नवीन लेखन...

सकारात्मक ऊर्जा देणारे गणपती निवास

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०२६ – श्री. वा. नेर्लेकर ह्यांनी लिहिलेला हा लेख)


प्रत्येक व्यक्तीच्या मनात घराच्या बाबतीत एक स्वप्न ‘घर’ करून राहिलेलं असतं. घर लहान असो वा मोठे, स्वप्न खरे झाले तर त्याच्या मनाला शांतता व समाधान मिळून त्याला त्याचा आनंद मिळतो. आज शहरामध्ये घर घेणं मोठं कठीण झालं आहे. घेतलेल्या घरामध्ये सर्व सोयी-सुविधा करून घेतल्या जातात. पण त्यात ‘स्वतंत्र देवघराला’ जागा मिळेलच असे नाही. एखाद्या कोनाड्यात अथवा एखाद्या फळीवरच देवांची व्यवस्था केल्याचे आढळून येते. पण ठाण्यात मात्र एक संपूर्ण घरच गणपतीचं आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. इडन वुडस् इथं ज्यांचं घर गणेशांनी भरलेलं आहे त्या देवमाणसाचं नाव आहे के. एस. हरिहरन.

३००० गणेश
हरिहरन यांच्या चार खोल्यांच्या घरात अगणित गणपतींचा संग्रह आहे. विविध आकाराच्या देखण्या मूर्ती तर आहेतच शिवाय प्रतिमा, पडते, तसबिरी, दिवे, गालिचे, निरांजने, रत्ने, मणी, घंटी, शंख, चित्रे, रुद्राक्ष, हिरे, पोवळे, पाचू, माणिक, खडे, समया, पुस्तके, फुलदाण्या, की चेन्स, पेन, पेले, कप, दारावरची बेल, उदबत्तीचे घर अशा कितीतरी वस्तूंवर गणेश विराजमान झालेले आहेत. बाहेरचा हॉल, माजघर, बेडरूम, किचन या चारही खोल्यांमध्ये गणेश रूपातील विविध कलाविष्कारांचा आविष्कार दिसून येतो. दारावरच्या बेलवरही गणेशाचं प्रतीक आहे आणि तेथे जवळच सर्वांच्या दर्शनासाठी देखील त्यांनी गणपतीची मूर्ती ठेवली आहे. त्यांच्या घरात, आकर्षक मूर्त्या, नक्षीदार वस्तू, देखणी चित्रे पाहताच मन आनंदाने हरखून जाते. आकड्यामध्ये किंवा संख्येमध्ये एकूण हा संग्रह किती आहे या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “आता मी मोजण्याचे सोडून दिले आहे. नवीन होतो, तेव्हा मोजत होतो. त्यामुळे निश्चित संख्या नाही सांगता येणार. अंदाजे ३००० असतील. पण ‘अगणित’ हाच शब्द त्याला शोभून दिसेल.”

• गणपतीचे परमभक्त
हरिहरन कमालीचे गणेशभक्त आहेत. त्यांचा जन्म चेंबूरचा. लहान असताना ते चेंबूरहून पायी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जायचे. महाराष्ट्रीयन कुटुंबांच्या सान्निध्यात ते लहानाचे मोठे झाले. शेजारी-पाजारी मराठी कुटुंबे होती. तामिळी ब्राह्मण असूनही ते अस्खलीत मराठी बोलतात. भक्तीला अनेक रूपं असतात. यांना गणेशाच्या मूर्ती व प्रतीके जमविण्याचा छंद जडला. गेली ४० वर्षे ते आपला छंद निगुतीने जोपासत आहेत. व्यवसायाने इंटरनॅशनल कन्सल्टंट असल्यामुळे आयुष्यभर त्यांनी जगप्रवास केला. थोडे-थोडके नव्हेत तर ५० देश ते फिरले आहेत. गणपतीचे ते परमभक्त आहेत. दिवसातून ४०-५० वेळा अथर्वशीर्ष म्हटल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. न त्यांच्या मनाला शांती मिळत नाही. घरात अत्यंत मधुर आवाजात गणेश आरतींची व स्तोत्रांची धून वाजत असते. घंटेचा नादमय किणकिणाट निनादत असतो. हळुवार, मंद स्वरसंगीत कानावर पडत असते. उदबत्तीचा मंद सुगंध दरवळत असतो. घराच्या भिंती श्रद्धा, भक्ती आणि विश्वास याबद्दल कौतुकाचे बोल बोलत असल्याचा प्रत्यय येतो. वास्तुपुरूष प्रसन्नतेने आल्या-गेल्याला आशीर्वादाचा हात उंचावतोय आणि घरात सकारात्मक उर्जा भरून राहिल्याचा अनुभव येतो. भक्तीच्या पायावर उभारलेल्या या घरात उंबऱ्याचा आत विलक्षण शांतता, सुख व समाधान नांदत असून कण अन् क्षण आनंदाने भारून गेल्याचे आपल्याला जाणवते. गणपती उत्सवाच्या १० दिवसात तर घर मंगलमय वातावरणाने भारून जाते. श्लोक, स्तोत्रे, आरत्या व मंत्राक्षतांच्या निनादाने वातावरण भक्तीमय होऊन जातं. दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून होणारे कोडकौतुक तर यजमानांकडून दिला जाणारा प्रसाद यामुळे उभयंता कृतज्ञतेच्या भावनेत डुंबत असतात. गणेशभक्तीच्या जोडीलाच आता सकाळी गीतापठन अन् संध्याकाळी विष्णूसहस्त्रनाम पोथीचे वाचन सुरू झाल्याने घर भक्तीरसाने ओथंबून गेले आहे.

