भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे (‘सख्खे शेजारी’, काणे अण्णा)- बालपणीच्या माझ्या काही आठवणी
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे हयांचा वाढदिवस, जन्मदिन ७ मे चा. माझ्या भाचीचा वाढदिवस त्याच दिवशीचा ७ मे लाच. त्यामुळे त्यांचा वाढदिवस आपोआपच, सहज लक्षात रहातो. भाचीला आम्ही गंमतीने म्हणायचो, ‘‘त्यांच्या सारखी हुषारी पण हवी हं’’.
जर्मन, फ्रेंच भाषांवर त्यांचे प्रभुत्व ‘भाऊ दाजी’ व ‘झाला वेदांत’ पारितोषिकाचे मानकरी, डॉ. वकील, डी. लीट्, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु, राष्ट्रपती पुरस्कृत खासदार, ब्रिटीश सरकारतर्फे ‘महामहोपध्याय’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले.
लहानपणी फक्त एवढेच कळायचे की ते खूप विद्वान आहेत. दिवस-रात्र वाचन, लेखन करतात. History of Dharma Shastra हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. केवळ शिक्षण-संशोधन नव्हे तर सतत पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे अशी थोर, महान, विद्वान व्यक्ती आणि आमचे ‘सख्खे शेजारी’ वाडीतील आम्ही सर्व जण त्यांना ‘काणे अण्णा’ च म्हणत असू. राहण्याचे ठिकाण म्हणजे, अर्थातच, – सुप्रसिद्ध, आंग्रेवाडी, दुसरा मजला, वि. पी. रोड, रस्त्यावरची चाळ, गिरगाव, मुंबई.
कोर्टात, मुंबई विद्यापिठात व इतरत्र बाहेर जात असताना लाल पगडी, काळा कोट, पांढरे शुभ्र धोतर आणि पायात मोजडी असा पोशाख असे. घरात धोतर, सदरा आणि सदऱ्याच्या आत जानवं, सोन्याची फ्रेम असलेला गोल आकाराचा चष्मा, पांढऱ्या मिशा आणि गोरापान रंग. चेहऱ्यावर विद्वतेचे तेज. विविध क्षेत्रातील विद्वान, वकील, संस्थाचालक, इतर त्यांना नेहमीच भेटायला येत असत. पण मला लक्षात राहीलेली व्यक्ती म्हणजे पंडित दत्तो वामन पोतदार.
आम्ही सर्व मुलं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पकडा-पकडी खेळायचो. आमचा दुसरा मजला. त्यांच्या खोलीच्या पुढयात आम्ही आठ दहा जणं मोठया, मोठया आवाजात आरडा ओरड करायचो. खूपच आवाज वाढला, काही महत्वाचे ते लिहित असतील किंवा कोणी महत्वाची पाहुणे मंडळी आली असतील, तरच ते तिथून दुसरीकडे जायला सांगत. तेव्हा मात्र आम्हा मुलांना कधी कधी रागही येत असे.
त्यांच्या घरात मात्र अतिशय साधेपणा होता. त्यांच्या स्वत:च्या खोलीत त्यांच्या लाकडी हातवाल्या खुर्चीमागे दोन काचेच्या शोकेस. त्यात अनेक ग्रंथ, संस्कृत, इंग्रजी व इतर पुस्तके. खुर्चीपुढे भलं मोठं टेबल. टेबलावर लेखन साहित्य, पुस्तके, दौत व टांक सुद्धा असे. सिलींगपासून खाली टेबलाच्या वर वायरद्वारे लोंबणारा दिवा. टेबलाच्या पुढे भेटायला येणाऱ्या व्यक्तींसाठी दोन हातवाल्या भक्कम काळया लाकडी खुर्च्या. त्यांच्यापुढे लांबलचक बाकडं. भिंतीवर अनेक, प्रमाणपत्रांच्या फ्रेम्स् आणि शोकेसवर निरनिराळी पदके, ट्रॉफी. आम्ही मुलं ते घरी नसताना त्यांच्या खोलीत जाऊन सर्व गोष्टी उत्सुकतेने पाहायचो.
त्याकाळी त्यांच्या घरी पाईपगॅस होता. काणे काकू मातीच्या ओटयावर बसविलेल्या त्या शेगडयावर जमिनीवर बसून स्वयंपाक करायचा. आम्हा मुलांना श्रीखंडवडी तर कधी त्यांनी स्वत: बनविलेला वडया द्यायच्या. दरवर्षी ‘हरतालिकेची पूजा’ त्यांच्याकडेच असायची. संध्याकाळी मंगळागौरीचे खेळ व जागरण. तेव्हा आम्ही मुली छान छान परकर-पोलके घालून जायचो. रात्री पेढे, फुटाणे, बत्तासे, फळं व १२ वाजता कॉफीची मजा. गूळ खोबऱ्याचा नेवेद्य तर आमच्या खास आवडीचाच.
त्यांनी लिहिलेल्या पेपरांचे रस्त्यावरील दुकानातून मला वजन करुन आणायला ते कधी कधी सांगायचे. मला प्रश्न पडायचा की हे वजन कशासाठी करायला सांगतात? पण घरातील संस्कारांमुळे नाही म्हणायची हिंमतच नव्हती. पेपर्स परत त्यांना नेऊन दिले की हातावर श्रीखंडवडी हमखास मिळायची.
माझी आतेबहीण उषा पाटणकरला बी. ए. च्या परिक्षेत संस्कृत विषयात प्रथम आल्यावर ‘‘भाऊ दाजी’’ प्राईज मिळाले. काणे अण्णांना सुध्दा त्यांच्या B.A. परिक्षेच्या वेळी ‘‘भाऊ दाजी’’ प्राईज मिळाले होते. तिचा निकाल कळल्याबरोबर तिचे अभिनंदन करायला सकाळी ७ वाजता अतिशय उत्साहात आले. आपल्या शेजारीच असलेल्या मुलीला आपल्या सारखे प्राईज मिळाल्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला होता. चांगल्या कामाबद्दल दुसऱ्याचे कौतुक करण्याची त्यांची नेहमीचीच सवय होती.
१९६३ साली त्यांना प्राप्त झालेला ‘भारतरत्न’ पुरस्कार हा तर आमच्या वाडीतील एक अविस्मरणीय क्षण. सर्वांच्याच हृदयात कोरला गेलेला एक आनंद देणारा प्रसंग. सकाळ पासूनच पाहुणे, परिचित, नातेवाईक, फ्रोटोग्राफर्स् नुसती रीघ. प्रत्येक जणांनी नमस्कार केल्यावर प्रत्येकाच्या हातावर एकेक पेढा.
असा हा अनमोल कोहिनूर हिरा. ‘अतिपरिचयात अवज्ञा’ मात्र कधीच घडली नाही. अशा विद्धान व जगप्रसिद्ध व्यक्तीला अनेक वर्षे इतकं जवळून पहाणं त्यांचा आसपास वावरायला मिळणं हे सुद्धा भाग्य लागतं आणि ते भाग्य आमच्या सर्व कुटुंबियांना मिळालं हयाचा आम्हाला आनंद तर आहेच पण अभिमानही. जगाच्या दृष्टीने ‘भारतरत्न’ तर आमच्या दृष्टीने त्यावेळी होते ते ‘‘काणे अण्णा’’
— सौ. वासंती गोखले
Leave a Reply