नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी पुण्यतिथी

समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते.

नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होता. इतरांहून वेगळा होता अतिशय बुद्धिमान, निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. लहानपणी नारायण अत्यंत साहसी होता. झाडावरून उड्या मारणे, पुरात पोहणे, घोड्यावर रपेट करणे या सगळ्या गोष्टींत तो तरबेज होता. त्याचे आठ मित्र होते एक मित्र सुताराचा मुलगा होता, तर दुसरा गवंड्याचा एक लोहाराचा तर दुसरा गवळ्याचा. नारायणाने या मित्रांच्या सहवासात बालपणीच त्या-त्या व्यवसायाचे उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतले होते. केवळ निरीक्षणाने तो अनेक गोष्टी शिकला.

एकदा एक सरकारी अधिकारी सूर्याजीपंतांकडे तपासणीसाठी आला. सूर्याजीपंत सधन होते. व्यवसायाने ते ग्रामाधिपती होते. पण राहणी साधी असल्यामुळे घरात उंच बैठक नव्हती, त्यामुळे त्या अधिकाऱ्याला सगळे काम खाली बसून करावे लागले. सूर्याजीपंतांचे काम उत्तमच होते. मात्र अधिकाऱ्याने जाताना एक शेरा मारला-‘एवढे मोठे अधिकारी, पण यांच्या घरात बसायला साधी बैठक नाही?’ या शेरेबाजीमुळे नारायणाचा स्वाभिमान दुखावला . त्याने आपले ७-८ मित्र गोळा केले. लाकळी फळ्या, दगड, विटा, माती, हे साहित्य आणले आणि रात्रीतून मित्रांच्या सहाय्याने उंच बैठक तयार केली. एवढेच नव्हे तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा घरी बोलावून बैठक दाखविली. त्या अधिकाऱ्याने नारायणाचे तोंड भरून कौतुक केले.

नारायणाच्या बाळपणाची आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा तो लपून बसला काही केल्या सापडेना. अखेर एका फडताळात सापडला “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर याने दिले होते.

अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येईल या कल्पनेने त्याचे वयाच्या १२व्या वर्षी लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी “सावधान” हा शब्द उच्चारताच तो ऐकून, नेसलेले एक व अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रांनिशी नारायण लग्नमंडपातून पळाले. लोकांनी पाठलाग केला. पण त्यांनी तातडी करून गांवाबाहेरची नदी गाठली आणि नदीच्या खोल डोहात उडी मारली.पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन रामदासांनी रामाचे दर्शन घेतले आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली.

वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते. ही १२ वर्षे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशा होय, विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी याचा एक आदर्शच समर्थांनी प्रस्थापित केला. समर्थांनी स्वयंप्रेरणेने स्वतःचा विकास विद्यार्थी दशेत असतानाच करवून घेतला. समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली. ही मूर्ती सोन्याची की शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली. टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची. … त्यांतील एक जण म्हणाला की, ‘हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.’ तर दुसरा मुलगा म्हणाला की,’मूर्ती शेणाची आहे’. दोघांनी मूर्ती पाहिली होती, त्यामुळे दोघेही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते. अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या, असे ठरले. दोघेही जण मंदिरात आले. मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणाऱ्याने लाकडाच्या एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खरवडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली. आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. समर्थ त्या दोघांना म्हणाले – ‘ तुम्ही दोघे बरोबर आहात. मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे. गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते. त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे’. जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले. समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली.

नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ) रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास रामनामाचा जप करीत म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे.

रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले ते दुपारी केवळ ५ घरी भिक्षा मागून तिचा श्रीरामाला नैवेद्य दाखवत असत. त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना ठेवून उरलेला भाग ग्रहण करत असत समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत. याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला, रामायणाची रचना केली. त्यांच्या या साधकावस्थेमध्ये त्यांनी आर्ततेने श्रीरामाची प्रार्थना केली तीच ‘करुणाष्टके’ होत. व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते. त्यांच्या जीवनातील ही १२ वर्षे अत्यंत कडकडीत उपासनेमध्ये व्यतीत झाली. १२ वर्षाच्या या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्मसाक्षात्कार झाला असे म्हणतात. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.

समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. ‘आता हा आत्म्याचा पक्षी देहाच्या पिंजऱ्यात किती दिवस बंदिस्त ठेवायचा ‘ असे त्यांना वाटू लागले…. त्यांच्या मनात वारंवार देहत्याग करण्याचा विचार येऊ लागला. हे जग माया आहे, या जगात कशासाठी धर्मसंस्थापना करायची? समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले. देहत्यागाच्या हेतूने त्यांनी १००० फुटांवरून मंदाकिनी नदीत उडी मारली, तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने त्यांना झेलले, असा त्यांना भास झाला. तेव्हा असे म्हटले जाते की, रामरायाने त्यांना सांगितले –

तुम्हास जगोद्धार करणे आहे | तुमची तनु ते आमुची तनु पाहे | दोनी तपे तुमची रक्षिली काय हे | धर्म स्थापने कारणे||

रामरायांनी समर्थांना सांगितले की, “तुम्ही या शरीराचे मालक नाही आहात. धर्माचे कार्य करण्यासाठी गेली दोन तपे म्हणजे २४ वर्षे आम्ही या शरीराचा सांभाळ केला आहे तुम्हाला हे शरीर असे एकदम नष्ट करता येणार नाही”. या घटनेनंतर समर्थ आपल्या शरीराची काळजी घेऊ लागले. त्यांच्या लक्षात आले की, रामाचा हा आदेश आपल्याला ऐकावा लागेल. आपणा सर्वांना भगवंताने हे शरीर दिले ते देश, देव व धर्म यांच्या सेवेसाठी. आपल्याला या शरीराचा दुरुपयोग करून नाही चालणार, शरीराचे फार लाडही करू नये आणि त्याची हेळसांडही करू नये.

भारत-भ्रमण करीत असता श्रीनगरमध्ये शीखांचे सहावे गुरु हरगोविंद यांची व समर्थांची योगायोगाने भेट झाली. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. हरगोविंद सिंगांबरोबर १००० सैनिक असायचे त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत. त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले. समर्थांनी हरगोविंदांना विचारले – “आपण धर्मगुरू आहात या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?” तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले – “एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी”. समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले – “आणि हा सारा फौजफाटा ?” त्यावर हरगोविंद म्हणाले – ” धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे. सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे की, केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही. आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते. आपण बलशाली झाले पाहिजे ‘समान-शीले-व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दोघांत सख्य झाले. समर्थ गुरु हरगोविंद यांच्या बरोबर सुवर्ण मंदिरात आले.तिथे ते दोन महिने राहिले तेव्हापासून समर्थ शस्त्र बाळगू लागले…. त्याला ते गुप्ती म्हणत. बाहेरून दिसायला कुबडी, जप करतांना या कुबडीवर बगल ठेवून चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचे संचालन करता येत असे. कुबडीच्या दांड्याला आटे असत त्यात छोटी तलवार असे. समर्थांची अशी तलवार असलेली कुबडी आजही सज्जनगडावर पहायला मिळते. भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत.

“समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनीही त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली. यानंतर समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली. हनुमान ही शक्तीची देवता. हनुमान मंदिरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत.

वयाच्या ३६व्या वर्षी रामदासस्वामी महाराष्ट्रात परत आले. भारत प्रवास करतांना शेवटी समर्थ पैठणला आले. पैठणला ते नाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता. नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्नमंडपातून पलायन केल्यावर २४ वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता. त्यांच्या वहिनीला दोन मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले. समर्थ वैराग्यशाली असले तरी तुसडे नव्हते. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे, असे येऊन गेले. समर्थ जांबला पोहोचले, पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही अगदी नाट्यमय पद्धतीने आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली तिची राम आणि शाम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. २४ वर्षात दाढी, जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाईदेखील दीराला ओळखू शकल्या नाहीत अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. २४ वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले, असे म्हणतात. तिने विचारले – ‘नारायणा, अरे तप करून कोणते भूत वश केलेस बाबा?’ त्या वेळी समर्थांनी एक अभंग रचून संपूर्ण रामचरित्र आईला ऐकविले.समर्थ चार महिने जांबला राहिले त्यांनी आपल्या आईला ‘कपिल गीता’ हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला. आईला चर्मचक्षूंबरोबर ज्ञानचक्षूही दिले.

कराडजवळ शाहपूर नामक छोट्याशा गावात बाजीपंत कुलकर्णी आणि सतीबाई कुलकर्णी हे दाम्पत्य राहत होते. सतीबाईंची अशी विचित्र कल्पना होती की रामनाम हे अंतकाळीच घ्यायचे असते. सुखी संसारात अथवा गजबजलेल्या घरात माणसाने रामनाम घेऊ नये. एकदा समर्थ त्यांच्या दारात भिक्षेसाठी आले. भिक्षा मागताना समर्थांनी रामनामाचा उच्चार केला त्यामुळे सतीबाई समर्थांवर कडाडल्या आणि म्हणाल्या, – ‘ए बाबा, भरल्या घरात रामाचे नाव घेऊ नकोस. समर्थ मृदू शब्दात म्हणाले – ‘आई, रामाच्या नावाने भरल्या घराची शोभा वाढते’. सतीबाईंना समर्थांचा उपदेश आवडला नाही. त्यांनी समर्थांना भिक्षा मिळणार नाही म्हणून सांगितले.

दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा भिक्षेला आले पुन्हा समर्थांना रामनाम घेण्यावरून त्यांनी फटकारले. आठ दिवस हा प्रकार रोज घडत होता. नवव्या दिवशी सतीबाई उदास चेहऱ्याने बाहेर आल्या त्यांचे पती बाजीपंत यांचा काही अपराध नसताना त्यांना यवन अधिकाऱ्याने पकडून नेले होते. त्या समर्थांना म्हणाल्या – ‘तुमच्या रामनामामुळे ही अशुभ घटना घडली.’ समर्थ अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले – ‘आजपासून ११ दिवसांच्या आत तुमचे पती परत येतील’. पती परत आल्यास रामनाम घेण्याचे आश्वासन सतीबाईंनी समर्थांना दिले. यवनांची चाकरी करणारे अनेक हिंदू अधिकारी समर्थांचे शिष्य होते. समर्थांनी त्यांच्याकडून बाजीपंतांची सुटका करविली.

सतीबाईंची समर्थांच्या अनन्य भक्त झाल्या त्यांनी आपला मुलगा भीमस्वामी समर्थांना अर्पण केला. या भीम स्वामींनी तंजावरला तीन मठ स्थापन केले. समर्थ निसर्गप्रेमी होते, नद्यांचा उगम अथवा संगम ही त्यांची आवडीची ठिकाणे होती. दाट झाडीत आणि रम्य वनश्रीत त्यांचे मन रमत असे. त्याबद्दलची ही आख्यायिका -महाबळेश्वरला निसर्गाच्या कुशीत ते रमले.तेथील ब्रम्हारण्यात ते फिरत असताना रस्ता चुकले व जंगलातच फिरत राहिले. तीन दिवस समर्थ भटकत होते पण त्यांना रस्ता काही सापडत नव्हता. कुठे फळझाडही आढळेना त्यामुळे जेवणाची सोय नाही अथवा खाण्या-पिण्याचीही सोय नाही. तीन दिवसांनंतर एक अद्भुत घटना घडली. समर्थांना एक झोपडी आढळली त्यांना खात्री पटली की, येथे जर कोणी राहत असेल तर आपल्या भोजनाची नक्की व्यवस्था होईल. झोपडीच्या बाहेर उभे राहून समर्थांनी भिक्षेचा श्लोक म्हटला. त्या झोपडीत एक दांपत्य राहत होते त्या झोपडीतील गृहस्थाने समर्थांना घरात बोलावून भोजन करण्याची विनंती केली. समर्थांची पाद्यपूजा करावी अशी त्या दांपत्याची इच्छा होती परंतु समर्थ म्हणाले – ‘मी कधी पाद्यपूजा करून घेत नाही’. समर्थ पानावर बसले त्या गृहिणीने अत्यंत प्रेमाने आणि आग्रहाने समर्थांना जेवायला वाढले. समर्थ देखील तीन दिवसानंतर जेवत असल्यामुळे पोटभर जेवले. त्या दांपत्याला मनःपूर्वक धन्यवाद देऊन समर्थ झोपडीतून बाहेर पडले. दहा-वीस पावले चालल्यावर त्यांनी सहज मागे वळून पाहिले तर तेथे झोपडीच नव्हती ती झोपडी आणि ते दांपत्य अदृश्य झाले होते. समर्थांचे अंतःकरण रामचंद्रबद्दलच्या कृतज्ञतेने भरून आले. त्यांच्या लक्षात आले की, ते दांपत्य म्हणजे प्रत्यक्ष राम-सीता होते. भगवंताने वेगळ्या रूपात प्रकट होऊन भक्ताची सेवा केली होती. ज्याने जनाबाईची लुगडी धुतली, नाथांच्या घरी पाणी भरले त्याच परमात्म्याने समर्थांना जेवू घातले. थोड्याच वेळात समर्थांना मुख्य रस्ताही सापडला.

समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होत.समर्थांचे एक वैशिष्ट्य होते.समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत. समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती. एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारले – ‘महाराज, माझ्या मनाची उन्मनी अवस्था कशी होईल? समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले – ‘मनाचे ऐकू नकोस म्हणजे तुझ्या हवे तसे होईल. ‘धोंडिबाने ते ऐकले आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला. ‘आपण आता घरी जावे’ असे त्याच्या मनात आले पण समर्थांनी तर सांगितले की मनाचे ऐकू नकोस, म्हणून त्याने घरी जायचे नाही असे ठरविले. मग मनात आले, रानात जावे. पण मनाचे ऐकायचे नसल्यामुळे रानातही जाता येईना. धोंडीबाच्या लक्षात आले की, मनात परस्परविरोधी विचार येत राहतात अशा वेळी काय करावे? एकदा वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये. मग मनाचे ऐकायचे नाही म्हणजे काय? धोंडिबाच्या लक्षात आले की, मनात सतत विचार येत राहतात ते ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडिबाने ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो जप ऐकत राहिला. अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून तो ७२ तास जप करीत राहिला. ७२ तासांनंतर त्याच्या मनाची उन्मनी अवस्था झाली. अगदी सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धेने धोंडिबाने ते ऐकले, आणि त्याचे भले झाले. (मनाची उन्मनी अवस्था म्हणजे ईश्वरस्वरूपी मिळून जाणे!) अध्यात्मात श्रद्धा असली की लगेच काम होते.

आत्म साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत: सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा रामदास स्वामींना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आयाबहिणी, देव, धर्म, संस्कृती, काहीच सुरक्षित नव्हते. जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले. सर्वस्वी नि:सत्त्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे, समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली. केल्याने होत आहे रे । आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खऱ्या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करुन ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारुन खणखणीत वाणीने लोकांना सांगितले –

धिर्ध्ररा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका । केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥

मसूर या गावी रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोद्धाराच्या कार्याचा पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राममंदिराची स्थापना केली. काही वेगवेगळ्या गांवी त्यांनी सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली.

‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’

यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी ठरवलेले कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोकसंग्रहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला.

समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दऱ्याखोऱ्यातून, डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगायमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठमहंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले.

धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभु श्रीरामचंद्र, आदिशक्ति तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारुती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वतः डोंगरदऱ्यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. समर्थावर सन्त एकनाथाच्या वाग्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन रामदास स्वामी भारावून गेले. आदिलशाहीत ही त्यांनी आपूलकी जोपासली होती. विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणाऱ्या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते. सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते.

श्री समर्थ रामदास स्वामीचे निधन २२ जानेवारी १६८२ रोजी झाले.

श्री समर्थ रामदास स्वामीनी स्थापना केलेल्या अकरा मारुती –

समर्थांनी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: १) दास मारुती, चाफळ (राम मंदिरासमोर) २) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) ३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) ४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ ५) उंब्रज मारुती (ता. कराड) ६) शहापूर मारुती (उंब्रज जवळ) ७) मसूर मारुती (ता. कराड) ८)बहे-बोरगांव (कृष्णामाई) मारुती (जि. सांगली) ९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) १०) मनपाडळे मारुती (जि. कोल्हापूर) ११) पारगांव मारुती (जि.कोल्हापूर).

श्री समर्थ रामदास स्वामी साहित्य रचना –

मनाचे श्लोक- मनाचे श्लोक एकूण २०५ आहेत.

दासबोध

आत्माराम

छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र

मारुति स्तोत्र

समर्थकृत देवी स्तोत्रे

करुणाष्टके

राममंत्राचे श्लोक

सोलीव सुख

रामदास स्वामींचे अभंग

आनंदवनभुवनी

सवाई

अस्मानी सुलतानी

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

3 Comments on समर्थ रामदास स्वामी पुण्यतिथी

  1. खुपच छान व प्रेरणादायी माहिती श्रीसमर्थ रामदास स्वामी यांची आपण सादर केलीत धन्यवाद 🙏🙏
    🚩🚩जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..