कुटुंब रंगलंय गणेशभक्तीमधे
खूप तरुण वयातच हरिहरन यांना गणपतीच्या प्रतिमांनी भुरळ घातली. व्यवसायानिमित्त जगभर प्रवास झाल्याने त्याचा त्यांना फायदा झाला. आपला छंद समृद्ध करण्याकरिता या प्रवासाची त्यांना चांगली मदत झाली. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गणेश मंदिरे आहेत. त्यांनी तेथे भेटी देऊन दर्शन घेतले. जगाच्या प्रत्येक भागात भारतीय लोक आहेत. त्यांच्या भेटीतून त्यांना वेगवेगळ्या आकर्षक गणेशमूर्ती मिळाल्या. मोठ्या आकाराची चित्रे मिळाली. सर्वोत्तम चित्रे त्यांना नेपाळ इथे मिळाली. या देशात गणपतीचे अनेक भक्त एकत्र असतात. नेपाळ हा देश प्राचीन वस्तू मिळण्याचे सर्वोत्कृष्ट ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तेथूनही त्यांनी गणेशांच्या अनेक मूर्त्या गोळा केल्या. चित्रे मागून घेतली व विकतही घेतली. नेपाळ ही रुद्राक्षांची भूमी आहे. तिथे रुद्राक्ष, हिरे, पोवळे, पाचू, माणिक आणि अशाच अनेक प्रकारच्या खड्यांवर गणेश कोरलेले आढळतात. त्या देशातून मला गणेश रुपात खूप काही मिळालं आणि त्यामुळे खूप श्रीमंत झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अनेक मूर्त्या, अनेक प्रतीके आणि असंख्य कलाविष्कार मी विकत घेतले. अनेक वेळा माझ्या खिशात पैसे नसायचे. गणेशमूर्त्यांची व वस्तूंच्या किंमती न परवडणाऱ्या असायच्या. पण तरीही मला त्या गोष्टी मिळून गेल्या. माझ्या छंदसंग्रहात भर पडत गेली. प अशक्य गोष्ट शक्य कशी झाली याचंच मला आश्चर्य वाटलेलं आहे. कदाचित श्री गणेशच प्रत्येक गोष्टीची व्यवस्था करत असेल. या वैविध्यामुळे माझा श्रीगणेशाचा छंद्रसंग्रह अधिक श्रीमंत व भारदस्त झाला हे मात्र नक्की. अनेक मित्रांनी व जवळच्यांनी माझी आवड व छंदप्रेम लक्षात घेऊन मला देखण्या गणेशमूर्ती भेटीदाखल दिल्या. माझ्या पत्नीने, मुलाने व मुलीनेही माझ्या हौसेला व अनोख्या भक्तीला सक्रीय साथसंगत दिली. मुलगा शशांक सध्या नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत आहे.
तर मुलगी भावना लग्न होऊन मुलुंडला वास्तव्याला असते. न त्यांनीही सोन्यात, हिऱ्यात, रुद्राक्षात ताईत वापरून वडिलांच्या अ आवडीला पाठिंबा दिला आहे. पत्नी शांता पतीच्या छंद-संग्रहाची ि लक्षपूर्वक काळजी व देखभाल करीत असते.

हरिहरन यांची गणेशभक्ती इतकी उत्कट आहे की त्यांनी ते आपल्या आई-वडिलांचे नाव सार्थ ठरविले असे म्हणता येईल. उ वडिलांचे नाव शंकर तर आईचे नाव पार्वती असे आहे. शंकर-पार्वतीचा पुत्र म्हणून श्रीगणेशाची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर हरिहरन भाग्यवान म्हणावे लागतील. जेवणाचा घास घेतानाही ते प्रथम तो घास देवाला नैवेद्य म्हणून दाखवितात. जीवनातील कठीण परिस्थितीत गणपतीनेच मला वर काढले असे ते सांगतात. अनेकांना त्यांच्या घरातील गणपतींचे दर्शन घेऊन चांगले अनुभव आले आहेत. कुणाची लग्ने जमली, कोणाची आर्थिक परिस्थिती सुधारली, कुणाला परीक्षेत यश मिळाले तर कोणी दुर्धर आजारपणातून मुक्त झाले. ज्यांची जशी श्रद्धा तसे त्यांना फळ मिळाले.

अथर्व गणेश मंदिर
हरिहरन यांच्या निर्व्याज गणेशभक्तीतून बदलापूर येथे एक गणेशमंदिर साकारले असून त्याचे नाव ‘अथर्व गणेशमंदिर’ असे आहे. तेथील श्रीगणेशाची मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती साडेतीन फूट उंच आहे. गणेश मंदिर बांधण्याची इच्छा मनात आल्यावर त्यांनी बदलापूर व्हिलेज इथे जमीन विकत घेतली. तेथे मंदिर उभारून यंदा पाच वर्षे पूर्ण झाली. मंदिराला पाचवा वाढदिवस त्यांनी झोकात साजरा केला. अधून-मधून किंवा संकष्टी चतुर्थीला हरिहरन दाम्पत्य तेथे जाते. पूजा-अर्चा, अभिषेक करून गणेशापुढे ते नतमस्तक होतात. गेल्या वर्षी २०१५ मध्ये ते अमेरिकेत मुलाकडे गेले. तेथेही त्यांनी १० दिवस साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा केला. एखादा छंद माणसाला कोठून कोठे घेऊन जातो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हरिहरन होत.

ठाण्यातील त्यांचं घर नुसत्या चार भिंतींचं नाही. त्या चौकटीच्या आत असणाऱ्या देवमाणसाचं ते घर आहे. ही चौकट नात्याची वीण घट्ट करणारी आहे. ते घर मनमोकळं हसणारं आहे. आल्या गेल्याचं ‘अतिथी देवो भव’ म्हणून स्वागत करणारं आहे. जिव्हाळा, आपुलकी आणि मैत्र जपणारं आहे. आनंदाची बरसात करणारं आहे. सकारात्मक उर्जा देणारं आहे आणि म्हणूनच ते देवघर आहे. मुख्य म्हणजे ज्येष्ठराज गणपतीबाप्पांचा तेथे अखंड निवास आहे.

श्रीगणेशाच्या पोटावर उंदीर प्रकटला
के.एस. हरिहरन यांची गणेशभक्ती अगदी उत्कट आहे. मनोभावे भक्ती करणाऱ्या हरिहरन यांनी श्रीगणेशाच्या अस्तित्वाची अनेक वेळा अनुभूती घेतली. बदलापूर येथील अथर्व गणेश मंदिरात एकदा अभिषेक करताना त्यांना आलेली अनुभूती विलक्षण म्हणावी लागेल. त्या दिवशी दूध, दही, र गंगाजल, अष्टगंध, चंदन, मध यांचा अभिषेक करताना त्यांनी ‘विभूतींचा’ही अभिषेक केला आणि काय आश्चर्य. काही क्षणानंतर काळ्या पाषाणातील गणपती मूर्तीच्या पोटावर अकस्मात पांढऱ्या विभूतीच्या रुपातील उंदीर उमटल्याचे दिसले. क्षणभर ते गांगरले-घाबरले. पण घडलेली घटना सत्यच होती. त्यांनी काढलेल्या फोटोत गणपतीच्या पोटावरील विभूतीचा उंदीर इ’ उमटलेला स्पष्ट दिसत आहे. कुणाला हा चमत्कार वाटेल. न कुणाला त्यात खोटेपणा जाणवेल. तर कुणाला ती अंधश्रद्धा छा वाटण्याचाही संभव आहे. हरिहरन यांना मात्र हा गणपतीचा त ‘प्रसाद’ वाटतो.

विभूतीचा अभिषेक करताना पोटावर त्या रुपातील उंदीरच न का उमटावा? दुसरा कोणता प्राणी का उमटला नाही? याचे T-उत्तर कुणाकडेच नाही. गणपती आणि उंदीर यांचे नाते वेगळे या आहे. मूषक हे गणपतीचे वाहन आहे. अभिषेक विभूतीचा झाला नी हे सत्य आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हरिहरन यांना आलेली छंद अनुभूती विलक्षण म्हणावी लागेल.

-श्री. वा. नेर्लेकर, ठाणे

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..