सामाजिक बांधिलकीची जाणीव बालपणापासूनच लहान मुलांमध्ये निर्माण करणं जरुरीचं असतं, त्याचं भान त्यांच्याकडून राखलं जातं का? हे पाहणं गरजेचं असतं. आजची लहान मुलंच ह्या देशासाठी उद्याची संपत्ती असल्याचं आपण बोलतो, ऐकतो; त्यानुषंगाने मुलांचा विकास झाला तरंच राष्ट्राची प्रगती होईल. त्या प्रगतीच्या दृष्टीने सामाजिक उणिवा दूर करून, समाजातल्या प्रत्येक घटकांच्या जाणीवा जपणं आवश्यक आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून कुटुंबविघटनानंतर आता व्यक्ती विघटन व्हायला लागलं आहे.
समाजाशी आपली नाळ जोडलेली असणं आवश्यक असतं, आपलं एक निराळं नातं इतर प्रत्येकाशी निर्माण झालेलं असणं गरजेचं असतं. बालपणापासूनच सामाजिक जिव्हाळ्याची सवय झाली कि पुढील आयुष्यांत समाजाप्रती आपलं कर्तव्य म्हणून जबाबदारीने सामाजिक घटकांच्या उणिवा दूर करण्यात आपला मोलाचा वाटा असू शकतो. लहान मुलांना निश्चितच तळहातावरील फोडासारखं वाढवायचं असतं. त्याच अनुषंगाने त्यांचं संगोपन, पालनपोषण करायचं असतं.
व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या उक्तीप्रमाणे आणि निसर्ग नियमानुसार प्रत्येक बाळाची शारीरिक जडणघडण भिन्न असते. त्यांतही मुलगा आणि मुलगी हा जरी भेदभाव करायचा नसला तरीही त्यांना वाढवताना त्यांच्या शरीरांतर्गत होणारे बदल हे वेळीच विचारांत घ्यावे लागत असतात. त्या बदलांचा थेट परिणाम सर्वप्रथम त्यांच्या मानसिकतेवर होत असल्याचं आपल्या वेळोवेळी लक्षात आलंच पाहिजे. बालपणाशी संबंधित आपण आपला थोडा दृष्टीकोन बदलण्याची सद्य:स्थितीत नितांत गरज आहे. आपल्या सकारात्मक विचारांमुळे लहानपणातलं बालपण टिकवून ठेवणं आपल्याच विचार, वर्तन आणि व्यवहारांत आहे.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply