नवीन लेखन...

सामंजस्य

परस्परांमधील दुवा

जागतिक महिला दिन..बायकांचा उदो उदो करण्याचा दिवस..मी नेहमीप्रमाणे क्लास ला पोहोचण्याकरता निघाले..जाता जाता आजूबाजूला दिसणाऱ्या हॉटेल्स कडे नजर गेली. आज week day असूनही बायकांच्या तुडुंब गर्दीने हॉटेल्स भरून वाहत होती. पण का कोण जाणे महिला दिनाच्या या सगळ्या जल्लोषात काहीतरी अपुरेपणा जाणवत होता.

हे सगळं एकीकडे डोक्यात घोळत होतं . क्लास ची वेळ संपत आली तसं माझ लक्ष बाजूने येणाऱ्या आवाजाकडे गेलं. क्लास च्या आवारात राहणाऱ्या watchman च्या घरातून आवाज येत होता. त्याची बायको गरम गरम पोळ्या लाटत मुलांना जेवू घालत होती. महिला दिनाचं औचित्य आणि हे दृश्य , मगाशी जे अपुरं वाटलं ते इथे पूर्ण झालं..या सगळ्या सुद्धा कर्तबगार महिला नाहीत का? फक्त आता महिलांच्या या बाजूला कर्तबगारी म्हणून बघणं आपण सोडून दिलंय. हो.. आपणच सोडून दिलंय..
आपल्या दृष्टीने कर्तबगार महिला कोण ? तर उच्च विद्याविभूषित, नवर्‍याच्या तोडीस तोड मिळवणारी, ऑफिस मधल्या चार पुरुषांची बॉस असलेली. यापैकी काही जणी घरचं पाहून सगळं करतात तर काही जणी घरच्या कामांना मदत घेतात. पण महत्वाचं काय तर बाई घराबाहेर पडली, आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली.

या सगळ्यात मात्र आपल्या ‘या’ मैत्रिणींचा गौरव करणं तेवढं मागे पडलं.

आपल्याकडे काम करणाऱ्या मैत्रिणी , ज्या केर फरशी, धुणी भांडी , स्वयंपाक करतात, या सुद्धा तितक्याच कर्तबगार नाहीत का? खालच्या फोटोत दिसणारी watchman ची बायको जी सकाळी लौकर उठून घरच करते , दिवसभरात कदाचित बाहेर जाऊन चार घरची धुणी भांडी, स्वयंपाक करते आणि शिवाय रात्री घरी येऊन मुलाला, नवऱ्याला गरम गरम जेवूहि घालते. या सगळ्या मला सुशिक्षित स्त्री वर्गापेक्षाही जास्त कर्तबगार वाटतात. यांच्या घरचं तर या बघतातच शिवाय चार घरी काम करून त्या घरातल्या सुशिक्षित बायकांना आधार देतात जेणेकरून त्यांनी घराबाहेर पडून काम करावं , किंवा करिअर करावं.

फार पूर्वीच्या काळी जेव्हा बायका पूर्णवेळ गृहिणी असायच्या तेव्हा जसं त्यांना पैशाकरता नवऱ्यावर अवलंबून रहावं लागायचं तसंच नवऱ्याला सुद्धा जेवणाकरता बायकोवर अवलंबून रहावं लागायचं. एका अर्थी समतोल राखला जात होता. काळ बदलला तसा राहणीमानात फरक पडत गेला, जगणं महाग होऊ लागलं , घरात दोघांच्याही मिळकतीची गरज भासू लागली . गरज म्हणून काही बायकाही नोकरी करायला बाहेर पडल्या, काहींनी उत्तम करियर केली .

