साहित्याभिरूचीची मशागत
चंदन वृक्षाच्या उपवनात एखादं बाभळीचं झाड़ जरी उगवलं तरी त्या बाभळीच्या झाडाला देखील चंदनाचा गंध येतो .! हाच सहवासाचा परिणाम असतो..!
माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीबाबत तेच घडलं !!! हा माझा दैवयोग !!
अगदी कळतय अशा वयापासुन घरात धार्मिक , सुशिक्षित वातावरण , उत्तम संस्कार ,शिस्त , काकड़ आरती , प्रातःस्मरण , भजन , प्रवचन , कीर्तन , चातुर्मासिय कार्यक्रम , घरी वारकरी संप्रदायाची परंपरा . त्यामुळे सतत लोकांची ये जा , लोकांच वास्तव्य ! या सर्वातुन खुप काही गोष्टी शिकावयास मिळाल्या. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली , सातारला ज्या प्रतापगंज पेठेत रहात होतो ती मंदिरांचीच पेठ म्हणावी लागेल…मुतालिकांचे दत्त मंदीर , पटवर्धनांचे शंकर मंदीर , आगटयांचे गोराराम मंदिर , कासरांचे महालक्ष्मी मंदिर , प्रताप मारुती मंदिर , बोधे यांचे विठ्ठल मंदीर , घाटयांचे महादेव मंदिर , पुन्हा आगट्यांचे शंकर मंदीर . नृसिंह मंदीर , कोटेश्वर मंदीर या ठिकाणी नित्य पूजा अर्च्या , धार्मिक उत्सव होत असत . आनंदी आनंद असे ..त्यामुळे प्रवचनकार ,कीर्तनकार वारकरी हे आमच्या घरीच चार चार महीने वास्तव्यास असत .भागवत पुराण , महाभारत , रामायण , भगवत गीता , विष्णू पुराण ,ज्ञानेश्वरी , गाथा , अशी अनेक ग्रन्थ पारायणे ऐकावयास मिळाली . गणेशोत्सवात गणपती बनवीणे , होणाऱ्या मेळ्या मद्धयेही गाणी म्हणणे ,नाचणे अशी अनेक कामे मित्रासोबत करावयास मिळाली .
वडिलांचा रूलिंग व बुकबाइंडिंगचा व्यवसाय होता तोही भर भाजी मंडईत तेंव्हा तिथेही सर्वक्षेत्रातील नामवंत लोकांची ये जा असते . सकाळीच तिथे गप्पाञ्चा अड्डाच असे ..त्यामुळे माझ्या वडिलांचे नाव देखील त्यांच्या मित्रांनी *गप्पेराव* ठेवले होते .. व्यवसायामुळे साहित्य क्षेत्रातील देखील बरीच मंडळी येत असत. त्यामध्ये सातारचे कवी कै .अभंग , कै, पु. वा.गोवईकर वकील , कै. स.कृ. जोशी , कै. कर्मवीर भाऊराव पाटिल , कै.विट्ठलराव सोमण , कै. भाऊकाका गोडबोले , कै. शंकरराव भिड़े वकील, कै. शंकरराव साठे , कै. कौंडिराम सावकार , कै. भाऊसाहेब जाधव (ग्रामोद्धार), कै. चंडीराम पळनिटकर , नाटककार कै . बाळ कोल्हटकर , कै. डॉ. मालशे , कै. यज्ञेश्वर केळकर शास्त्री , कै . भाऊशास्त्री अभ्यंकर , कै . अनंतराव कुलकर्णी , अण्णा कुलकर्णी , गजाननराव जोशी , शाळेतील शिक्षक , विविध क्षेत्रातीलअनेक बहुश्रुत थोर माणसे मंडईला आली की आमच्या दुकानात येत असत ..या सर्वांना देखील मला जवळून पहाता आलं ! त्यांचा सहवासही लाभला .खुप खेळकर , हसरं , विनोदी , आणी समृद्ध वातावरण होतं .
मला असणाऱ्या शिक्षकांचीही तिथे ये जा असायची , एखादेवेळी चुकुन शाळेच्या वेळेत मित्रबरोबर मैटिनी सिनेमाला गेलो तरी पंचायत व्हायची ..शिक्षक मंडईला आले तर वडिलांना विचारात काल चिरंजीव दुपारी शाळेत का आले नाहीत ..?… पंचायत होत असे ……
शाळेतही खूप वंदनीय शिक्षक भेटले . कै .पा.वि. खांडेकर सर , द्रविड़ सर , कंग्राळकर सर, काणे सर, बीसी जोगळेकर सर , बोकील , सर कै. सोमण सर , एम वाय , इत्यादि बरेच की आजही त्यांची प्रकर्षाने आठवण होते . कै. प्राचार्य दा.सी. देसाई सर तर ११ वीला वर्षभर कविवर्य भा .रा. तांबे यांचीच एक ” *मरणात खरोखर जग जगते* “कवीता शिकवित होते .
या सर्व वातावरणामुळे मला *मराठीचा* लळाच लागला …..पुढे मी पुण्यात आल्यावर दासी सरांचा मला बराच सहवास लाभला .कॉलेज मद्धये देखील मी सायन्स कॉलेजला असून देखील आर्ट कॉमर्स कॉलेज मद्धये दोनही कॉलेजचे म्हणजे प्राचार्य. उनउने सर व प्राचार्य बी एस .पाटिल यांची परवानगी घेवून कै. प्राचार्य बलवंत देशमुख तसेच आजचे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य द.ता. भोसले यांच्या मराठी तासाला आवडिने बसत असे . त्या काळातच कै. डॉ. आनंद यादव सरांचाही माझा परिचय झाला पुढे तर त्यांचा माझा दृढ संबंध आला…हे सर्व मराठी साहित्याच्या आवडीपोटीच घडले …आणी असा समृद्ध सहवास घडला …मी हळू हळू लिहू लागलो ..याच काळात माझ्या मनात साहित्य संपदेची मशागत सुरु झाली …हा योगायोगच !!!
पुढे कविवर्य ( गीतकार ) कै. द.वि. केसकर , संगीतकार चंद्रमोहन हंगेकर ,पत्रकार जयराम देसाई , कै. शांताबाई शेळके , कविमित्र ,कविवर्य सुधाकर देशपांडे , बाबासो. पुरंदरे , संगीतकार कै. नंदूजी होनप , कै. यशवंतजी देव , ज्येष्ठ भावगीत गायक कै . गजानराव वाटवे , बबनराव नावडीकर , मुंबईचे कै. सुरेश हळदणकर ( गायक ) अशा अनेक नामवंत प्रभृतींचा मार्गदर्शक सहवास लाभला . नामवंत पत्रकार कै.राजाभाऊ पाठक हे माझे सख्खे मामा पुणे वाचन मंदिराचे अध्यक्ष होते. तिथे वाचनालयात गप्पांचा अड्डा संध्याकाळी बसत असत तिथे पुण्यातले नामवंत विचारवंत प्रभृती येत असत त्यामध्ये , कै. म. श्री . दीक्षित , प्रो. हातवळणे , कै. दामुआण्णा मालवणकर, कै.श्रीकांत मोघे. कै. राजाभाऊ महाजन अशी त्यावेळची अनेक मोठ्ठी माणसं मला जवळून पहावयास मिळाली. मामांच्या बरोबर मी कधी कधी वाचनालयात जात असे. त्यामुळे अगदी सहज या सर्व परिचय होत असे. त्यातून नकळत साहित्याची आवडही निर्माण झाली. माझे आजोळ हे महात्मा फुले मंडई जवळ असल्यामुळे त्या काळचे प्रसिद्ध सांस्कृतिक , गाण्याचे कार्यक्रम , व्याख्याने सहज ऐकावयास मिळत..ती एक मेजवानीच होती.आता या सर्वाबद्दल क्रमशः पुढील भागात लिहीन..!
वि.ग.सातपुते.
9766544908.
*विगसा*
१४ – ११ – २०१८ ..
(बेंगलोर मुक्कामी)
Leave a Reply