लहानपणी आई बाळाला जोजावते. अंगाईगीत गाते. पाळण्यात. मांडीवर झोपवते. धपाधपा पाठीवर डोक्यावर थोपटून. कारण ते लवकर झोपावे म्हणून. सक्तीने. पुढे लेकरानं चार घास जास्त खावेत म्हणून काऊ चिऊची गोष्ट. घरातील एकेका व्यक्तीचे नाव घेऊन त्याचा घास असे म्हणत खाऊ घातले जाते. एवढेच नव्हे तर चांदण्यात. घराच्या अंगणात माडीवर आणि पदार्थ तर काही विचारु नका. सारखे बदल केला जातो हे सगळं केलं जातं पण ते सक्तीने…
आता वयाच्या एका टप्प्यावर आले की सगळेच बदलून जाते. आता तो काय लहान आहे का? आपण काय खायचे किती खायचे कधी खायचे हे सगळे समजले पाहिजे. आणि खरय अगदी या वयात कुणी काही सांगितलं तरी पटत नाही. त्यामुळे ज्याला जसे हवे तसेच वागणार. हेच तर वय असते काय काय आणि किती किती चवीचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची चव घेऊन मन तृप्त होते. खवय्ये होतो. पण आणि विषेश करुन बायकांना बऱ्याच गोष्टी पाळायला लागतात. कारण त्यांना खूप गोष्टींची जबाबदारी पार पाडावी लागते. मातृत्व आले की तर सगळेच बदलून जाते. त्यामुळे सक्तीने का होईना ऐकावे लागते..
आता शेवटच्या टप्प्यात वय आजार परावलंबित्व घरातील वातावरण स्वतःच्या घरात सगळे भावी पिढी वर सोपवून अलग रहावे लागते म्हणजे घरातच पण आपल्या वेगळ्या प्रकारे. आणि परत सुरु होते. सक्तीने करणे. रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. तरीही झोपा. जेवण आवडनिवड म्हणायचे नाही. जे पदार्थ आवडतात त्यावर बंदी घातली जाते. तरीही खा. म्हणून हे द्या ते देण्याची सक्ती करायची नाही. त्यामुळे जे दिले जाते ते मुकाट्याने खायचे. सक्तीने. कारण ज्या वेळी आपल्याला वाटत असतं की आता झोपी जाव. कधीकधी उठावे वाटत नाही. अगदी कणकण असेल तेव्हा. पण उठावे लागते. घरातील कामे करावी लागतात. कधीकधी वाटायचं आयता चहा जेवण आणि भरपूर झोप मिळावी यासाठी जीव आसुसलेला असतो तेंव्हा मिळत नाही आणि कधी कधी तर असं वाटायचं की एका जागी निवांत बसून रहावं कितीही वेळ अगदी स्वतःला कंटाळा येई पर्यंत कुणालाही न बोलता. आणि आता दिवसातील कित्येक तास एका जागी बसून रहावे लागते. कुणाशी तरी बोलावं वाटतं. हे त्या वेळी वाटलेले आज होत आहे आता मात्र वाईट वाटतं. मी तर कुणाच्याही आधाराशिवाय उठून बसू शकत नाही. त्यामुळे हे सगळेच सक्तीचे झाले आहे. जेंव्हा हे सगळं मिळतं तेव्हाही ते ही अशा अवस्थेत की नको वाटतं आणि आता खूप उशीर झालेला असतो म्हणून गप्प बसावे लागते. तेही सक्तीने….
-सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply