनिष्ट संबंध होता. मनमोहन नातू यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमास मी स्वतः, नम जोशी सर , कै. म.श्री .दीक्षित, कै.वि.भा.देशपांडे, मंदाताई नाईक, चं . गो. भालेराव, गणेशदादा वागदरीकर, कृष्णकांत चेके, डॉ. मधुसूदन घाणेकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी न.म. जोशी सरांनी आपल्या व्याख्यानात लोककवी मनमोहन यांच्या जीवनाबद्दलच्या ज्या आठवणी सांगितल्या त्या अगदी अविस्मरणीय होत्या.
लोककवी मनमोहन निवर्तल्यानंतर त्यांना भेटायला त्यांचे चाहते मा.सुशीलकुमार शिंदेही (मंत्री) आले होते. तो प्रसंग आणि लोककवी मनमोहन नातू यांच्या अप्रतिम रचना गुरुवर्य नम.जोशीं सरांनी ज्या सांगितल्या त्यांनी सभागृह भावुक झाले होते हे मात्र खरे. नम जोशी सर उत्तम वक्ते तर आहेतच पण त्यांच्या अंतरातील असलेली सहृदयता त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण करणारी आहे. आजही साहित्य क्षेत्रातील प्रत्येक गोष्टीसाठी, किंवा प्रत्येक कार्यक्रमासाठी मी त्यांचा सल्ला घेत असतो. ते आनंदाने देत असतात.
चार वर्षांपूर्वी आम्ही अखिल महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन घेण्याचे ठरविले होते. त्याचे कारण म्हणजे बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक श्री. बी.डी. गायकवाड यांचा मी साहित्यिक असल्यामुळे बरेच वेळा संपर्क आला. त्यांनी हा साहित्य संमेलनाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता. ते म्हणाले मा. शरद पवार साहेबांना त्या कार्यक्रमाला आपण अध्यक्ष म्हणून बोलावू, ती माझी जबाबदारी. या साहित्यसंमेलनाबाबत आम्ही म्हणजे मी, गुरुवर्य नम.जोशी सर, प्राचार्य श्याम भुरके, हेर्लेकर, भालेराव, ऍड. संध्याताई गोळे, कृष्णकांत चेके, श्रीकांत दिवशिकर, सुनील खंडेलवाल, विवेक पोटे, मा. नानासो दांगट पाटील अशा अनेक जणांनी चर्चा करून हे संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. मा. शरद पवारांना आम्ही सर्व मुंबईत जावून भेटलो देखील. सर्व नियोजन झाले परंतु मा. शरद पवार साहेबांना अचानक वेळेची अडचण निर्माण झाली व तो ठरविलेला कार्यक्रम होवू शकला नाही. पण यातून खुपच मन:स्ताप झाला खरा पण निश्चितच खूप काही शिकायला मिळाले.
पण त्यावर्षी आम्ही दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आषाढस्य प्रथम दिवसे महाकवी कालिदास जयंती हा महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचा कार्यक्रम आम्ही साजरा केला. त्यावेळी मा. शरद पवार यांचे ऐवजी अगदी योगायोगाने पुण्यातीलच एक ज्येष्ठवृंद उद्योगपती व लेखक मा.महेंद्रजी पातोडिया यांना निमंत्रित केले. त्यांनी संस्थेला केलेली निस्वार्थी मदत ही आम्हा सर्वांच्या दृष्टीने खुपच मोलाची होती.
मी स्वतः, संस्थेचे उपाध्यक्ष, प्रा. डॉ. महेंद्र ठाकुरदास, कार्याध्यक्ष श्री.काकासो. चव्हाण, सुनील खंडेलवाल, विवेक पोटे, विजय हेर्लेकर जेंव्हा मा. महेंद्रजी पातोडिया गेलो होतो तेंव्हा घडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी लिहिलेले एक पुस्तक जीवनके कंगोरे हे डॉ. महेंद्र ठाकुरदास सरांनी मला दिले होते ते मी वाचले होते. खूप सुंदर वाचनीय, संग्रही असावे असे ते पुस्तक होते ते जर उपलब्ध झाले तर आपल्या संस्थेच्या कार्यक्रमात निमंत्रित साहित्यिक, कवी यांना देता येईल असा विचार मनात आला होता. सहाजिकच मा.पातोडीया यांना अशा साहित्यिक कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेला आपण ही पुस्तके देवू शकाल कां? त्या पुस्तकांची जी योग्य किंमत असेल ती आम्ही देवू असे म्हणालो.
त्यांनी मला विचारले की तुम्हाला किती पुस्तके लागतील? तेंव्हा मी म्हणालो सर आम्हाला साधारणपणे किमान ७० पुस्तके लागतील. एका क्षणामध्ये त्यांनी त्यांच्या शिपायाला बोलावले आणि त्याला सांगितले “अरे भैया ये जीवनके कंगोरे नामकी ७० बुक्स ले आवो.” १० मिनिटात ही सर्व पुस्तके आमच्या समोर आली होती. त्यांनी ती सर्व पुस्तके आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान संस्थेला साहित्यिकांसाठी विनामूल्य देणगी म्हणून दिली होती. (मी मुद्रक प्रकाशक असल्यामुळे त्या एका पुस्तकाची किंमत किमान रु .1000/- होती हे निश्चित)
म्हणजे या दानशूर उद्योजक, लेखकाने संस्थेला रु. ७०,०००/- किमतीची पुस्तके दिली होती. हे ऋण कुठल्या शब्दात व्यक्त करावे? संस्था सदैव त्यांच्या ऋणातच आहे.
मा. महेंद्रजी पातोडिया यांना आम्ही कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून तर प्रा. श्याम भुरके यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. संस्थेच्या प्रथेप्रमाणे या दोघांचाही गुरूवर्य डॉ.नम. जोशी सरांच्या हस्ते यथोचित पुणेरी पगडी प्रदान करून सत्कार केला.
जगात अशीही निःस्वार्थीपणाने मदत करणाऱ्या, साहित्यसेवा करणाऱ्या अभ्यासू व्यक्ती असतात त्यांच्याकडून आपल्या बरेच काही शिकण्यासारखे आहे याची जाणीव होते..
वि.ग.सातपुते.
9766544908.
Leave a Reply