पटकथा आणि संवादलेखन सलीमखान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. सलीम खान यांनी जरी फार कमी काळ या सिनेसृष्टीला दिला तरी त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव नेहमीसाठी घेतले जाईल.
कितने आदमी थे” – शोले
“मेरे पास मां है”, – दिवार
“डॉन को पकडना मुश्कील हि नाही नामुमकीन है”… या सारखे संवाद सिनेसृष्टीत अजरामर झालेले आहेत. पण या संवादाचे लेखक शेवटपर्यंत एकत्र राहू शकले नाही ही मात्र सिनेसृष्टीसाठी शोकांकीता ठरली. आज ही अनेकांना वाटते सलीम-जावेद ही एकच व्यक्ती आहे, पण तसे नसून या ‘दोन व्यक्ती’ ‘सलीम खान’ आणि ‘जावेद अख्तर’ आहेत. ‘सलीमखान’ यांचे पूर्वज हे अफगाणिस्तान येथील ‘अल्कोझाई’ या कबिल्यातील आहेत. ते भारतातील इंदोर या शहरात वास्तव्यात आले. ‘सलीम खान’ आणि ‘ताराचंद बडजात्या’ हे शेजारी राहणारे आणि त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. ‘सलीम खान’ यांचा जन्म इंदोर येथे एका सुखवस्तू घराण्यात झाला होता.
लहानपणापासूनच ऐशोआरामाच्या सर्व गोष्टी त्यांच्या जवळ होत्या. अगदी कॉलेज मध्ये असताना त्यांना क्रिकेटचा पण खूप शौक होता. त्यांचे व्यक्तिमत्व पण एखाद्या नायकापेक्षा काही कमी नव्हते. तसे बघितले तर त्यांचा अभिनयाशी काही एक संभंध नव्हता पण तरीही ते अभिनयाकडे ओढले गेले. अशाच एकावेळी ताराचंद बडजात्या यांच्या कडील एका विवाहाप्रसंगी इंदोर येथे मुंबईतून आलेल्या सिनेसृष्टीतील काही निर्मात्यांसोबत परिचय झाला, त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला भाळून प्रसिद्ध दिग्दर्शक ‘के अमरनाथ’ यांनी सलीम खान यांना मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी आमंत्रित केले. त्याकाळात त्यांनी चारशे रु महिना मानधन पण देऊ केले तेव्हा काहीसे अचंबित झालेले ‘सलीम खान’ त्यासाठी तयार झाले. जेव्हा स्टेशन वर आले तर तेव्हा त्यांच्या भावाने म्हंटले कि मुंबईत तर तू चालला आहेस पण कधीही घरी निरोप देऊ नको कि मला पैसे पाठवा आणि मी परत येतो. तेव्हाच त्यांचा निर्णय पक्का झाला कि आता तर काही नक्कीच करून दाखवावे लागेल.
कसेबसे मुंबईत राहून त्यांनी अभिनयाचा निवडलेला मार्ग काही जम बसू देत नव्हता. तब्बल सात वर्ष अभिनय करून सुद्धा हवे तसे यश येत नव्हते. या दरम्यान त्यांनी ‘तिसरी मंझील’, ‘सरहद्दी लुटेरा’ आणि ‘दिवाना’ मध्ये काम केले होते. साठ चे दशक संपत चालले होते पण यश पदरात येत नव्हते आणि अपयशाचे शिखर समोर दिसत होते त्यावेळेस त्यांनी संवाद लेखक म्हणून काम करायचे ठरविले, तेव्हा त्यांनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता कि आपली जोडी ही ‘जावेद अख्तर’ नावाच्या इसमासोबत होईल आणि हे नाव इतिहासात अजरामर होईल. सलीम-जावेद यांनी जवळपास बारा वर्ष एकत्र काम केले या दरम्यान त्यांनी २८ चित्रपटांसाठी पटकथा आणि संवादलेखन केले त्यापैकी वीस चित्रपट सुपरहिट झाले होते. ‘यादो कि बारात’, ‘जंजीर’, ‘क्रांती’, ‘हाथ कि सफाई’, ‘दिवार’, ‘शोले’ आणि ‘मि. इंडिया’ सारखे हिट चित्रपट दिलेत.
या दरम्यान त्यांनी केवळ आपले करियर विकसित केले नाही तर त्यांनी पटकथा लेखक यांनी सुद्धा मानाचे स्थान दिले. त्याआधी पटकथा लेखक यांचे नाव पोस्टर वर कधीच झळकत नव्हते. पण सलीम जावेद यांच्यामुळेच संवाद आणि पटकथा लेखक यांना मानाचे स्थान मिळाले. १९८२ साली ही जोडी वेगळी झाली तेव्हा हे स्पष्ट झाले कि ‘सलीम खान’ हे तयार नव्हते पण ‘जावेद अख्तर’ यांच्या मनात काही वेगळेच होते. जोडी तुटल्यानंतर सलीम खान यांचे मन या करियर मधून पूर्ण उतरून गेले आणि त्यांनी जवळपास याला रामराम ठोकला होता. पण त्यानन्तर त्यांना अनेक प्रश्न विचारल्या गेलेत, त्या प्रश्नांना उत्तर देणे तर भागच होते. मग त्यांनी एक जबरदस्त स्क्रीप्ट तयार केली आणि तो चित्रपट आला, केवळ एकट्या सलीम खान ने पटकथा लिहिलेला “नाम”. ‘संजय दत्त’ आणि ‘कुमार गौरव’ यांनी अभिनित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
सलीम खान यांनी एका ‘मराठी राजपूत’ महिलेसोबत विवाह केला त्यांचे नाव होते ‘सुशीला चरक’. लग्नानंतर त्यांनी हे बदलवून ‘सलमा खान’ असे ठेवले. सलमान खान या दोघांचा मुलगा. सलीम खान स्वतः मुस्लीम असताना सुद्धा त्यांनी घरातील वातावरण अगदी मोकळे ठेवले म्हणूनच त्याच्या घरात आजही गुढी पाडवा, गणेशउत्सव आणि दिवाळीचा सण धुमधडाक्यात होतो. ८० च्या दरम्यान प्रसिद्धी तर मिळाली होती पण त्याच दरम्यान त्यांचे त्याकाळची प्रसिद्ध नर्तिका ‘हेलेन’ वर प्रेम बसले. त्यावेळच खूप गाजावाजा झाला पण असे ठरले होते कि जर सलमा खान यांची अनुमती असेल तरच हे लग्न होणार त्यामुळे काहीशा तणावानंतर या लग्नाला ‘सुशीला चरक’ यांनी अनुमती दिली. आजही या दोघी एकाच घरात सुखाने राहतात.
हेलेन यांना कोणतीही संतती नसल्यामुळे त्यांनी एक कन्या दत्तक घेतली, आणि ती त्या परिवारातील लाडकी कन्या ठरली. तिचे नाव ‘अर्पिता खान’ ठेवल्या गेले. तिचे अर्पिता हे नाव कुणी आणि कसे ठेवले, याविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे. सलमानच्या या लाडक्या बहिणीचे ‘अर्पिता’ हे नाव प्रसिद्ध व्यंगचित्रकार शरद जोशी यांनी ठेवले आहे. अर्पिताला सलमानचे वडील सलीम खान यांनी १९८१ मध्ये दत्तक घेतले होते. त्यावेळी सलीम खान यांच्यासोबत इंदूर येथील होळकर कॉलेजमधील त्यांचे मित्र शरद जोशी हजर होते. तेव्हा सलीम यांनी शरद जोशींकडे आपल्या मुलीचे नाव ठेवण्याची विनंती केली. शरद जोशी यांनी सलीम खान यांना म्हटले की, ही मुलगी तुम्हाला अर्पित झाली आहे, त्यामुळे हिचे नाव ‘अर्पिता’ ठेवायला पाहिजे. अशाप्रकारे ही अनाथ मुलगी सलीम खान यांची मुलगी ‘अर्पिता खान’ झाली.
एक पिता म्हुणुन त्यांनी जसे आपले कुटुंब जोपासले तसे ते एक चांगले व्यक्तित्व म्हणून पण समोर आले. जास्त प्रसिद्धीचा हव्यास न करता आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने या देशाचे जेष्ठ आणि सेकुलर व्यक्तीची प्रतीमा कायम राखली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ शशांक गिरडकर
Leave a Reply