धडाडणाऱ्या तोफेवरुनी मिठमोहरी उतरते
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते //धृ//
गेला विसरुनी सगेसोयरे
भाऊ बहीण आईबाप बिचारे
ह्रदयावरी ठेवून अंगारे
दृष्टी दूर सारी प्रेमळ नाते //१//
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते
डोळ्यामध्यें अंजन घालूनी
रक्षण करीतो रात्रंदिनी
लक्ष तयाचे इतर जीवनीं
तोड नसे ह्या त्याग वृत्तीते //२//
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते
संकट जेंव्हा अवचित येई
शत्रुवरी तो तुटून जाई
प्रसंग पडता प्राणही देई
शिंपडूनी रक्ताचे ते सडे //३//
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply