अस्वस्थता, तणाव, चिंता, संताप, अगतिकता या शब्दांचे अर्थ आणि परिणाम हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. कारण अशा परिणामांची अनुभूती आपल्यापैकी बहुतेकांनी अनेक वेळा घेतली असेल. या अनुभूतीनंतर ज्याला पुनप्रत्यय म्हणतात, तो जसाच्या तसा असत नाही. अत्यंत विदारक अनुभवही कधी काळी आठवल्यानंतर हसू येऊ शकेल. वेदना सहन करणं आणि त्या आठवणं यात जे अंतर तेच अशा पुन्हा घेतलेल्या अनुभूतीमध्ये असू शकेल. या पार्श्वभूमीवर समाधान या शब्दाच्या अनुभवाचं काय ? एका क्षणाला लाभलेलं समाधान कालांतरानंही समाधानाच्याच पातळीवर राहू शकतं का? मला वाटतं, हा अनुभव व्यक्तिपरत्वे बदलत असावा. मला मात्र आठवतं तो प्रसंग आताच घडला आहे, असं अजूनही वाटतं आणि त्या समाधानाची तीव्रता बिलकूल कमी झालेली जाणवत नाही.
पत्रकारितेतल्या कामाचे माझे ते प्रारंभीचे दिवस होते. वृत्तसंकलन आणि वृत्तसंपादन या दोन्हींचा सराव अन् अनुभव असल्यानं माझ्या संस्थेत मला वेगळंच स्थान लाभलेलं होतं. खरं तर त्यामुळं माझ्यावरची जबाबदारी वाढलेली होती. त्या काळात रविवारच्या अंकाचं काम म्हणजे फारसा तणाव नसलेलं काम. स्वाभाविकपणे रविवारच्या अंकासाठी म्हणजे शनिवारी फारच मोजके सहकारी कामावर असत. त्या दिवशी शनिवार होता आणि रात्रपाळीची जबाबदारी माझ्याकडे होती. रात्री आठ वाजता काम सुरू होई आणि पहाटे तीनला संपे. शुक्रवारी सुटी घेतलेली होती. सलगपणे दोन दिवसांच्या सुटीचा आनंद घेण्याची ती संधी होती. गुरुवारी मला माझ्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला, “आकाशवाणीसाठी `जिल्हादर्शन’ या मालिकेचा अर्ध्या तासाचा एक कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी शुक्रवार-शनिवार सोलापूरला जायचंय. मला तर ते शक्य होईलस नाही. तू जाशील? शिवाय एका कार्यक्रमाचे दोनशे रुपये मिळतील, लगेचच.” मित्रानं अडचण मांडली, संधी उपलब्ध करून दिली आणि मोहही! मी पट्कन हो म्हटलं. का? याचा आज विचार केला तर वाटतं, पैशाची गरज आणि मोह दोन्ही प्रभावी ठरले असावेत. त्या काळात पत्रकाराचं वेतन शेकड्यात असे. हजारात नव्हे. शुक्रवारी पहाटे आम्ही सोलापूरसाठी रवाना झालो. आकाशवाणीचे अधिकारी सुरेंद्र तन्ना, शशी पटवर्धन अन् मी. गाडी अर्थातच आकाशवाणीची. दिवस तर छान सुरू झाला होता. शशीचं मार्दवी बोलणं, त्याच्या साहित्यिक आठवणी, सुरेंद्रची डाव्या विचारानं जाणारी माहिती अशा गप्पा रंगल्या. सोलापूरला सुधीर पिंपरकर या स्थानिक जाणकाराची मदत घेतली आणि `सोलापूर ः एक गिरणगाव’ असा एक छान कार्यक्रम तयार झाला. काही मुलाखती, काही गाणी, काही संदर्भ, गिरण्यांच्या भोंग्यांचा आवाज… सारं कसं छान जमलं होतं. शनिवार दुपारपर्यंत काम संपवून आणि परतीच्या वाटेवर लागलो होतो.
कोणीतरी म्हणालं, “पेट्रोल भरून घ्यावं का?” दुसरा म्हणाला, “नको, बाहेर गेल्यावर पाहू.” या संवादाकडे विशेष लक्ष द्यावं असं काही नव्हतं. सोलापूर सोडल्यानंतर पन्नास एक किलोमीटरवर गाडी पेट्रोलपंपावर आली. त्या काळी सरकारी गाडीत उधारीनं पेट्रोल भरलं जायचं. म्हणजे ड्रायव्हरनं स्लिप भरून द्यायची, पेट्रोल घ्यायचं. मग पेट्रोलपंपाचा चालक ते बिल मंजुरीसाठी पाठवीत असे. केंद्र सरकारची गाडी आहे, असं सांगूनही तो पंपवाला पेट्रोल देईना. पुढे पाहू म्हणून आम्ही निघालो. चौफुल्यापर्यंत दोन-तीन पेट्रोलपंप पाहिले; पण तिथं पेट्रोलच नव्हतं. पेट्रोलचा काटा `ई’कडे झुकला होता. अखेर काही अंतरावर गाडी बंद पडली. पेट्रोल संपलं होतं. आता काय, हा प्रश्न होता. आम्ही प्रत्येकानं पैसे जमविले तरी पेट्रोल तर मिळायला हवं. सायंकाळचे साडेसहा झाले होते. आठला… उशिरात उशिरा साडेआठला कामावर जायला हवं होतं. इथं अडकून पडलेलो होतो. त्या काळी मोबाईल तर नव्हतेच, शिवाय एसटीडीला किमान तासभर तरी जायचा. काय करावं, विचार केला. आपण आता पोहोचत नाही; पण पोहोचण्याचा प्रयत्न तर करायला हवा. मी गाडीतून उतरलो. म्हणालो, “मी निघतो. मला जायला हवं.” अन् मी निघालो पायी. दोन एक किलोमीटर चाललो असेल. मागून एक ट्रक आला. तो माझ्याजवळ थांबला. शशी खुणावत होता, वर ये. मी ट्रकमध्ये बसलो. तेथून थोड्याच अंतरावर पंप होता. तिथं शशी उतरला. मी ट्रकनं पुढे निघालो. आता आपण वेळेत पोहोचू, असं वाटू लागलं होतं. ट्रक स्वारगेटला थांबणार होता. तिथून ऑफिसला जायचं होतं. पेट्रोलसाठी खिशातले सारे पैसे (थोडेच) देऊन टाकलेले होते. म्हणजे तिथून ऑफिसला पायी पोहोचायचं तर किमान अर्धा तास. विचार सुरू होता. हडपसर आलं होतं. पावणेआठ होत आले होते. एवढ्यात एक गाडी ट्रकच्या पुढे येऊन थांबली. ट्रकला थांबणं भाग पडलं. हो, ती आमचीच, आकाशवाणीची गाडी होती. मी ट्रकमधनं उतरलो, गाडीत बसलो. वेळेत म्हणजे आठ वाजून पाच मिनिटांनी मी ऑफिसमध्ये पोहोचलो होतो. मला पोहोचायचंच होतं…. ते कठीण नव्हे अशक्य होतं. तरी मी पोहोचलो होतो. त्या वेळी जो समाधानाचा सुस्कारा सोडला तो उसासा अजूनही जसाच्या तसा आठवतो. त्या समाधानाचं रूपांतर काळाच्या पलीकडे गेलेल्या आठवणीत अद्याप तरी झालेलं नाही.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply