साल्व्हादोर पोर्ट मध्ये गेल्यावर जहाज लगेच जेट्टी वर जात नसे तीन चार दिवस जेट्टी पासून बाहेर समुद्रात नांगर टाकून उभे राहावे लागत असे. आजूबाजूला आणखी चार पाच जहाजे उभी असायची. ब्राझिल मध्ये असल्याने जहाजावरुन किनाऱ्यावर जायला लगेच बोट मागवली जायची बोटचा खर्च कमी असल्याने कॉन्ट्रीब्युशन वगैरे काढून केला जात असे .
आमच्या जहाजाची सिस्टर शिप म्हणजे कंपनीचे दुसरं जहाज ज्याची बनावट एकदम जशीच्या तशी अगदी आमच्या जहाजासारखीच होती, जहाज हे स्त्रीलिंगी असल्याने एकाच जहाज निर्मात्या कडून एकाच बनावटीच्या किंवा जुळ्या असलेल्या जहाजांना सिस्टर शिप असे बोलले जाते. अशा जहाजांवरील उपकरणे आणि सर्व प्रकारच्या मशिनरी आणि इतर भाग आयडेंटिकल म्हणजेच एकसारखेच जिथल्या तिथेच असतात. अशी आमची दोन्ही जहाजे ब्राझीलच्या स्थानिक ऑईल कंपनीशी पाच वर्षांकरिता करारबद्ध होती. त्यामुळे या दोन जहाजावर अधिकारी आणि खलाशी आलटून पालटून पाठवले जात असत, ब्राझिल मध्ये जाण्यासाठी पोलिस क्लियरांस सर्टिफिकेट आणि विजा वगैरे अशा एक ना दोन बऱ्याच भानगडी असल्याने कंपनी कडून ठराविक अधिकाऱ्यांना व खलाशांना पुन्हा पुन्हा या जहाजावर पाठवावे लागत असे. आमची जहाजं ठराविक पोर्ट मध्येच कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी जात असत त्यामुळे जवळपास सगळ्या अधिकाऱ्यांना व खलाशांना प्रत्येक पोर्ट मध्ये कुठे काय चांगलं आहे किंवा मिळतं याची चांगली माहिती झाली होती.
सकाळी दहा किंवा अकरा वाजता एक बोट जहाजावरील काही जणांना घेऊन जात असे व पाच सहा वाजता पुन्हा घेऊन येत असे त्याच बोट मध्ये पुन्हा काही जण जात व रात्री अकरा बारा वाजता परत येत असत. जहाज जिथे नांगर टाकून उभे असायचे तिथून संपूर्ण साल्व्हादोर शहर दिसायचे. एका मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले साल्व्हादोर शहर समुद्रात उभ्या असलेल्या आमच्या जहाजावरुन खूप आकर्षक दिसायचे. समुद्र किनाऱ्यावर जसे बिचेस असतात वाळू असते तसा प्रकार साल्व्हादोर शहरा जवळ नव्हता. बीच होते पण शहरापासून लांब होते. डोंगरकडा एकदम समुद्रात उतरल्या सारख्या दिसायच्या. फक्त एका ठिकाणी शहरात समुद्रातून प्रवेश करता येईल असा भाग होता, तिथे लहान मोठ्या स्पीड बोट व शिडाच्या कितीतरी होड्या बांधलेल्या असायच्या. लहानशा पण सुंदर आणि पॉश यॉट्च पण उभ्या असलेल्या दिसायच्या. त्यांच्या पलीकडे जुनाट व ओबडधोबड दिसणाऱ्या मासेमारी बोटी पण उभ्या असायच्या. खरं म्हणजे पॉश यॉट्च आणि महागड्या स्पीड बोट यांच्यासाठी राखीव जागा होती लाकडाच्या फळ्यानी बनवलेल्या पुलांनी सगळ्यांना पार्किंग लॉट मध्येच उभे केले असल्यासारखे वाटायचे. जहाजावरुन छोट्या बोट मध्ये बसून आठ दहा जण आलो की शहरात जाताना सगळे जण अमेरिकन डॉलर्स ब्राझिल च्या रियाल या चलनात बदलवून घ्यायचे पैसे मिळाले की मग दोन चार जण ग्रुप मध्ये जाऊन शहरभर फिरायचे संध्याकाळी जहाजावर घेऊन जाणाऱ्या बोट साठी दहा मिनिटे अगोदर येऊन थांबायचे. शहरात जाताना आठ दहा जणांना बघून सगळ्यांच्या माना आमच्याकडे वळायच्या, कोणीतरी फॉरेनर आलेत म्हणून कुतूहलाने आमच्याकडे सगळे बघत बसायचे. डोंगराच्या पायथ्याशी शहर वसलेले असल्यामुळे वर वर चढायला लागत असे. काही ठिकाणी शहराच्या वरच्या भागात जाण्यासाठी लिफ्ट लावलेल्या होत्या कुठे कुठे जिने होते ज्यामुळे नागमोडी रस्त्यावरून चालत न जाता अंतर कमी होत असे. शहराचे सिटी सेंटर म्हणजे मध्यवर्ती ठिकाण होते तिथे संपूर्ण दगडी बांधकाम केलेले एक मोठे चर्च होते. चर्च च्या समोर भलेमोठे चौकोनी प्रांगण होते. एकावेळी पाच हजार लोक राहू शकतील एवढ्या मोठ्या प्रांगणात आयता कृती घडवलेले दगड बसवले होते. सिटी सेंटर उंचावर असल्याने शहराचा इतर भाग व समोर निळा अथांग समुद्र नजरेत मावेनासा होत असे. पाठीमागे उंच डोंगर आणि त्यावर असलेली दाट