सैर भैर जीवनां या, गोडी नामाची लागली ।
मनां भावली, तेजोमयी, स्वामी राज माऊली ।।
मनां भावली, तेजोमयी, स्वामी राज माऊली ।।धृ।।
नितळ कांती, कमला परी, दिसे मुलायम ।
नेत्र द्वयींचे, तेज अलौकिक ते लोभसवाणे ।।
वैभवशाली, कानीं कुंडले, करीती चमचम ।
हृदयामध्ये ते ठसले रुप, माऊलीचे गोजिरवाणे ।।
तयांच्या आंस भेटीची, हुरहुर मनां लागली ।
मनां भावली, तेजोमयी, स्वामी राज माऊली ।।१।।
तुझिया नामारंगी, तन हे डोले, ब्रम्हानंदे ।
आजानुबाहू, मूर्तितव, सुहस्य वदनीं ।।
काया वाचा मन हे, तुझ्याच नामीं गुंतले ।
भान हरपुनि, तल्लीन मी मनोमनीं ।।
स्वानंदांतुनि, अवघी जीवन गाथा गंधित झाली ।
मनां भावली, तेजोमयी, स्वामी राज माऊली ।।२।।
गंध विलेपन शोभे, विशाल भाळावस्ती ।
अगाध लीलां मधुनि, प्रकटे तव अपार माया ।।
चित्तां मोहवी, कंठा मधाली, तवरुद्र माळा ।
ध्यान लागले, एक चित्ते, तव चरणांवरती ।।
नामस्मरणें, दंगुनि काया, मोदे रंगुनि गेली ।
मनां भावली, तेजोमयी, स्वामी राज माऊली ।।३।।
“नकोस भिऊ तूं” सदैव ऐसे म्हणुनि ।
भक्तांसाठी अपुल्या, उभा तूं, सदा ठाकसी ।।
दांभिकता परी, नच जराही खपवुनि घेशी ।
सत्य रक्षिण्या, सत्या संगे सदैव असशी ।।
मनांस “गुरुदासा” न कळे, होऊ कसे उतराई ।
मनां भावली, तेजोमयी, स्वामी राज माऊली ।।४।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply