मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते. त्यावेळी त्यांच्याकडे कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ऍड. व्ही.एन. पाटील, शरद पवार, दादासो, जगताप, नानासो पाटील (क्रांतिवीर) कर्मवीर भाऊराव पाटील, बॅरिस्टर पीजी पाटील, कॉ. डांगे, इंदुमती पंडित (ज्योतीषाचार्य), कराडचे ऍड. आळतेकर, गृहराज्य मंत्री बाळासो देसाई, बापूजी साळुंखे, आचार्य अत्रे, शाहीर अमर शेख , ग. वा. बेहरे अशा अनेक नामवंत व्यक्ती नेहमीच येत असत. त्या सर्वानाच प्रत्यक्ष अगदी जवळून पहाण्याचा योग मला आला. गांधीमैदानावर होणारी बहुतेक सर्वच व्याख्याने मी अगदी उत्सुकतेने ऐकली.
सातारमध्ये ज्ञानविकास मंडळ म्हणून एक संस्था आहे त्याची स्थापना श्री. वि.ल.चाफेकर यांनी व श्री.बा. आचार्य यांनी केली होती.त्या संस्थेतर्फे सातत्याने नगरवाचन मंदीर सातारा येथील पाठक हॉलमध्ये अनेक नामवंत विचारवंतांची व्याख्याने होत असत. आम्ही मित्र मंडळी ती आवर्जून आवडीने ऐकत असू. सहाजिकच या सर्वांबद्दल आवड निर्माण झाली. सातारमध्ये पूर्वीपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमही होत असत. साताऱ्यात शाहूकलामंदिरातच आमची १३ नंबरची म्युनिसिपल प्राथमिक शाळा असल्यामुळे शाहूकलामंदिरात आमचा ठिय्याच असे. त्यामुळे तिथे होणारे सर्व कार्यक्रम देखील पहायला मिळाले. या आठवणी प्रचंड आहेत. त्या आता इथे लिहिणे अशक्य आहे.
मला आठवतात ते सातारचे कविवर्य अभंग आठवतात ते आमचेकडे येत असत. सातारलाही साहित्यिक , कलाकारांचा मोठा वारसा आहे.
साताऱ्यातील माझे बालमित्र श्री. संजय कोल्हटकर हे प्रख्यात ज्येष्ठ नाटककार कै. बाळ कोल्हटकर यांचे पुतणे. संजय हे पण एक हरहुन्नरी, अत्यन्त निर्भीड पत्रकार, लेखक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते. त्यांचे वडीलही कै. नारायण हरी (नानासो.) कोल्हटकर आयुर्वेदिक डॉ. असूनही त्यांनी कै. गणेश नारायण कोल्हटकर यांनी १८६७ मध्ये सुरू केलेले महाराष्ट्र मित्र हे वर्तमानपत्र चालू ठेवले. त्याची धुरा संजय यांनी सांभाळली आहे. संजय कोल्हाटकर देखील जसे उत्तम प्रभावी वक्ते, निर्भीड पत्रकार आहेत तसे लेखक असूनही त्यांनी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
आज या सातारच्या साहित्य, कला संस्कृतीचा इतिहास संजय कोल्हटकर या माझ्या मित्राशी बोलूनच खाली लिहीत आहे.महादेवशास्त्री गोविंद कोल्हटकर. जन्म : १८२२ ..मृत्यू : १८६५ .म्हणजे सातारचे एक मराठी ग्रंथकार आणि प्रभावी वक्ते. सातारा जिल्ह्यातील वाई येथे जन्म. शिक्षण वाई, पुणे व मुंबई येथे. सरकारी शिक्षणखात्यात त्यांनी अधिकारपदांवर कामे केली. इंग्रजी, मराठी, संस्कृत, ज्योतिष आणि व्याकरण या विषयांचा त्यांचा अभ्यास चांगला होता. शेक्सपिअरच्या ऑथेल्लोचे त्यांनी केलेले भाषांतर त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध होऊन मान्यता पावले (१८६७). इंग्रजी नाटकाचा मराठीतील हा पहिलाच अनुवाद. याशिवाय शिक्षणखात्यासाठी कोलंबसाचा वृत्तांत हे अनुवादित पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध केले (१८४९) व काही शालोपयोगी कवितांची भाषांतरे-रूपांतरे (उदा., प्राकृत कवितेचे पहिले पुस्तक.) महाराष्ट्रमित्र १८६७, चिंतामणराव कोल्हटकर, साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कार, बहुरूपी साठी, ख्यातनाम नाटककार कै.बाळ कोल्हटकर यांची अनेक नाटक खूप गाजली.
म. वि. कोल्हटकर यांनी सत्यकथा आणि नामांकित मासिकातून कथालेखन, केशवराव कोल्हटकर अध्यात्मिक विषयावर लेखन केले.
तसेच साताऱ्यातील इंग्रजीचे गाढे अभासक व आमचे शिक्षक कै. ऍड. पु. वा. गोवईकर हे ही उत्तम लेखक होते. त्यांचे एक प्रकाशित पुस्तक राजा छत्रपती शिवाजीमहाराज हे छापण्याची संधी मी माझ्या हलगर्जी पणामुळे हरवून बसलो ही खंत मला आजही आहे.
त्यांचे चिरंजीव कै. पद्माकर पुरुषोत्तम गोवईकर, हे देखील प्रख्यात अभिनेते, नाटककार की ज्यांनी मुंगी उडाली आकाशी ही कादंबरी तसेच घर जिव्हार ही अत्यन्त सुंदर अशी कादंबरी लिहिली. विविध नाटकं तसेच सिनेमामध्ये काम केले होते.
नाथभक्त मा.ज्येष्ठ विधिज्ञ अँड डि. व्ही देशपांडे यांनीही गोपालनाथ महाराज त्रिपुटी या विषयावर पीएचडी केली असून तो ग्रंथ मीच छापला आहे. त्यांचे व आमचे कौटुंबिक संबंध आहेत.
तसेच माझे सातारकर असलेले डेक्कन एज्यूकेशनच्या न्यू. इंग्लिश स्कुल मधील शालेय मित्र प्रा. श्याम भुरके हे देखील प्रसिद्ध साहित्यिक, उत्तम वक्ते असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचा माझा नेहमीच संपर्क असतो महाकवी कालिदास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते नेहमी असतात त्यांचे मार्गदर्शनही असते, त्यांनाही महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या लक्षणीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.
मराठी साहित्य परिषद पुणे व सातारा या संस्थेचे पदाधिकारी सामाजिक, शैक्षणिक कार्यकर्ते श्री. शिरीष चिटणीस देखील माझे मित्र आहेत.
प्राचार्य बँ. पी. जी पाटील, डॉ. यु. म पठाण (संतसाहित्याचे अभ्यासक), कै. शंकर भाऊ देसाई (मास्तर) यांनीही पुस्तके लिहिली आहेत. कै.शंकर भाऊ देसाई माझे शेजारीच असल्यामुळे त्या कुटुंबाचाच मला सहवास लाभला. (शिवाय ते ज्येष्ठ संत साहित्यिक डॉ. यु.म.पठाण हे देसाई मास्तरांचे विद्यार्थी होते.)
माझे मित्र संजय कोल्हटकर यांची देखील पत्रकार व मराठीतील प्रसार माध्यमे, काल आणि आज आणि बालकथा सहा पुस्तके, प्रकाशीत आहेत.
सातारच्या माहुलीचे प्रा. श्याम मनोहर की ज्यांनी अनेक लघुकथा, नाटके, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.हे मला ज्ञात आहे. पण सातारकर असून देखील त्यांची आजपर्यंत भेट झाली नाही हीही खंत आहे. ह.ना. आपटे, कोरेगाव,
*लक्ष्मण माने उपराकार, गो. रा. माटे, श्री. म. माटे, ह. रा. महाजनी लोकसत्ताचे प्रथम संपादक, वामन पंडित तसेच वाईचे *रवींद्र भट, शाहिर साबळे, पु. पा गोखले कराड, रा. ना. चव्हाण वाई, वसंत बापट, कविवर्य डॉ.राजेंद्र माने, कवी प्रमोद कोपर्डे हे सर्वच सातारकर साहित्यिक. यांचे साहित्य प्रकाशित झालेले आहे ही सर्वच मंडळी मला आजही आठवत आहेत.
सातारचे अत्यन्त मनमिळावू अभ्यासू तसेच मार्गदर्शक आणि सुपरिचित असे अष्टपैलू व्यक्तिमत्व , ज्येष्ठ विचारवंत , साहित्यिक आणी सामाजिक कार्यकर्ते , जगमित्र म्हणजे मा. अरुणराव गोडबोले यांचाही माझा संपर्क असतो. त्यांनी देखील विपुल लेखन केले असून या माझ्या लेखांना पुष्टी दिली आणी लिहीत रहा, कारण हे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशन आहे असे सांगितले आहे. तेही उत्तम साहित्यिक आहेतच त्यांच्याबद्दल तसेच अन्य काही साहित्याभिरुचीशी संलग्न असणाऱ्या माझ्या मित्रांच्या बाबतीत ३४ भागात लिहीत आहे. अशा या आठवणींच्या आनंदोत्सवात रमताना आनंद होतो हे मात्र निश्चित!
वि.ग.सातपुते
9766544908.
Leave a Reply