मनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते.
अकोल्याच्या बाल -शिवाजी शिक्षण संस्थेत नुकतेच दोन पूर्ण लांबीचे दिवस घालविले. कारण होते-शिक्षक प्रशिक्षण ! पण यानिमित्ताने विद्यार्थी, संस्थाचालक, पालक या साऱ्या स्तंभांशी तोंडओळख झाली. सगळ्यांमध्ये काही गोष्टी सामाईक – संस्थेबद्दल प्रेम/आपुलकी आणि शिस्तबद्धता ! अगदी पालक-संवाद दुपारी चारला असताना (तेही रविवारी) चारच्या आधी ५० निमंत्रित पालकांपैकी ९५ टक्के उपस्थित होते.
सर्व भेटीचा केंद्रबिंदू होता- विद्यार्थी ! त्याच्यासाठी धडपडणारे सारे दोन दिवस भेटले. आजकालच्या वातावरणात असे दृश्य बऱ्यापैकी दुर्मिळ !
प्रशिक्षणार्थी नवं शिकायला उत्सुक, सहभाग नोंदवायला अधीर – स्वतःचेच असंख्य प्रश्न घेऊन आलेले आणि सांगितलेलं टिपायला तयार ! मला स्वतःलाच रिचार्ज झाल्यासारखे वाटले.
आज सकाळी हे वर्तुळ पूर्ण झाले. एका पालकांचा फोन आला- ” १० वीतील मुलीच्या भावी वाटचालीबद्दल मार्गदर्शन विचारणारा”. मस्त वाटलं. रुजायला सुरुवात झालीय.
मातीला आणि बीजांना अंकुरण्याच्या शुभेच्छा !
– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply