शिवाजी यूनिव्हर्सिटीच्या सातारा येथील छ. शिवाजी कॉलेजमध्ये कै . प्राचार्य बलवंत देशमुख ,प्राचार्य द.ता. भोसले सर यांचा मी मराठीचा विद्यार्थी. तसं पाहिलं तर खऱ्या अर्थांनी त्याच कॅम्पस मध्ये असलेल्या सायन्स कॉलेजचा मी विद्यार्थी होतो. पण मला मराठीची आवड असल्यामुळे आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य कै.प्राचार्य उनउने सर व सायन्स कॉलेजचे प्राचार्य कै. बी.एस.पाटील यांची अलिखित परवानगी काढून केवळ सायन्स कॉलेजच्या प्रोफे . अय्यर सरांचा इंग्लिशचा पिरियड बंक करून कै. प्राचार्य बलवंत देशमुख सर व प्राचार्य द. ता. भोसले ( ज्येष्ठ ग्रामीण कथालेखक व ज्येष्ठ व्याख्याते ) यांच्या मराठीच्या तासाला जावून बसत होतो. या गोष्टीला प्रो. बलवंत देशमुख यांनी विरोध केला होता . त्यांनी मी सायन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे म्हणून वर्गातून अक्षरशः बाहेर काढले होते..पण पुढे तर कै. प्राचार्य बलवंत देशमुख यांनी माझ्या *आत्मरंग* या पहिल्या काव्यसंग्रहाला अत्यन्त सुंदर प्रस्तावना दिली. हे अत्यन्त अविस्मरणीय घटना आहे.
कै. आनंद यादव सरांना मी ओळखत होतो पण त्यांची प्रत्यक्षात कॉलेज संपल्यावर कधी भेट झाली नव्हती. पुण्यात मराठी साहित्य परिषदेत एका कार्यक्रमात मी मुद्दाम कै. प्रा.आनंद यादव सरांची आवर्जून भेट घेतली. सातारच्या जुन्या आठवणींची उजळणी झाली.
पुढे मी धनकवड़ी पुणे येथील त्यांच्या *भूमी* निवासस्थानी त्यांची वेळ घेवून त्यांना भेटायला जात राहिलो. ज्या रयत शिक्षण संस्थेत सर शिकले होते त्या संस्थेचाच मी विद्यार्थी आणि सरांचे समवयस्क सहाध्यायी म्हणजे माझे गुरुवर्य प्रा.बलवंत देशमुख , प्रा.द.ता.भोसले . त्यावेळच्या प्राचार्य उनउने सर , प्रा. बी.एस. पाटिल कै. प्राचार्य राम शिंदे सर व अन्य प्राध्यापक हे त्यांच्या समकालीन असल्यामुळे मी यादव सरांचा देखील विद्यार्थीच होतो ..आमच्या त्या भेटित त्यांनी त्यांचे जीवन चरित्रच उलगडुन सांगताना “मी एका शेतमजुराचा मुलगा” असे सांगून त्यांचा जीवनाचा आणि शिक्षणाचा प्रवास, हा किती हाल आपेष्टात व्यतीत झाला याची जाणीव करून दिली. माणसं *माणूस* म्हणून किती मोठ्ठी असतात हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.. त्यांच्या त्यांनी लिहिलेल्या ४० पुस्तकात त्याचे वास्तव पडसाद दिसून येतात .
यादव सर अगदी नम्र , अगदी साधी रहाणी , अगत्यशील , मार्गदर्शक प्रवृत्ती असलेलं समृद्ध व्यक्तिमत्व. माझे अनेक वेळ त्यांचे कड़े जाणे झाले . माझ्या वास्तव आणी ऋणानुबंध हे दोनही कथा संग्रह त्यांनी वाचले होते. त्यातील वास्तव रेखाटन त्यांना खूप भावले होते . कुठलेही लेखन हे वास्तव असले तर ते ज्यास्त भावते असेच ते सांगत असत .मी कवी, लेखक, मुद्रक ,प्रकाशक , संपादक आहे हे त्यांना माहिती होते पण मी चित्रकारही आहे आणि मी संतचित्रे ऑइलपेंट मध्ये रेखाटतो आहे हे त्यांना कळल्यावर ते माझ्या घरी मुद्दाम माझा *संतदरबार* पहाण्यास आले होते तेंव्हा योगायोगाने *कै.डॉ.द.भी. कुलकर्णी* (ज्येष्ठ समीक्षक व पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष) तसेच *डॉ. दामोदर खडसे (ज्येष्ठ हिंदी या अनुवादक, कवी)* हे देखील आलेले होते.तेंव्हा मी म्हणालो “सर मी प्रत्येक संतांची अगदी थोडक्यात म्हणजे १६ पेजेस माहिती व त्या सोबत हे मी काढलेले संतचित्र असे *”सकल संत चित्र चरित्र गाथा”* या नावाने पुस्तकही लिहितो आहे ! त्यासाठी आपले व दभी. सरांचेही मार्गदर्शन मला हवे आहे ..!!! तेंव्हा म्हणाले, “अरे विग ,आम्ही तुझ्या या कार्यात सदैव पाठीशी आहोतच ..या प्रसंगी माझी ९१ वर्षाची आई देखील होती . डॉ. दभी. कुलकर्णी , मध्ये माझी आई व आनंद यादव यांचा एक सुंदर एकत्रित फोटोही माझ्या संग्रही आहे .हाही योगच !
कै. आनंद यादव सरांचा माझा सतत संपर्क असे , फोन असे , मी त्यांचे कड़े जात असे .२००९ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते . त्यामुळे महाबळेश्वरलाही आम्ही माझ्या गाडीतून आदल्या दिवशी बरोबर जाण्याचेही ठरले होते. त्या अनुषंगाने दूरदर्शनवर जेंव्हा त्यांची मुलाखत त्यांच्याच घरी झाली तेंव्हा मी माझे मित्र प्रा .गिरीश बक्षी , रमेशचंद्र पाठक , विजय हेर्लेकर ही मंडळी त्यांच्या घरी त्या मुलाखतीत देखील हजर होतो .. पण पुढे त्यांच्या *संतसूर्य* या कादंबरीतील आक्षेपार्ह मजकुरामुळे वाद झाला व त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदापासुन दूर रहावे लागले .. ! हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
ते उत्तम लेखक होते अनेक पुरस्कार , मानसन्मान त्यांना मिळाले होते. त्यांच्या एका कादंबरीवर *नटरंग* हा मराठी सिनेमाही निघाला हे सर्वश्रुत आहेच.अनेक कार्यक्रमामध्ये त्यांच्या बरोबर मी जात असे. आमचे सतत एकमेकांच्या कडे जाणे येणे होते.आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठानलाही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते . वैयक्तिक मला त्यांचा जो विद्यार्थी म्हणून प्रेमळ सहवास आणी मार्गदर्शन लाभले हे माझे भाग्यच !!!
माझे परम् मित्र श्री.मारुतराव यादव ( ज्येष्ठ कवी व कथाकथनकार ) यांच्या एकषष्ठी समारंभाच्या कार्यकमात कै. आनंद यादव सरांची व माझी शेवटची गांठ पडली होती. तेंव्हा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या घरी आले होते. तीच त्यांची माझी शेवटची भेट ठरली. त्यांच्या सहवासाच्या स्मृती कायम स्मरणात आहेत. साऱ्या आठवणी लेखन मर्यादा असल्यामुळे अगदी संक्षिप्त लिहावा लागत आहे ही माझ्या मनात खंत आहेच..
© विगसा
9766544908
१८ – ११ – २०१८
पुणे मुक्कामी.
Leave a Reply