सकारात्मक राहू या, असे म्हणले की सगळेच, हो हो चला सकारात्मक राहू या, असे म्हणतात. पण सकारात्मक राहायचे म्हणजे समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला हो हो करत पळ काढायचा आणि म्हणायचे मी सकारात्मक विचार केला हो, असे नसते ना.
सकारात्मक दृष्टीकोन अंगी बाणवायचा. स्वतः वर आणि देवावर विश्वास ठेवायचा. काहीही झाले तरी विश्वास ढळू द्यायचा नाही. समोर आलेली प्रत्येक अडचण अथवा परिस्थिती यांना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला यातुनच मिळते. आपण रोज अंघोळ करून छान छान सुवासिक साबण लावून शरीर स्वच्छ करतो. पण एक प्रश्न स्वतः ला विचारा शरीर तर स्वच्छ होते पण मन स्वच्छ होते? याचे उत्तर बहुतांश जणांना मिळेल अथवा मिळणार नाही. योग साधना, अध्यात्म यातून मन स्वच्छ करायला मदत मिळते.
मनात कोणाविषयी अढी न ठेवता फक्त चांगला विचार करायचा. चांगली भावना मनात ठेवायची. त्याने माझ्यासोबत असे केले, म्हणून त्याचे पण वाईटच झाले पाहिजे. अशा विचाराने आपले मन कलुषित होते. किंवा दुसऱ्यांविषयी मनात असलेली ईर्ष्या इत्यादी. यासारखे विचाराने आपले मन भरकटत असते. कारण ज्याच्याविषयी विचार करता किंवा वाईट बोलून दाखवतात त्या माणसाला काडीमात्र याचा फरक पडत नाही. पण जो हे सगळे विचार करत असतो त्याला याचा खूप त्रास होत आहे, हे साधं जाणवत ही नाही. त्रास म्हणजे काय तर रात्रीची शांत झोप न लागणे, बीपी हालणे इत्यादी. आणि आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा खेचली जाणे. हा सगळा नकारात्मक विचार करून आपण आपल्या मेंदूला खूप त्रास देत असतो. परिणामी शरीराला त्रास होतो आणि मनाला सुद्धा. कारण आपल्या मनाची शक्ती इतकी अफाट आहे की आपण याचा अंदाजा सुद्धा लावू शकत नाही. नकारात्मक विचाराने आपल्या अवतीभवती नकारात्मक उर्जेचा घेरा तयार होतो. रोज कोणत्या न कोणत्या अडचणी येत राहतात. किंवा असेही म्हणता येईल की चांगले जरी झाले तरी ते वाईटच दिसते.
म्हणून मन स्वच्छ ठेवा. आपल्या अवतीभवती सकारात्मक उर्जा तयार करा. हे अवघड वाटू शकते पण अशक्य असे काहीच नाही. तुमच्या फक्त उपस्थिती ने दुसऱ्यांना आनंद मिळाला पाहिजे. एवढेच आपण पाहायचे बाकी सगळे आपोआप होते. सकारात्मक रहा आणि आयुष्य सुंदर बनवा. आयुष्य खूप सुंदर आहे. एक एक दिवस आनंदाने जगा. मागचे सगळे विसरून जा. फक्त पुढे बघून चालत रहा. कारण जितके मागचे लक्षात ठेवाल तितका त्रास होणार.
पियुषा खरे – केळकर.
Leave a Reply