स्त्री भ्रुण हत्या, मुलगी नको ते मुलगीच हवी पर्यंत चा एक कठीण काळ स्त्रियांनी पार केला.. ‘पैर कि जूती’ समजली जाणारी स्त्री हाय हिल्स घालून पुरुषांची टीम लीड करू लागली. निश्चितच दखल घेण्यासारखं आहे हे सगळं. अन्न हि आपली मूलभूत गरज, ते अन्न आपल्यापर्यंत यावं याची सोय स्त्री स्वतः काम करून करू लागली . पण ते शिजवून खाऊ घालण्याचा वेळही तिच्याकडे राहिला नाही, त्या अनुषंगाने येणारी बाकी ची घरातली काम सुद्धा करायला वेळ आणि ताकद राहिली नाही. साहजिकच आहे.

यात दोष कुणाचाच नाही. पण यात गंमत अशी कि हेच सगळं घरचं बघायला तिच्या पाठीशी या कामवाल्या मावशांच्या रूपाने एक स्त्रीच उभी राहिली. कारण शेवटी घरचं सगळं व्यवस्थित , तर बाहेर डोकं शांत हेच सत्य राहिलं. घरात जेवायला व्यवस्थित नाही , घर नीट नेटकं नाही आणि बाहेर मात्र झेंडे गाडले हे कुठल्याही काळात होणं शक्य नाही.

या शिवाय, आपल्या अशा मैत्रिणी कि ज्यांनी स्वेच्छेने व आनंदाने पूर्णवेळ गृहिणी होणं स्वीकारलंय, त्यांनाही आपण विसरलोच की..
यांना उलट जरा जास्त up to date रहावं लागतं . घराकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं आलं, त्याहीपेक्षा जास्त लक्ष स्वयंपाकाकडे, त्यातही घरच्यांची अपेक्षा, variety हवी, मुलांचे routine , नवऱ्याचं routine त्यातही वेळ काढून बाहेरची चार कामं , पाहुणचार इ इ ..सतत प्रसन्न राहणं, तब्ब्येतीची हेळसांड ही आणि अशी किती आव्हानं दिवसागणिक स्वीकारावी लागतात. निव्वळ अर्थार्जन नाही याचा अर्थ यांच्या आयुष्यात आव्हानं नाहीत असं मुळीच नाही हे समजून घेण्याची गरज आहे.

आज उलटं असं चित्र दिसतं कि मुलं थोडी मोठी झाल्यानंतर नवरा बायको पैकी नवरा पूर्णवेळ गृहस्थ होतो आणि बायको मिळवून आणते, याचं प्रमाण अत्यल्प असलं तरी घरच्या बाजूने बाईला निर्धास्त करायला आज पुरुषहि स्त्रीच्या बरोबरीने उभे राहतात.

याशिवाय ,दोघे नवरा बायको नोकरी / व्यवसायात असूनही घरच्या कामांची जबाबदारी, मग तो स्वयंपाक असो, स्वच्छता असो किंवा इतर असो, नवरे सुद्धा मदतीचा हात पुढे करून तितकेच सफाईदारपणे हे सगळं संभाळतात.. प्रमाण कमी असलं तरी आज हे चित्र खूप सुखकर होत चाललं आहे. आज काळ कितीही बदलाला तरीही स्त्री ला जेव्हा अर्थार्जनाच्या बाजूने सुटका करून घ्यायची इच्छा होते तेव्हा तिला झुकतं माप मिळतं. मात्र असं काही मनात आणायचा पुरूष विचारही करू शकत नाहीत.

आयुष्य आता तसं कुणा करताही सोपं राहिलेलं नाही. मग हे म्हणण्यात आता अर्थ आहे का, कि जात्याचं चाक ते हातात गाडीचं steering wheel, we have come a long way..I feel everybody has come a long way. प्रत्येकाला आपापल्या कर्तबगारी चं क्रेडिट मिळायला हवं, मग ती स्त्री असो वा पुरुष..

महिला दिन…पुरूष दिन असे नवे नवे दिन शोधण्यापेक्षा आहे तो दिवस परस्परांमधील पुरूष दिन असे नवे नवे दिन शोधण्यापेक्षा आहे तो दिवस परस्परांमधील सामंजस्याने घालवावा..

— गौरी पावगी

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..