नवीन लेखन...

समज गैरसमज

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भल्या सकाळी सहाच्या सुमारास आमच्या घराची बेल वाजली. घरी सर्वांची नीजानीज झाली होती. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघणे आणि मग सकाळी उजाडेपर्यंत ताणून देणे हा आमच्या घरचा शिरस्ता. पहाटे दूधवाल्याने झोपमोड करु नये म्हणून आमच्या दाराला पिशवी बांधलेली असते. या पिशवीतले पैसे दूधवाल्याने न्यायचे आणि पिशवीत दूधाच्या पिशव्या ठेवायच्या. एवढया सकाळी दरवाजात कोण उपटल असा विचार करत मी चरफडत दार उघडलं. बघतो तो समोर कुणी पोसवदा मुलगी उभी. “कचराऽऽ” ती केकाटली. इथे मी हैराण. एवढया सकाळी कचरेवाली! आणि हे नवीन बांडगूळ कोण? ती नेहमीची म्हातारी कुठे गेली? म्हातारीवरनं लखकन् आठवलं. गेले दोन दिवस कचरा न्यायला कुणी आलेलं नाही याची सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार करा म्हणून कालच बायको करवादत होती. मी अर्धवट दार उघडं ठेवून किचनमध्ये आलो आणि आटयाखालचं डस्टबीन उपडं केलं. बिछान्यात आडवं होताना अर्धवट झोपेत असलेल्या बायकोनं कोण आलं होतं याची चौकशी केली. “कोण मुलगी कचरा न्यायला आली होती.” मी आणि पांघरुण अंगावर ओढलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच प्रकार. हा काय उच्छाद आहे? आता ही बया रोज सकाळी एवढया लवकर झोप मोडायला येणार की काय? उद्या जर पुन्हा ही अशी सकाळी उगवली तर तिला झापायचं असं ठरवून मी बेडरुममध्ये शिरलो. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सहाच्या सुमारास बेल वाजली. मी ओळखले ती कचरेवाली असणार. आता बघतोच हिला बरोबर. मी घुश्यातच दार उघडलं.

“काय गं, रोज सक्काळी सक्काळी काय उच्छाद आहे तुझा? आणि ती म्हातारी कुठे गेली. बिचारी कचरा न्यायला नऊदहा वाजता येते, आणि तू आपली सकाळ उजाडताच दरवाजात हजर.” मी गरजलो.

‘साहेब, शाळेत जायचं असतं मला. म्हातारी आजारी आहे, बाप कामाला जातो. तुमचा कचरा उरकून मी शाळेत जाते. सकाळी सातची शाळा. म्हणून लवकर यावं लागतं.’

मी हबकलोच. एवढया सकाळी लोकांचा कचरा उपसण्याचं काम उरकून ही मुलगी शाळेत जाते. आणि मी सकाळी सहाला उठावं लागतं म्हणून हैराण? मला शरमल्यासारखं झालं. त्यानंतर पुन्हा कधी मी त्या मुलीवर खेकसलो नाही. या मुलीसाठी आपण काहीतरी करायलाच हवं हा विचार मनात घोंघावू लागला. एका रविवारी मी तिच्या बापाला बोलावून घेतलं. मुलीला शाळेसाठी वह्या, पुस्तकं, कंपासपेटी जे काही लागेल ते मी देत जाईन असं सांगून पत्नीला खास बाजारातून त्या मुलीसाठी आणायला लावलेले दोन फ्रॉक्स मी तिच्या हातावर ठेवले. नेमकं काय घडलंय ते जाणून घेण्याआधी अनुमान काढण्याचा आणि त्यावर नको ती प्रतिक्रिया उमटवण्याची छोटीशी चूक माझ्या हातून घडली होती. या अल्पशा अपराधाचं ओझं दूर लोटण्यासाठी मी त्या मुलीला मदत करण्याचा पर्याय निवडला. कालांतराने म्हातारी आजारातून उठली. मुलीचं सकाळी दार ठोठावणं बंद झालं. दैनंदिन कार्यक्रमात त्या विषयाला पूर्णविराम मिळाला.

असाच काहीसा प्रकार मी पुन्हा एकदा अनुभवला. अर्थात एका वेगळ्याच सिच्युएशनमध्ये आणि एका वेगळ्याच व्यक्तीबरोबर. प्रथम गैरसमजूतीतून मनस्ताप करुन घेणे, आणि वस्तुस्थिती आल्यानंतर आपण चुकीचे अनुमान काढले याची रुखरुख लागून राहणे हे दोन्ही प्रसंगातले समान सूत्र. त्याचं झालं असं की आम्ही घरी इंटिरिअर डेकोरेशनचं काम काढलं होतं. प्रथम बेडरुम सजवून घेतली. मग हॉल झाला आणि शेवटी किचनकडे वळलो. सर्व कामासाठी आम्ही इंटिरिअर डिझायनर नेमला होता. काम करणारे कारागीर त्यानेच आणले होते आणि त्याच्याच देखरेखीखाली काम सुरु होतं. किचनचं काम निघाल्यावर आधुनिक स्वरुपाच्या स्टीलच्या ट्रॉलीज बनविण्याचा विषय निघाला. आमच्या डिझायनरने कोणाला हे काम सांगायचं ते ठरवलंच होतं. तेवढयात एका वर्तमानपत्रामध्ये एक महाराष्ट्रीय महिला हेच काम करीत असल्याचा लेख मी वाचला. माझी उत्सुकता वाढली. आपल्या घरचं काम ह्याच बाईंना सांगितलं तर? महाराष्ट्रीय उद्योजक महिला म्हंटल्याबरोबर पत्नीने त्या महिलेकडेच काम सोपविण्याचा आग्रह धरला. आमची ओळख झाल्यावर आम्ही त्यांना आमच्या महिला मंडळात त्यांचे अनुभव सांगण्यासाठी बोलवू पर्यंत तिची मजल गेली. मी तिच्या उत्साहाला आवर घातला आणि आणखी एका महिलेकडून एस्टीमेट काढून घ्यायला काय हरकत आहे? असा
युक्तिवाद करुन डिझायनरची कुरबूर आटोक्यात आणली.

