शिवप्रभूंच्या महानिर्वाणा नंतर महाराष्ट्रात एक अभूत पूर्व पेच प्रसंग निर्माण झाला. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई त्यांच्या लहानपणीच निवर्तल्या होत्या.आई शिवाय वाढलेले मुल कधी कधी हट्टी असते.शिवरायांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे संभाजी महाराजांवर अत्यंत प्रेम होते.आईचे दुध नशिबी नसलेल्या संभाजी युवराजांवर हिरडस मावळातील एका नव्याने बाळंत झालेल्या तरुणीला राजमातेने “दुधाची आई “म्हणून गडावर पाचारण केले.या गुंजवणी गावाच्या सध्याच्या भाटघर धारणा जवळच्या राहणारा-या माउलीने संभाजी राजांची काळजी घेतली.संभाजी महाराजांची सावत्र आई सोयराबाई राणी साहेब यांना राजाराम नावाचा पुत्र झाला. जिजाबाई यांच्या मृत्यू नंतर संभाजी राजे तापट स्वभावाचे ,अत्यंत मानी पण आई नसलेले लेकरू म्हणून अतिशय दुर्लक्षित झाले .महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच राजमातेने देह ठेवला आणि संभाजी महाराज ख-या अर्थाने पोरके झाले.शिवरायांच्या अष्ट प्रधान मंडळाशी त्याचे पटेना.सोयराबाई यांना राजारामाला गादीवर बसवायचे होते.खरा हक्क थोरल्या मुलाचा म्हणजेच संभाजी राजे यांचाच होता. खूप राजकारण झाले. पण शेवटी संभाजी राजांना स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. या कामी जे आडवे आले त्यांना त्यांनी शास्त केले.शिक्षा केली.राजकारणावर पकड घट्ट राहावी म्हणून स्वतःचा प्रचंड दरारा निर्माण केला.
सुक्याबरोबर ओलेही जळते तसे शिव प्रभूंसाठी जीवाचे रान केलेल्या काही मंडळींना यात शिक्षा झाली.
समर्थांचे सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष होते.संभाजी राजे आता छत्रपती झाले आहेत आणि शिव प्रभूंच्या पवित्र सिंहासनावर बसले आहेत तेव्हा त्यांच्या हातून चूक होणे म्हणजे शिवरायांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्र धर्माचे नुकसान होवू शकते हे समर्थांनी ओळखले.समर्थांना रयतेच्या भल्यासाठी संभाजी राजांना उपदेश करण्याची नितांत गरज आहे असे वाटले आणि त्यांनी संभाजी राजांना एका पत्राच्या माध्यमातून उपदेश केला.ते हे पत्र ……
अखंड सावधान असावे ।दुश्चित कदापि नसावे
तजवीज करींत बसावे। एकांत स्थळी ।।
काही ऊग्र स्थिती सोडावी। कांही सौंम्यता धरावी
चिंता परायी लागावी। अंतर्यामी ।।
मागील अपराध क्षमा करावे ।कारभारी हाती धरावे
सुखी करून सोडावे। कामा कडे ।।
पानवठी तुंब निघेना। तरमग पाणी चालेना
तैसे जनांच्या मना। कळले पाहिजे ।।
जनाचा प्रवाह चालिला। म्हणजे कार्य भाग आटोपला
जन ठाई ठाई तुंबला। म्हणजे तें खोटे ।।
श्रेष्ठी जे जे मिळविले ।त्यासाठी भांडत बैसले
तरी मग जाणावे फावले ।गलिमांसी ।।
ऐसे साहस करू नये। दोघे भांडता तिस-यासी जाये
धीर धरुनी महत्कार्ये। समजून करावे ।।
शिवरायास आठवावे ।जीवित तृणवत मानावे
या करणे समस्ती ।बुद्धी शोधावी ।।
राजी राखता जग मग ।कार्य भागाची लगबग
ऐसे जाणूनिया सांग। समाधान राखावे ।।
रांजी राखता जग। मग कार्यभागाची लगबग ।
ऐसे जाणुनिया सांग ।समाधान रांखावे ॥
सकल लोंक एक करावे ।गनीम निपटून काढावे ।
येणे करिता कीर्ती द्यावे । दिगंतरी ॥
आधी गाजवावे तडाके। तरिमग भूमंडळ धाके।
ऐसे न करिता धक्के ।राज्यास होती ॥
समय प्रसंग ओळखावा। राग निपटून काढावा ।
आला तरी कळो न द्यावा। जगा माजी ॥
राज्यामध्ये सकल लोक। सलगी देऊनि करावे सेवक ।
लोकांच्या मनामध्ये धाक ।उपजोंची नये ॥
बहुत लोक मिळवावे ।एक विचारे भरावे ।
कष्ट करोनी घसरावे ।म्लेंछावरी ॥
आहे जितुके जतन करावे। पुढे आधीक मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे ।जिकडे तिकडे
लोकीं हिम्मत धरावी ।शर्तींची तरवार करावी ।
चढती वाढती पदवी ।पावाल येणे ॥
आधींच पडली धास्ती। मग कार्यभाग होय नास्ती।
इहलोकी परलोकी राहावे ।कीर्ती रूपे ॥
शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा साक्षेप।
शिवरायांचा आठवावा प्रताप। या भूमंडळी ॥
शिवरायांचे कैसे बोलणे ।शिवरायांचे कैसे चालणे।
शिवरायांचे सलगी देणे। कैसी असे ॥
सकल सुखाचा केला त्याग। करुनी साधिजे तो योग ।
राज्य साधनेची लगबग। कैसी केली ॥
त्याहुनी करावे विशेष ।तरीच म्हणावे पुरुष ।
या उपरी आता विशेष। काय लिहावे ?॥
संभाजी महाराज तक्तावर बसले होते .छत्रपती झाले होते .या छत्रपतींना थोड्या कडक शब्दात समर्थांनी राजधर्म पालन करताना कोणती काळजी घ्यावी याचा उपदेश केला होता.
समर्थांचा हा एका राजाला केलेला उपदेश त्यांची प्रत्तेक ओवी बारकाईने वाचली तर आज सुद्धा राज्यकर्त्यांना उपयोगी पडेल असाच आहे.समर्थांच्या त्यावेळचा राजकारणाचा संदर्भ आजही तितकाच उपयुक्त आहे.
–चिंतामणी कारखानीस
Leave a Reply