हिरवीगार झाडी आणि मध्ये मध्ये दिसणारे टुमदार बंगले अत्यंत देखणे दिसायचे. वरून अथांग समुद्र दिसत असला तरी त्यामध्ये आम्ही आमचं तरंगणारे जहाज बघूनच जास्त खूष व्हायचो. शहरातील बरेचसे रस्ते घडाई केलेल्या दगडांनी बनवलेले होते. घडाई केलेल्या दगडांनी बांधलेले रस्ते किती जुने असतील याची कल्पना नव्हती पण त्यांच्याकडे बघून पुढील शेकडो वर्ष तरी एकही खड्डा न पडता टिकतील याची खात्री वाटत होती. बहुतेक जेव्हा पोर्तुगिजांनी ब्राझिल वर राज्य केले तेव्हा स्थानिक आणि आफ्रिकन गुलामांकडून त्यांनी हे दगडांचे रस्ते आणि इमारती बनवून घेतल्या असाव्यात. आपल्या कडे सुध्दा ब्रिटिशांनी मुंबईत घडाई केलेले दगड वापरून बांधलेल्या इमारती आजही जितक्या मजबूत आणि आकर्षक आहेत तितक्याच पोर्तगिजांनी ब्राझिल मध्ये बांधलेल्या इमारती आणि रस्ते मजबूत आणि आकर्षक असल्याची जाणीव होत होती. चर्च समोरील चौकोनी प्रांगणात एक मोठा स्टेज उभारला होता त्या स्टेजवर रात्री लाईव्ह कॉन्सर्ट ची तयारी सुरू होती मोठमोठे स्पीकर्स आणि वाद्ये जुळवली जात होती. ब्राझिलियन लोकांना संगीताचे भयंकर वेड त्यातल्या त्यात रस्त्यावर किंवा बाहेर लाईव्ह बँड किंवा असे मोठमोठे कॉन्सर्ट नेहमी बघायला मिळतात. संध्याकाळी साडे चार वाजल्यानंतर जहाजावर परत जाण्यासाठी सकाळी जिथे बोट ने आलो तिथे परत जाण्यासाठी निघालो. जहाजावर पोचल्यावर रात्रीचे जेवण करून डेकवर बाहेर येऊन बघितलं तर कॉन्सर्ट चा आवाज जहाजपर्यंत पोहचत होता, तिथली रंगीबेरंगी लाईट आकाशात चमकताना दिसत होती. साल्व्हादोर शहरातील स्ट्रीट लाईट मुळे डोंगरावर नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते त्यांच्यावरून धावणाऱ्या फोर व्हीलर चे हेड लाईट आणि एकूणच साल्व्हादोर शहर पिवळसर उजेडात न्हाऊन निघाल्या सारखे दिसत होते.
दोन दिवसांनी जहाज नांगर टाकला होता तेथून आत पाच मैलांवर असलेल्या जेट्टिवर कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी गेले. जेट्टिच्या समोरच एक छोटेसे बेट होते त्या बेटावर गच्च हिरवीगार झाडी आणि बेटावरील सर्वात उंच भागावर एक छोटेसे पण पांढऱ्या रंगाने रंगवलेले पांढरे शुभ्र चर्च होते. या बेटावर जाण्यासाठी लहान लहान लाँचेस मधून खूप लोकं ये जा करत होती. जहजावार उभे असणाऱ्या खलाशांकडे हात हलवत होते तर कोणी जहाजाचे फोटो घेत होते.
साल्व्हादोर हुन जहाज निघाले आणि फोर्तालिझा या पोर्ट कडे रवाना झाले होते. चौथ्या की पाचव्या दिवशी सकाळी सकाळी जहाज फोर्तालिझाच्या जेट्टीवर बांधण्यात आले. जहाजावरुन फोर्तालिझा शहराला लाभलेला लांब लचक आणि पांढऱ्या शुभ्र किनारा दिसत होता. शहरात जाण्यासाठी दीड किलोमीटर जेट्टीवर चालत जाऊन येताना तेवढंच पुन्हा चालत यावं लागेल म्हणून कोणीच जायला तयार नव्हतं अकरा वाजता उन्हाचा चटका लागत असून देखील मी आणि एक मोटर मन असे दोघेच बाहेर पडलो. रस्त्यापर्यंत चालत आल्यावर बस ने शहरात गेलो. शहर मोठे होते पण त्यामानाने लोकसंख्या कमी होती. तरीपण तिथले रस्ते चार पदरी रस्त्याच्या मधोमध आणि दोन्ही बाजूला मोठं मोठी झाडे आणि एका बाजूला समुद्र किनारा. बस मधून जाताना कितीतरी वेळ जहाज आणि समुद्र दिसत होता. अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असं फोर्तालिझा शहर फिरून झाल्यावर पुन्हा जहाजावर परतलो. जहाजावरुन तिन्ही बाजूला निळा समुद्र आणि एका बाजूला इतका स्वच्छ आणि सुंदर किनारा यापूर्वी आणि नंतर कधी पहिल्याचे आठवत नाही. रात्री उशिरा जहाज निघाले, जाताना फोर्तालिझा शहराच्या पिवळसर लाईट दिसत होत्या तासाभरात लाईट दिसेनाश्या झाल्या पण आकाशात फोर्तालिझा शहराच्या लाईटचा पिवळेपणा उतरला होता. काही वेळाने तो सुध्दा दिसेनासा होत गेला.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E.(mech),DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply