कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका “माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.
लुफतान्सा या जर्मन हवाई प्रवास कंपनीच्या फ्रँकफर्ट येथील कार्यालयात विमानाचे पुढचे आंतरराष्ट्रीय उड्डाण चुकलेल्यांसाठी (त्यातही चाकाच्या खुर्चीतून येणार्या प्रवाशांसाठी) एक वेगळा कक्ष निर्माण केलेला आहे. प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्यास सगळे कर्मचारी उत्साहाने झटत असतात. एका अतिशय वयस्कर आणि एकटीने प्रवास करणार्या व अर्धवट शुद्धीत असलेल्या बाईची लुफतान्साचे कर्मचारी इतक्या आपुलकीने काळजी घेत होते, की माझे मन हेलावून गेले. न राहून तिथल्या व्यवस्थापकांना विचारलेच की त्यांच्या कर्मचार्यांची निवड कशी केली आहे? त्यांना प्रशिक्षण कसे दिले जाते?
लुफतान्साच्या व्यवस्थापकांनी सांगितले, की उमेदवारांना अनेक चाचण्यांतून पार पडावे लागते. या चाचण्यात त्यांची मदत करण्याची वृत्ती, ताणतणावांच्या प्रसंगी डोके शांत ठेवून निर्णय घेण्याची क्षमता, पडेल ते काम मन लावून करण्याची वृत्ती यांची चाचणी करतात. त्यावर त्यांना प्रत्येक कामाचे प्रशिक्षण देले जाते.
सौजन्य आपल्या वागणुकीत उतरण्यासाठी मुळात दुसर्याबद्दल आस्था व सहवेदना हवी. आपण या प्रवाशाच्या जागी असतो तर आपल्याला कसे वाटले असते या मूळ संवेदनेतून पुढचे सर्व सौजन्य आपोआप निर्माण होते.
कर्मचार्यांत दुसर्याबद्दल सहवेदना बाळगणारा दृष्टीकोन निर्माण करणे व तो सतत जोपासत राहणे हे व्यवस्थापनाचे कर्तव्य आहे. याचे महत्व इतके अनन्यसाधारण आहे, की कर्मचारी नव्याने कामावर रुजू होताच त्यांना वागण्या-बोलण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
नवीनच आलेल्या कर्मचार्याला आधी संस्थेची माहिती, तिचे निरनिराळे विभाग आणि उपक्रम, सर्व उत्पादने, कामांचे आयोजन कुठे व कसे केले जाते, कोणत्या कामाची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे, विभागप्रमुख कोण आहेत इत्यादि सर्व माहिती देणे आवश्यक आहे.
— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०
## सामाजिक शिष्टाचार
## Part 3
Leave a Reply