नवीन लेखन...

सेल बोट

युरोप आणि ब्राझील मध्ये जहाज किनाऱ्याच्या जवळपास पोहचल्यावर लहान मोठ्या लग्झरीयस यॉटच आणि सेल बोट म्हणजेच शिडाच्या होड्या दिसायच्या. सगळ्याच यॉटच आणि सेल बोट या आकर्षक आणि उच्चप्रतीच्या रंग संगतीन रंगवलेल्या असायच्या. काहींना कापडाच्या शिडांसह हाय स्पीड इंजिन सुद्धा असायचे. जहाज त्यांच्याजवळून जात असताना अशा बोटींवर माशांसाठी गळ टाकून बसलेले, स्किन टॅनिंग साठी सनबाथ घेणारे सगळ्याच वयोगटातले हौशी यूरोपियन्स दिसायचे. कोणाच्या बोटीवर बार्बेक्यूचा धूर निघताना दिसायचा तर कोणाच्या बोटीवर बियर आणि व्हिस्कीचे भरलेले ग्लास दिसायचे. शनिवारी आणि रविवार असला की अशा बोटी आणि त्यावर एन्जॉय करणाऱ्यांची संख्या खूपच जास्त असायची.

ब्राझील मध्ये सुद्धा बऱ्याच शहरांमध्ये महागड्या बोटी आणि त्यांचे पार्किंग बे मोठ्या प्रमाणात दिसायचे. वीकएन्ड ला समुद्रात एक संपूर्ण दिवस किंवा एक रात्र दोन दिवस बोटीवर घालवून एन्जॉय करणारी लोकं मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक लहान मोठ्या शहरात दिसणाऱ्या बोटिंच्या संख्येने त्या शहराची श्रीमंती लक्षात यायची. आपल्या संपूर्ण भारतात जेवढ्या यॉटच किंवा सेल बोट नसतील तेवढ्या युरोपातल्या एखाद्या मध्यम शहरात नक्कीच बघायला मिळतील.

मी सहावीत असताना माझे बाबा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीस स्टेशनला इन्चार्ज होते. एकदा अलिबागहून श्रीवर्धनला जाण्यासाठी बाबा आम्हाला रेवदंडा, मुरुड मार्गे जंजिरा किल्ला असलेल्या राजपुरी बंदरातून घेऊन निघाले.
अलिबागहुन मुरुडला बसने आणि मुरुड हुन पुन्हा दुसरी बस पकडून राजपुरीला. राजपुरी हुन दिघी खाडीत लाँच ने दिघीला जायचे होते.

राजपुरीला बसने पोहचता पोहचता उशिर झाला आणि दिघीला जाणारी शेवटची लाँच निघून गेली. बाबांना त्यांच्या पोलीस स्टेशन च्या हद्दीतील दिघी आणि बोर्ली येथील पोलीस चौकींवर रुटीन व्हिजिट द्यायची असल्याने त्यांनी संध्याकाळी पोलीस जीप दिघीला मागवली होती. शेवटची लाँच दिघीला पोहचल्यावर साहेब दिसले नाहीत म्हणून ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबलनी राजपुरीच्या बंदर विभागात फोन केला. त्याकाळात मोबाईलच काय पण लँडलाईन फोन सुद्धा खूप कमी ठिकाणी असायचे. इकडे बाबांची फोनाफोनी सुरु असताना दिवस मावळायला लागला होता. राजपुरी बंदरातून समोर दिसणारा जंजिरा किल्ला सूर्याच्या सोनेरी किरणांत उजळून निघत होता. जसजसा अंधार दाटू लागला तसतसा जंजिरा किल्ला पाण्यावर तरंगतोय असा भास होऊ लागला. अभेद्य, बुलंद आणि ऊन वारा पाऊस आणि खाडीच्या उसळणाऱ्या लाटांचे तडाखे वर्षोनुवर्षे खाऊनही भक्कम असलेल्या जंजिरा किल्ल्याचे सौंदर्य निरभ्र आकाशातून पडणाऱ्या चांदण्यात खुलून गेले होते.

राजपुरी बंदरात तासाभरात दोन लहान मासेमारी करणाऱ्या बोटी येऊन गेल्या. मासेमारी करणारी बोटी जवळ गेल्यावर मासळीचा उग्र वास यायचा. थोडयाच वेळात एक लहान होडी दिघी कडून राजपुरी बंदराच्या जेट्टीकडे येताना दिसली. ती एक जुनाट शिडाची होडी होती. जेट्टी पासून काही अंतरावर असताना तिचे कापड गुंडाळून ठेवले गेले आणि एका लांब बांबूला खाडीच्या तळाशी टेकवून त्याच्या साहाय्याने होडी ढकलत ढकलत आणून जेट्टीला बांधली. संपूर्ण पणे लाकडाची आणि जुनाट अशी होडी होती. चालून चालून होडीतील फळ्या गुळगुळीत झाल्या होत्या. होडीच्या तळाशी थोडेसे पाणी इकडून तिकडे डुचमळत होते. खाडीवरून वाहणारा खारा वाऱ्याने संपूर्ण वातावरण आल्हाद दायक झाले होते.

होडीत एक कॉन्स्टेबल काका आणि दोन नावाडी होते. आई बाबा आणि आम्ही दोघे भाऊ होडीत बसलो. पुन्हा एकदा नावाड्याने बांबू खाडीच्या तळाला टेकवून ढकलत ढकलत होडी खाडीच्या खोल पात्रात आणली. ताडपत्री सारख्या जाड कापडाची शिडे उघडण्यात आली. मंद वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोतांनी कापडी शिडे भिरभिरू लागली आणि होडी हळू हळू वेग घेऊ लागली. होडीत खुर्च्या नव्हत्या की टेकून बसायला जागा नव्हती फक्त मध्ये फळ्या आणि फळ्यांवर खाली पाय सोडून बसायचे. लाईट नाही की दिवा नाही. वाऱ्यावर फडफडणारे शिडं आणि खाडीच्या लाटांची झुळझुळ एवढाच काय तो आवाज. चंद्राचा प्रकाश पडायला सुरवात झाली होती चांदण्यात अस्पष्ट दिसणारा जंजिरा किल्ल्याचा काळा तुळतुळीत कातळ दुधाळ चंद्रप्रकाशात चमकू लागला होता. किल्ला आणि राजपुरी मागे जाऊ लागले. नावाडी इकडून तिकडून दोऱ्या ओढून वाऱ्याचा दिशेने होडीचे कापडी शिडे अड्जस्ट करत होते.

चंद्रप्रकाशात हलणाऱ्या खाडीच्या संथ लाटा आणि होडीने त्या लाटांना कापत जाताना मागे उठत जाणारे जलतरंग बघताना आपण एक स्वप्न पाहत आहोत असं वाटतं होतं. होडीच्या बाहेर हात काढून पाण्यात हात घालण्याचा मोह आईला सुद्धा आवरता आला नाही. लाँच चुकली आणि दोन तास अडकून राहावे लागल्याने आलेला कंटाळा होडीत बसल्यापासून कुठल्या कुठे पळून गेला होता. भरती असल्याने पंचवीस मिनिटात होडी दिघीला पोचली. होडी दिसताच पोलीस जीप मधून दिघीच्या जेटीवरून ड्रायव्हर काकांनी होडीच्या दिशेने जीप फिरवून हेड लाईट चालू केले. तेव्हा पोलीस स्टेशनला जुन्या पिक्चर मध्ये दिसणारी निळ्या रंगाची आणि बिना दरवाज्याची पोलीस जीप होती. होडीतून उतरल्यावर बाबा चौकीवर जाऊन आले आणि आम्हाला बसवून श्रीवर्धनकडे निघाले. ड्रायव्हर काकांनी जीपच्या टपावर गोल गोल फिरणारा अंबर दिवा चालू केला होता. फारशी वर्दळ नसणाऱ्या रस्त्यांवर जीप वेगाने पळत होती, पोलीस जीपला पाहून रस्त्यात उभे असलेले लोकं आणि गाड्या पटापट बाजूला सरकत होते.

लाँच चुकली म्हणून आम्हाला आणायला आलेल्या शिडाच्या होडीतील नावाड्याने पैसे घेण्यासाठी नकार दिला पण बाबांनी त्याला पाचशे रुपये घ्यायलाच लावले. पाचशे रुपयात आलेल्या त्या स्पेशल सेल बोट चा त्यावेळचा प्रवास हा आयुष्यातील पहिलाच प्रवास होता आणि अजूनही तो एकमेवच आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे कारण आजपर्यंत कितीतरी लहान मोठ्या जहाजांवर आणि स्पीड बोटीनं जायला मिळाले पण शिडाच्या होडीत त्यानंतर पुन्हा कधीच मिळाले नाही. आपल्या कोकणात तर शिडाच्या होड्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पाश्च्यात्य लोकांप्रमाणे फिशिंग आणि बोटिंग साठी लाखो रुपयांच्या सेल बोट आणि करोडो रुपयांची यॉटच घेण्याची मानसिकता आपल्या देशात रुजणे शक्य नाही.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DME, DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..