कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका
“माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.
एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एकत्रपणे काम करताच येत नाही. ऐकण्याचे महत्व कशासाठी ?
१) दुसर्याचे ऐकणे म्हणजे दुसर्याकडून काही तरी शिकणे. दुसर्यांच्या कल्पना, सूचना आणि टीकाही आपल्याला काहीतरी शिकवत जाते. दुसर्याने केलेली टीका म्हणजे आपल्याला मिळालेली सुधारण्याची संधी होय.
२) दुसर्यांचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे त्यांचा आदर करणे, त्यांना मदत करणे.
३) असे ऐकणे म्हणजे त्यांच्या विचार स्वातंत्र्याचा मान राखणे. हे ही संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीला हातभार लावू शकतात असा त्यांना आत्मविश्वास देणे.
४) दुसर्याचे ऐकून घेणे म्हणजे आपल्या विरोधात असलेले मत ऐकण्याची सहनशीलता अंगी बाळगणे. दुसर्याचे ऐकून घेणे व कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वाहन चालवताना आजूबाजूचे आवाज लक्षपूर्वक ऐकावे लागतात. रेल्वेस्थानकावरील ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणार्या सूचनाही जीवाचा कान करून ऐकाव्या लागतात. ऐकताना मनात दुसरा कोणताही विचार आणला नाही तरच लक्ष केंद्रित होते. कामाच्या ठिकाणी, मिटींग्जमध्येही हेच लागू पडते. मिटींग चालू असताना चित्त भरकटलेले असेल तर दुसरा काय सांगतो आहे ते डोक्यावरून जाईल, डोक्यात शिरणार नाही!
लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे. दुसर्याचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे स्वत:चे महत्व कमी करून घेणे अशी काहींची समजूत असते. ती अर्थातच चुकीची आहे. दुसर्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे हा सौजन्याचाच एक भाग आहे.
चांगला श्रोता होण्यासाठी प्रत्येकाने :-
१) दुसर्याच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करावे. दुसर्याशी महत्वाचे संभाषण करताना आपला मोबाईल फोन वाजणार नाही याची दक्षता घ्यावी.
२) भरकटणारे मन हे लक्षपूर्वक ऐकण्यात मोठाच अडथळा निर्माण करते. त्याला प्रयत्नपूर्वक वेसण घालावी लागते.
३) शारीरिक भाषेवरून व्यक्ती लक्षपूर्वक ऐकत आहे की नाही हे समजून येते. डोळ्याला डोळा भिडवून ऐकणारा तुमच्या बोलण्यात रस घेत असतो, तर तुम्ही बोलत असताना इकडे तिकडे बघत क्वचित जांभई देत, पेन किंवा तत्सम वस्तूशी चाळे करत ऐकणारा बळेबळेच तुमचे बोलणे ऐकत आहे असे समजावे. माणसाचा दृष्टीकोन त्याच्या अशा हालचालीवरून लक्षात येतो. सकारात्मक दृष्टीकोनातून दुसर्याचे बोलणे ऐकल्यास आपोआपच ते शारीरिक हालचालींमध्येही उमटते. मुद्दाम मग शारीरिक भाषेकडे लक्ष देण्याची गरजही भासणार नाही.
— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०
## सामाजिक शिष्टाचार
## Part 6
Leave a Reply