
Image © Prakash Pitkar….
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या …. गूढरम्य डोंगररांगा …
हिरकणी बुरुजावरून दिसणारं … मराठी मुलुखाचं विहंगम दृष्य
पावसाळा … सह्याद्रीच्या ऋतुचक्राचा राजा …. आणि दुर्गराज किल्ले रायगडाच्या हिरकणी बुरुजावरून दिसणारा हा सह्याद्रीच्या दुर्गम … जंगली मुलुखाचा नजारा … घनघोर कोसळणारा पाऊस खऱ्या अर्थाने बघायचा … अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या गाभ्यात वसलेल्या किल्ले रायगडावर जायला हवं …टकमक टोकावरून दिसणारं काळ नदीचं खोरं … कोकणदिवा … लिंगाण्याचे थोरले डोंगर …. कडे … एकीकडे भवानी कडयावरुन दूरवर दिसणारे राजगडाचे डोंगर … तर हिरकणी बुरुजावरून दूरवर असलेल्या जावळीच्या निबिड अरण्याने वेढलेल्या शंभू महादेव डोंगररांगा … त्यावरचा प्रतापगड… रायगडाचा सगळा घेर प्रचंड मोठा …फोटोत त्यातल्या एका बाजूची थोडी कल्पना येईल …त्यात सगळीकडे सभोवताली घनदाट जंगल .. जबरदस्त खिंडी … नावंच बघा … वाघोली खिंड …. काळकाई खिंड …गेले काही दिवस सगळीकडे जोरदार मुसळधार पाऊस कोसळतोय … आज तर त्याचं रुप खूप सामर्थ्य दर्शवणारं .. साहजिकच मन आज रायगडावर भटकतंय … काही आठवणी मनात गुंतत आहेत …. खूप खूप वर्षांपूर्वी .. म्हणजे १९७५च्या पावसाळ्यात .. आम्ही पाच सहा मित्र … त्यावेळी मी आठवीत होतो … एका मोठया शिवभक्त मित्राबरोबर रायगडावर तीन दिवस जाऊन राहिलो होतो .. त्यावेळी एमटीडीसी नव्हती … जिल्हा परिषदेची धर्मशाळा होती … आणि देशमुखांचं हॉटेल … त्या तीन दिवसात आम्ही … निसर्गाच्या त्या अतिसमर्थ आविष्कारात मनसोक्त भटकलो … त्या वेळी जो विलक्षण कोसळणारा पाऊस आणि सह्याद्रीचं ते रूप बघितलं ते पुढचे सात जन्म देखील विसरू शकत नाही …. आज ते सगळं डोळ्यांसमोर जसच्या तसंच दिसतंय .. .त्यावेळी … असे … सहजपणे … नकळतपणे मनावर … डोळ्यांवर झालेले ते संस्कार ..हे मिळालेलं अपूर्व … अमूल्य असंच धन … शिदोरी आहे …
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगानें जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा …..
हिच्या कुशींत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीरानें
केली मृत्यूवरी मात ….
कडे कपारींत उभीं
हिच्या शिवाचीं देवळें
तेज सरितांमधून
स्वाभिमानाचें ओहळे …..
माझ्या मराठी मातीला
नका म्हणूं हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर
मला हिचें महिमान…..
दिवा झोपडींत मंद
पेटे त्यावर मशाल
तिच्या दीप्तीनें उजळे
घर देशाचें विशाल ……
रत्नजडित अभंग
ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनि फिरे
सरस्वतीची पालखी ….
येथें देवाचें मंदिर
नाहीं श्रीमंत सोनेरी
हिच्यासाठी रमापति
राहे वाळवंटापरी ….
रसरंगांत भिजला
येथें शृंगाराचा स्वर
येथें अहंता द्रवली
झालें वसुधेचें घर ……
माझ्या दरिद्री मातीचा
नका करूं अवमान
हिच्या दारिद्यात आहे
भविष्याचें वरदान ……
येथें फडकला झेंडा
विळ्याकोयत्यांच्यासाठीं
खड़ग खंबीर राहिलें
सदा कंगालांच्या पाठी….
नाहीं पसरला कर
कधीं मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढें
कधीं लवली ना मान ……
हिच्या गगनांत घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत
आहे समतेची ग्वाही …….
अन्यायाची सुलतानी
कधी हिनें ना साहिली
आहे मृत्यूच्या दाराशी
हिच्या श्रद्धेची हवेली ……
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील
मायदेशांतील शिळा ….
— कविवर्य कुसुमाग्रज
— प्रकाश पिटकर
Leave a Reply