नवीन लेखन...

सजीवांची झोप

रविवार २५ मार्च २०१२.

माणूस, प्राणी, पक्षी, जलचर वगैरे सजीव दिवसातला काही काळ तरी झोपेत घालवितात. आहार, श्वसन, उत्सर्जन या क्रियांइतकीच निद्राही सजीवांना आवश्यकच असते. अगदी युध्दआघाडीवर असलेल्या सैनिकांचीदेखील पुरेशी झोप झाली नाही तर ते सक्षमदृष्ट्या लढू शकणार नाहीत. थकल्याभागल्या जीवांना, लहानशी डुलकी जरी काढली तरी, ताजेतवाने वाटते.

कार्य आणि उर्जा

सध्या, अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणात, चार्जेबल विजेर्‍या असतात. मोबाईल फोनबरोबर चार्जर घ्यावाच लागतो आणि तो सतत वीजपुरवठ्याला जोडलेला ठेवावा लागतो. लॅपटॉप संगणकाची बॅटरी पूर्णतया चार्ज्ड ठेवणे आवश्यक असते. संगणकाची, मोबाईलची, फोनची वगैरे उपकरणांची बॅटरी उतरलेली असली तर, तशी सूचना, बीप आवाजाने किंवा लेखी मजकूराच्या सहाय्याने मिळते. कार्य आणि उर्जा यांचा घनिष्ट संबंध आहे. उर्जेशिवाय कार्य होणे शक्य नाही. कार्याची अपेक्षा ठेवली तर उर्जास्त्रोताची सोय करावीच लागते. मानवनिर्मित कोणत्याही उपकरणात तशी सोय केलेली असते. घड्याळाची स्प्रिंग किंवा सेल, वाहनांचे इंधन, विजेवर चालणार्‍या कोणत्याही उपकरणास किंवा यंत्रास लागणारा वीज पुरवठा वगैरे उर्जास्त्रोत आहेत.

सजीवांच्या शरीराची उर्जा

प्रत्येक सजीवाचा आपापला विशिष्ट आहार असतो आणि तो, त्या सजीवाला, अनुभवाने चांगला माहित असतो. सजीवांच्या पेशीत, या आहाराचे उर्जेत रुपान्तर करण्याच्या आज्ञावल्या असतात. या उर्जेमुळेच सजीवांच्या शरीराचे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालतात. घेतलेल्या जीवरासायनिक आहाराच्या रासायनिक उर्जेचे, कार्य करु शकणार्‍या यांत्रिक उर्जेत रुपान्तर करण्याची किमया निसर्गाने साध्य केली, हा प्रकाशसंश्लेण क्रियेइतकाच अगम्य चमत्कार आहे. कार्य केले की या उर्जेचा पुरवठा कमी होतो आणि शरीर थकते. पेशी पूर्वस्थितीत येण्यासाठी शरीराला विश्रांतीची गरज भासते. त्यासाठी, शांत झोप हा एकमेव उपाय आहे. झोप केव्हा, कुठे, कशी आणि किती काळ घ्यावी हेही निसर्गाने यशस्वीपणे ठरविले आणि प्रत्यक्षातही उतरविले.

शरीराची निद्रावस्था

प्रत्येक सजीवाची, झोप घेण्याची तर्‍हा वेगवेगळी असते. निद्रावस्थेत, इंद्रियांच्या संवेदना शिथिल झाल्या असतात. डोळे मिटलेले असतात, आवाज ऐकण्याची क्षमता कमी झालेली असते, वास तर कळतच नाही आणि स्पर्शज्ञानही कमी झालेले असते. तरीपण, सजीवांचा मेंदू, पूर्णतया झोपलेला नसतो. झोपेतही संकटाची जाणीव होऊ शकते. प्रत्येक प्राणी, आपले शरीर आरामात विसावू शकेल, दुसर्‍या कुणाच्या नजरेस पडणार नाही अशी निवांत जागा शोधतात. मासे मात्र डोळे उघडे ठेवूनच झोपतात कारण त्यांच्या डोळ्यांना पापण्याच नसतात.

पक्षी आणि माकडे झाडावरच झोपतात. पण ते झोपेत खाली पडत नाहीत. त्यांच्या शरीराचा गुरुत्वमध्य, भक्कम आधारावर राहील अशी उपजत योजना निसर्गाने, कोट्यवधी वर्षांपूर्वीच केली आहे. कित्येक पक्षी, आपल्या शरीराची अशा तर्‍हेने घडी घालतात की त्याचा गुरुत्वमध्य पायावर येतो. त्यांच्या मेंदूतील, तोल सांभाळण्याची यंत्रणा, कार्यक्षम राहते आणि झोपेतही हा गुरुत्वमध्य पायावरून ढळत नाही.

सजीवांना, झोपेची आवश्यकता असते हे, निसर्गाने, कोट्यवधी पृथ्वीवर्षांपूर्वीच जाणले. त्यानुसार, प्रत्येक सजीवाच्या शरीरात सोयी आणि यंत्रणा सिध्द केल्या आणि त्या, एका पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित होण्यासाठी, गुणसूत्रे, जनुके, डना/रना (DNA/RNA) रेणूच्या स्वरूपात असलेल्या आनुवंशिक तत्वाची योजना केली.

मेंदूतील घड्याळे

सजीवांच्या सर्व शारीरिक व्यवहारांचा विज्ञानीय दृष्ट्या सखोल अभ्यास फार पूर्वीपासूनच सर्व मानवीसमूहात झाला आहे. आधुनिक विज्ञानीय उपकरणांच्या सहाय्याने केलेल्या या अभ्यासामुळे, सजीवांची अनेक गूढे उकलली गेली आहेत. सजीवांच्या मेंदूचाही खूपच सखोल अभ्यास केला गेला आहे. सजीवांच्या शरीरावर, त्यांचा मेंदू कसे नियंत्रण करतो याविषयी बरेच ज्ञान शास्त्रज्ञांना झाले आहे.

मानवी मेंदूत दोन प्रकारची घड्याळे असतात असे आढळले आहे. एकाचे नाव आहे, इंटर्व्हल टायमर आणि दुसर्‍याचे नाव आहे सिर्काडियन घड्याळ. इंटर्व्हल टायमरमुळे काळाची जाणीव होते. म्हणजे मिनिट, तास, दिवस, महिने, वर्ष वगैरेतील फरक जाणवतो तर सिर्काडियन घड्याळामुळे तुमच्या शरीरातील २४ तासांचे कालचक्र निश्चित केले जाते. ठराविक काळानंतर झोप येणे, जाग येणे, भूक लागणे, मलमूत्रविसर्जनाची संवेदना होणे वगैरे. सकाळी ५ वाजताचा गजर लावून रात्री १० वाजता झोपल्यास, बरेच वेळा असा अनुभव येतो की, पाच वाजण्यापूर्वीच आपोआप जाग येते. मेंदूला ७ तास झोपेच्या काळाची जाणीव झालेली असते.

२४ तासांच्या या कालचक्रात, प्रकाशाच्या कमीजास्त होण्यावर, शरीराच्या बर्‍याच क्रिया अवलंबून असतात. उदा. प्रकाश कमी झाला की झोप येणे आणि प्रकाशाची तीव्रता वाढली की जाग येणे वगैरे. जेट विमानाने दूरचा प्रवास केला, की एक-दोन दिवस हे जैविक घड्याळ बिघडते आणि ‘ जेटलॅग ’ निर्माण होतो. त्यामुळे ज्या देशातून तुम्ही आला असता, त्या देशात जर दिवस असेल आणि नवीन देशात जरी रात्र असली तरी झोप येत नाही आणि दिवसा मात्र गाढ झोप लागते. अंतराळवीरांना, आपल्यासारखी प्रदीर्घ रात्र-दिवस नसल्यामुळे त्यांचे निराळेच जैविक घड्याळ निर्माण होते. तसेच, जमिनी खालच्या खोल गुहात, जेथे सूर्यप्रकाश पोचतच नाही, तेथे काही माणसांना महिना-दोन-महिने ठेवले तर त्यांची कालगणना चुकते. कारण सूर्योदय-सूर्यास्त त्यांना दिसतच नाहीत आणि त्यांच्या जवळ घड्याळही नसते.