ठरलेल्या दिवशी ठरल्या वेळी बाई आमच्या घरी आल्या. आमचा डिझायनर घरी हजर होताच. त्याच्या डिझाईनमध्ये बाईंनी काही बदल सुचविले. त्यांचा या विषयातला अभ्यास गाढा आहे हे आम्हा सर्वांच्याच ध्यानात आलं. काही दिवसांनी त्यांचं एस्टिमेट घेऊन त्यांचा सहकारी आमच्या घरी आला. बाई का नाही आल्या विचारल्यावर त्या जरा दुसऱ्या कामात अडकल्या आहेत असं उत्तर मिळालं. आम्हाला तेव्हा यात काही गैर आहे असं वाटलं नाही. पण काम सुरु झाल्यावर असा प्रकार वरचेवर घडू लागला. बाईंची माणसं येऊन काम नेटानं उरकत होती, मात्र बाईशी थेट संपर्क साधण्यात अडचण येते हे आमच्या सर्वांच्याच ध्यानात आलं. अनेकदा त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर बाई घरी गेल्या आहेत आणि संध्याकाळीच भेटतील अशी उत्तरंही आम्हाला चक्क ऐकावी लागली. स्वतःचा व्यवसाय जोर धरत असताना बाई असं का वागताहेत याचा आम्हाला खुलासा मिळत नव्हता. शेवटी एकदाचं काम उरकलं. बाईंच्या कामाचे सर्व पैसे आम्ही चुकते केले, मात्र तुम्ही तुमच्या व्यवसायात थोडं अधिक लक्ष घातलेलं बरं हा शेरा मारल्यानंतरच. या बाईंना महिला मंडळात चुकूनदेखील बोलवू नकोस हा शेरा मारण्याचं काम मात्र मी सर्व प्रकार विसरण्याआधी चोख बजावलं! काही दिवसांनी झाला प्रकार आम्ही विसरुनही गेलो.

त्यानंतर एकदा त्याच बाईंची कुणीतरी मुलाखत घेणार असल्याचं माझ्या ऐकिवात आलं. यशस्वी महाराष्ट्रीय छोटया उद्योजकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम कुणीतरी आयोजित केला होता. या कार्यक्रमात अन्य दोन तीन लघुउद्योजकांबरोबर बाईंनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. केवळ त्या बाईंसाठी नव्हे तर दुसरे उद्योजक आपले काय अनुभव सांगतात ते ऐकण्यासाठी आम्ही कार्यक्रमाला गेलो. स्वत:च्या उभरत्या उद्योगाची हेळसांड करणारी बाई चारचौघांसमोर काय फुशारक्या मारते ते ऐकण्याची उत्सुकता आम्हाला होतीच. कार्यक्रमामध्ये बाईंची मुलाखत ऐकल्यानंतर मात्र आम्ही अवाक् झालो. तुमच्या उद्योगाला घरुन कितपत सहाय्य मिळतं? या प्रश्नाला बाईंनी जे उत्तर दिलं ते ऐकून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. बाईंचे पती स्वतः एका अन्य उद्योगात व्यग्र होते. साहजिकच त्यांचा फारसा सपोर्ट बाईंना आपल्या व्यवसायात मिळत नव्हता आणि कहर म्हणजे घरी स्वतःच्या अपंग मुलाचं संगोपन करण्याची जबाबदारी नियतीने बाईंवर सोपविली होती! या एकाच कारणास्तव दुसरी एखादी सामान्य स्त्री घराच्या बाहेर देखील पडली नसती. मात्र ही धाडसी महिला घरचे सगळे पाश सांभाळत स्वतःचा व्यवसाय पुढे रेटत होती!

बाईंना ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर बाई जरा घरी गेल्या आहेत, संध्याकाळी भेटतील या अनेकदा ऐकाव्या लागणाऱ्या उत्तराचा खुलासा झाला होता. घरच्या पाशांची तमा न बाळगता ही आदर्श महिला काहीतरी मिळविण्यासाठी जिद्दीने धडपडत होती, आणि तिच्या समस्यांची ओळखही न करुन घेता तिच्या कार्यपद्धतीवर आम्ही तडकलो होतो! कार्यक्रम संपल्यावर बाई आपल्या ओळखीच्या आहेत त्यांना भेटूनच घरी जाऊ असं मी बायकोला सुचवलं. अर्थात हे सुचवताना बाईंना तुझ्या मंडळात आपले अनुभव सांगण्यासाठी जरुर निमंत्रित कर हे देखील मी आवर्जून नमूद केलं.

— सुनील रेगे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..