नवीन लेखन...

सैनिकाच्या मुलाची दिवाळी

१.
दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?
२.
दुसरीकडे सीमेवर लढणाऱ्या नवऱ्याची, महादेवची काळजीही थोडी वाटतच असे. लग्नापासून बारा वर्षांत तिला त्याची चांगलीच संवय झाली होती. सैनिकी पेशा पत्करणाऱ्याच्या बायकोने काळजी करायची नसते, हे तिला समजले होतं. तिने वेळ सार्थकी लावण्यासाठी नर्सिंगचा कोर्स केला आणि तिला चांगल्या हॅास्पिटलात नोकरी मिळाली होती. राजस झाला तेव्हां सासू होती. मुलाला हंसत सीमेवर पाठविणारी सासू शकुंतलेलाही चांगली वागवत असे. तिची नर्सची नोकरी आहे, हे समजून घेऊन राजसचं सगळं तीच करायची. दिवाळीचा फराळ म्हणा, राजसला फटाके आणून देणं म्हणा, सर्व ती करत असे. कपड्यांची खरेदी शकुंतला करत असे. नवरा सीमेवर खरे बॅाम्ब, खऱ्या गोळ्या ह्यांचा सामना करत होता. पत्र लिहायचा त्याला खूप आळस. खुशाली कळवणारं चार-सहा ओळींच पत्र मात्र नियमित पाठवायचा पण सध्या त्याचं पत्रही नव्हतं. मन किती गुंतागंतीचं असतं. क्षणांत ते समोर बेडवर आजारी असणाऱ्या पेशंटची काळजी करत असायचं आणि क्षणांत कधी नवऱ्याचं पत्र कां बरं आलं नसेल, ह्याची काळजी करायचं! राजसची काळजी तर खोलवर होतीच. ह्या मनाची लांबी, रूंदी, खोली कशाचा पत्ता लागत नाही पण त्याच्यावाचून भागत नाही. तिने भराभर कामे आटपली. नर्सचा वेश लॅाकरमध्ये ठेवून साधा वेश धारण केला आणि ती घराकडे निघाली.
३.
ती घरी आली तेव्हां राजस कांहीतरी वाचत होता. ती म्हणाली, “राजस भूक लागली असेल ना!” राजस म्हणाला, “आई, मी डब्यांतला लाडू, बिस्कीटे खाल्लीत आताच. आता भूक नाही मला.” शकुंतला म्हणाली, “बरं! तुला फटाके घ्यायचेत ना! चल आपण जाऊया मार्केटमध्ये मी फराळासाठी कांही वस्तू घेते आणि आपण तुझ्यासाठी फटाकेही घेऊन येऊ!” राजस म्हणाला, “आई, तू जाऊन तुला काय हवं ते घेऊन ये. फटाके नकोत मला.” शकुंतला आश्चर्यचकीत झाली आणि म्हणाली, “अरे, गेला आठवडाभर घोकत होतास, काय काय घ्यायचं ते! आतां कां नको म्हणतोस?” राजस म्हणाला, “आज आमचे गुरूजी म्हणाले की फटाक्यांनी हवा दूषित होते. झाडं मरतात. माणसं आजारी पडतात. म्हाताऱ्यांना त्रास होतो. म्हणून यंदा फटाके लावू नका म्हणाले.” शकुंतला म्हणाली, “हो बाळा, आपण पर्यावरणाचा विचार करायला हवा, हे बरोबर आहे पण पर्यावरण कांही फक्त तुझ्या फटाक्यांमुळे नाही बिघडत. जगभरांतले मोठे मोठे कारखाने हवा, पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित करतात. सरकारने घातलेली बंधने पाळत नाहीत.” राजस विचारांत पडला. त्याला मनांतून फटाके हवे होते पण त्याच्या कांही मित्रांनी ठरवले होते की ह्यावर्षी फटाके नाही लावायचे.
४.
राजस म्हणाला, “आई, तसेही मला बाबा इथे नसतांना फटाके लावायला नाही मजा येणार. तिथे सोसायटीतील सर्व मुलांचे बाबा बरोबर असतात त्यांच्या. नको आणूस तू फटाके.” शकुंतलेच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. तिच्या मनांत आलं, तिथे ह्याचे बाबा खऱ्या बंदुका आणि तोफांना सामोरे जात असतील आणि मुलाने इथे साधे फटाके नाही लावायचे? प्रदूषणाची भीती वाटत्येय तर जगांत अजून इतकी युध्द कां होताहेत? युध्दबंदी मानव स्वत:च कां करत नाही? ती राजसला म्हणाली, “राजस, तूंच ठरव तुला फटाके हवेत की नकोत. मग मात्र ऐनवेळी फटाके मिळणार नाहीत हं! घ्यायचे असले तर आतांच घे.” राजस म्हणाला, “आई, नकोत मला फटाके. बाबा इथे असते तर त्यांना विचारलं असतं! बाबांकडे फोन पण नाही करता येत. इतर मुलं मोबाईल घेऊन बोलतात कोणा कोणाशी! मलाच नाही बोलतां येत बाबांशी!” शकुंतला हंसली, “असं नाही रे बाळा, प्रत्येक कामांत कांही गरजा असतात. डॅाक्टर ॲापरेशन करतात, तेव्हां फोन नाही घेत. हॅास्पिटलमध्ये मी तरी तुझे फोन नेहमी कुठे घेऊ शकते? तुला फोन तरी आहे. किती गरीब मुलांकडे फोनच नसतो.” फटाके सोडून इतर खरेदी करायला ती घाईघाईने बाहेर पडली.
५.
लवकर घरी परतावे म्हणून इतर खरेदी तिने भराभर आटोपली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून ती फराळ करत होती. मुष्किलीने तिला एक दिवसाची सुट्टी मिळाली होती. उद्या धनत्रयोदशी. दिवाळीची सुरूवात. जरी महादेव येण्याची शक्यता नव्हती तरी फराळ करतांना तिने तिघांच्या साठी केला. महादेवच्या आवडीचे चिरोटे सुध्दा तिने केले.

फराळ आटोपल्यावर डब्यांत भरले आणि त्या दिवशीचा पेपर तिने पाहिला. पहिल्या पानावर खाली कोपऱ्यांत एक बातमी होती. “ऐन दिवाळीच्या तोंडावर सीमेवर धुमश्चक्री.” खाली म्हटलं होतं, ‘सीमेवरील गोळीबार नेहमीचाच असतो पण नुकताच झालेला हल्ला मोठा होता आणि त्यांत बॅाम्ब पण वापरण्यांत आले. सीमेवर तैनात असणाऱ्या तुकडीने जशास तसा जबाब देऊन हल्ला परतवून लावला. शत्रुची तुकडी पूर्ण नेस्तनाबूद केली. ह्या हल्ल्यांत दोन भारतीय जवानांना वीरगती प्राप्त झाली. दोन जवान जखमी झाले. ही झटापट बर्फाळ सीमेवर झाल्याने त्याचा पूर्ण तपशील अजून कळायचा आहे.’ शकुंतलाला माहित होतं की महादेव काश्मीरच्या सीमेवरच होता. नेमका कुठल्या भागांत माहित नव्हतं. दोन सैनिकांना वीरगती प्राप्त झाली, हे वाचून तिची काळजी वाढली. महादेव सुखरूप असेल ना! पत्रही पाठवू शकला नाही म्हणजे तो कुठेतरी अगदी आघाडीवरच असावा.
६.
सोसायटीतील मुलं आपला पर्यावरणासाठी फटाके न वाजविण्याचा निश्चय केव्हाच विसरली होती. त्यांचे रात्री फटाके फोडण्याचे बेत चालले होते. संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीच्या मैदानांत जमून वेगवेगळे फटाके वाजवणार होते. त्यांत कांहीनी मोठे बॅाम्ब पण आणले होते. राजस बेचैन होता. त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचे फटाके नव्हते. त्याने आईला अगदी साध्या फुलबाज्या सुध्दा आणू दिल्या नव्हत्या. आता तर आई ड्यूटीवर गेली होती. एवढ्यांत त्याच्याकडला फोन वाजला. त्याला तर कुणाचे फोन येत नसत. त्याने फोन घेतला. कुणीतरी विचारले, “सुभेदार महादेव आहेत कां?” राजस गडबडला आणि म्हणाला, “म्हणजे माझे बाबा कां?” “अच्छा, तू त्यांचा मुलगा कां? बरं बरं! ठेव फोन.” त्याने फोन ठेवला. त्याला आश्चर्य वाटत होतं की आपला नंबर कोणाला मिळालाच कसा? आईशिवाय कोणालाच तो माहित नव्हता. साडेसात वाजले होते. सर्व मुले आठ वाजतां जमणार होती. राजस अस्वस्थ होता. आई साडे आठ किंवा नऊपर्यंत आली नसती.
७.
आज घरांतच बसावं लागणार, असं त्याला वाटत होतं. तोंच दाराची बेल वाजली. त्याने सावधपणे दरवाजाबाहेर पाहिलं. त्याला संपूर्ण सैनिकी गणवेशांतले बाबा उभे असलेले दिसले. त्याने आनंदाने “बाsबा” ओरडत दरवाजा उघडला. महादेवने त्याला उचलूनच घेतले. राजसला आता कांहीच कमी नव्हतं. बाबा आला, हीच खरी दिवाळी. बाबाने मात्र आपल्या सामनातून प्रथम काढले फटाके. येतांना वाटेत त्याने राजससाठी खरेदी केले होते. ते हातात येतांच राजस खुश झाला. मोठ्या रूबाबांत पूर्ण सैनिकी वेशांतील आपल्या बाबाला घेऊन सोसायटीच्या मैदानांत गेला. आता तो बापाचा हात धरून फटाके वाजवू लागला. राजसची दिवाळी आतां छान साजरी होणार होती.
८.
बापलेक तिथेच असतांना शकुंतला ड्यूटीवरून आली. फटाके फोडणारे बापलेक पाहून तिचे डोळे भरून आले. महादेवने तिला हॅास्पिटलमध्ये फोन करून सांगितले होते. सीमेवरच्या तणातणीत त्याची तुकडी उध्वस्त झाली होती. दोन सहकारी त्याने गमावले होते. दोघांना जखमा झाल्या होत्या पण त्याने व आणखी एका सहकाऱ्याने हल्ला करणाऱ्यांपैकी एकालाही परत जाऊ दिले नव्हते. टिपून टिपून मारले होते. त्याला विशेष सेवापदक मिळावे म्हणून त्याच्या नांवाची शिफारस केली होती. सीमेवरून परतल्यावर नव्या तुकडीची जबाबदारी लागलीच त्याला न देतां कुटुंबाला भेटायला दहा दिवसांची रजा देण्यांत आली होती. त्यामुळे ही दिवाळी तो घरी साजरी करणार होता. फक्त गोड मात्र खाणार नव्हता. कारण वीरगती प्राप्त झालेले सहकारी त्याला आठवत होते. शकुंतलाने फोन बंद केला, तेव्हा तिच्या मनांत सुप्रसिध्द गीताच्या ओळी घुमत होत्या, “कुछ याद उन्हे भी कर लो, जो लौटकर घर ना आये.”

वि.सू.
ह्या कथेतील पात्रे, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत.
अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..