झोपेची नैसर्गिक गोळी

मानवाच्या मेंदूतील, पिनिअल नावाच्या अंतस्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणार्‍या मेलॅटोनीन नावाच्या संप्रेरकामुळे म्हणजे हॉर्मोनमुळे झोप येते. आणि सजीवांच्या शरीरातील झोपेची यंत्रणाच, मेंदूवरील संशोधनामुळे खात्रीलायक रित्या माहित झाली आहे. डोळ्याच्या रेटिनात गँगलियन नावाच्या पेशी असतात. त्यांतील काही पेशीत मेलॅनॅप्सिन नावाचे रंगद्रव्य असते, हे रंगद्रव्य म्हणजेच, निसर्गाने डोळ्यात बसविलेले फोटोमीटर. त्यामुळे प्रकाशाची तीव्रता मापली जाते आणि ते संदेश, मेंदूतील विशिष्ट भागात पाठविले जातात. नंतर, हा भाग, सिर्काडियन घड्याळाचे नियंत्रण करणार्‍या, मेंदूच्या आणि शरीराच्या संबंध्दित भागांना आज्ञा पाठवितो. शरीर थकले म्हणजे देखील हीच क्रिया घडते. त्यामुळे, आवश्यक असेल तेव्हढेच मेलॅटोनीन, पिनिअल ग्रंथीतून स्त्रवते आणि शरीर झोपेच्या आधीन होते. मेलॅटोनीन तयार होण्याची क्षमता कमी झाली की निद्रानाशाचा विकार जडतो. काही, कौटुंबिक किंवा शारीरिक समस्या असली म्हणजे मेंदू प्रक्षोभित झाला असतो. त्यामुळे मेलॅटोनीन स्त्रवत नाही आणि आपण म्हणतो…काही केल्या झोपच येईना…आता निद्रानाशाच्या विकारावर, मेलॅटोनीनच्या गोळ्याही मिळतात. ही झोपेची नैसर्गिक गोळी म्हणता येईल.

मेलॅटोनीनचा शोध आणि निसर्ग

सजीवांना झोपेची गरज अपरिहार्य आहे आणि त्यासाठी, त्यांच्या शरीरात एक यंत्रणा सिध्द केली पाहिजे, त्यासाठी मेलॅटोनीन हे संप्रेरकच योग्य आहे, त्यासाठी, सजीवांच्या मेंदूत एका अंतस्त्रावी ग्रंथीची निर्मिती केली पाहिजे…हे सर्व निसर्गाने, केव्हा आणि कसे पूर्णावस्थेत नेले, या बाबीचे आकलन होणे, मानवी मेंदूच्या मर्यादेपलीकडले आहे असे म्हणावेसे वाटते.

मेलॅटोनीनची फॅक्टरी

मेलॅटोनीन हे संप्रेरक, फक्त कार्बन, हैड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सीजन या सारख्या साध्या अणूंपासून, विशिष्ट प्रकारे गुंफून तयार होते. हा कच्चा माल, सजीवाने खाल्लेल्या आहारातूनच घ्यावा लागतो. ही यंत्रणा पिनिअल ग्रंथीत बसविलेली असते. या सर्व यंत्रणेची आज्ञावलीही निसर्गाने निर्माण केली आहे. इतकेच नब्हे तर ही आज्ञावली, गर्भाचा पिंड, गर्भाशयात असतांनाच, गर्भाच्या मेंदूत तयार होण्यासाठीचीही दुसरी आज्ञावलीही निसर्गाने तयार केली आहे. ही सर्व प्रणाली, गेल्या कोट्यवधी वर्षापासून यशस्वीरित्या कार्यरत आहे. हे सर्व, मानवी बुध्दीला अतर्क्य, अगम्य, अचाट असेच आहे.

सजीवांची झोप :: अध्यात्म आणि विज्ञान.

या पृथ्वीतलावर मानव नव्हता तेव्हाही, कोट्यवधी वर्षे, सजीव होते. तेव्हा ईश्वर नव्हता, धर्म नव्हते की रुशीमुनी आणि विचारवंत नव्हते तरी सजीवांचे सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पडत होते. सर्व सजीव आहार घेत होते, हालचाल करीत होते, पुनरुत्पादन करीत होते आणि रात्री झोपही घेत होते. सजीवांच्या झोपेबद्दल, आधुनिक विज्ञानाने, मूर्त स्वरूपात खूपच ज्ञान मिळविले

आहे. तरीपण निसर्गात असलेल्या ज्ञानाच्या तुलनेत ते नगण्य आहे याचीही जाणीव शास्त्रज्ञांना आहे.

 

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..