१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.
त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- “अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।”
पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलावलं. आणि म्हणाले, “साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही”. असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.
मग साहीरजींनी तो शेर ऐकवला –
“एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।”
आणि साहीरजींचा शेवटचा “जी” पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.
“एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी
सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जीवालागी जळती कशाला?
अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी”.
ह्यातील ‘झुंझुरता’ ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.
आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.
Leave a Reply