माझ्या मनाच्या कोपर्यांत, तू घर करुन असतोस
जरी मला वर्षातून एकदाच भेटतोस
लहरी तर इतका की, लहानासारखा रुसतोस
अन् ठरलेल्या वेळी यायचच टाळतोस,
पण आलास की, हळवा होऊन मला बिलगतोस,
म्हणून तर मला तू खूप आवडतोस
येताना ओंजळभर सुगंध आणतोस,
अधिर मनाला क्षणांत खुलवतोस.
कधी कधी भारीच हं, धसमुसळा वागतोस
अन् निलाजरेपणाने अंगचटीलाही येतोस,
पण आलास की,
गोड सार्या आठवणी जागवतोस
म्हणून तर मला तू खूप आवडतोस
गुपीत एक सांगते, जरा तू ऐकतोस?
विचारल्या प्रश्नाला उत्तर तू देतोस?
संसारी मी रमले तरी, तूच माझा सखा
तुझ्यासाठी आतूरलेली मी तुझी प्रेमिका
भेटीचा तुझ्या असा, ठेवू नं वेडा भरवसा?
वाट पाहात्येय तुझी लाडक्या पहिल्या पावसा
माझ्या लाडक्या पहिल्या पावसा
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply