नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी – भाग १

Samartha Ramdas Swami - Part 1

परवा फेस बुक वरील माझ्या एका मित्राने समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख “नारायण ठोसर” असा एकेरी केला. मुद्दा वादाचा जरी होता तरी त्यात समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अशा प्रकारे आल्याने मी फार व्यथित झालो. समर्थ कुठल्याही जातीच्या पलीकडले व्यक्तिमत्व होते, नव्हे ते तर प्रत्यक्ष हनुमान स्वरूप होते. ते ब्राम्हण जातीत जन्माला आले किंवा त्यांचा उल्लेख शिवरायांचे गुरु म्हणून इतिहासात आला आहे यावर कुणाचाही आक्षेप असू शकतो. परंतु त्यांनी केलेल्या दासबोधाची निर्मिती हि एक दैवी चमत्कार असलेली निर्मिती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. मी दासबोधाचा नियमित वाचक आणि अभ्यासक आहे. अमृतानुभव जितका मला प्रिय आहे तितकाच दासबोध आणि तुकारामांची गाथा मला प्रिय आहे.

समर्थ जन्मताच “परामानस विद्या” ज्याला इंग्रजीत ” Advanced Psychology ” असे म्हणतात त्यात पारंगत होते. दासबोध हा त्यांचा ग्रंथ ३५० वर्षापूर्वीचा Advanced Psychology चाच ग्रंथ आहे.

समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आणि स्त्रोत्र हि आजही घरोघरी गायली जातात. समर्थ देश भर फिरले, निबिड अरण्यात त्यांनी गुहेत बसून तपस्या केली. ग्रंथ निर्मिती केली. समर्थांचे आयुष्य वादातीत होते.

मी काही दिवस समर्थांच्या वर लिहिण्याचे ठरवले आहे. सुरवात करताना त्यांनी लिहिलेल्या “चातुर्य लक्षणा”पासून करणार आहे.
उच्च नीच जातीत जन्मणे हे कुणाच्याही हातात नसते. शरीराचे सुंदर दिसणे अथवा कुरूप पणा हा सुद्धा निसर्गदत्त असतो. पण म्हणून लोकांनी जाणीव पूर्वक काही ‘गुण’ धारण करावे असे समर्थ म्हणतात. या गुणांना समर्थ “आगंतुक गुण” असे म्हणतात.

समास सहावा : चातुर्यलक्षण || १४.६ ||

॥श्रीराम॥

रूप लावण्य अभ्यासितां नये | सहजगुणास न
चले उपाये | कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||१||
काळें माणुंस गोरें होयेना | वनाळास येत्न चालेना |
मुक्यास वाचा फुटेना | हा सहजगुण ||२||
आंधळें डोळस होयेना | बधिर तें ऐकेना |
पांगुळ पाये घेइना | हा सहजगुण ||३||
कुरूपतेचीं लक्षणें | किती म्हणोनि सांगणें |
रूप लावण्य याकारणें | पालटेना ||४||
अवगुण सोडितां जाती | उत्तम गुण अभासितां येती |
कुविद्या सांडून सिकती | शाहाणे विद्या ||५||
मूर्खपण सांडितां जातें | शाहाणपण सिकतां येतें |
कारबार करितां उमजतें | सकळ कांहीं ||६||
मान्यता आवडे जीवीं | तरी कां उपेक्षा करावी |
चातुर्येंविण उंच पदवी | कदापी नाहीं ||७||
ऐसी प्रचित येते मना | तरी कां स्वहित कराना |
सन्मार्गें चालतां जनां | सज्जना माने ||८||
देहे नेटकें श्रुंघारिलें | परी चातुर्येंविण नासलें |
गुणेंविण साजिरें केलें | बाष्कळ जैसें ||९||
अंतर्कळा श्रुंघारावी | नानापरी उमजवावी |
संपदा मेळऊन भोगावी | सावकास ||१०||
प्रेत्न करीना सिकेना | शरीर तेंहि कष्टविना |
उत्तम गुण घेईना | सदाकोपी ||११||
आपण दुसऱ्यास करावें | तें उसिणें सवेंचि
घ्यावें | जना कष्टवितां कष्टावें | लागेल बहु ||१२||
न्यायें वर्तेल तो शाहाणा | अन्याइ तो दैन्यवाणा |
नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
जें बहुतांस मानलें | तें बहुतीं मान्य केलें |
येर तें वेर्थचि गेलें | जगनिंद्य ||१४||
लोक आपणासि वोळावे | किंवा आवघेच कोंसळावे |
आपणास समाधान फावे | ऐसें करावें ||१५||
समाधानें समाधान वाढे | मित्रिनें मित्रि जोडे |
मोडितां क्षणमात्रें मोडे | बरेपण ||१६||
अहो कांहो अरे कां रे | जनीं ऐकिजेतें किं रे |
कळत असतांच कां रे | निकामीपण ||१७||
चातुर्यें श्रुंघारे अंतर | वस्त्रें श्रुंघारे शरीर |
दोहिमधें कोण थोर | बरें पाहा ||१८||
बाह्याकार श्रुंगारिलें | तेणें लोकांच्या हातासि काये
आलें | चातुर्यें बहुतांसी रक्षिलें | नाना प्रकारें ||१९||
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
समस्तीं बरें म्हणावें | ऐसी वासना ||२०||
तनें मनें झिजावें | तेणें भले म्हणोन घ्यावें |
उगेंचि कल्पितां सिणावें | लागेल पुढें ||२१||
लोकीं कार्यभाग आडे | तो कार्यभाग जेथें घडे |
लोक सहजचि वोढे | कामासाठीं ||२२||
म्हणोन दुसर्‍यास सुखी करावें | तेणें आपण सुखी व्हावें |
दुसऱ्यास कष्टवितां कष्टावें | लागेल स्वयें ||२३||
हें तों प्रगटचि आहे | पाहिल्याविण कामा नये |
समजणें हा उपाये | प्राणीमात्रांसी ||२४||
समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले |
यावेगळे उरले | तें करंटे पुरुष ||२५||
जितुका व्याप तितुकें वैभव | वैभवासारिखा हावभाव |
समजले पाहिजे उपाव | प्रगटचि आहे ||२६||
आळसें कार्येभाग नासतो | साक्षेप होत होत होतो |
दिसते गोष्टी कळेना तो | शाहाणा कैसा ||२७||
मैत्रि करितां होतें कृत्य | वैर करितां होतो मृत्य |
बोलिलें हें सत्य किं असत्य | वोळखावें ||२८||
आपणास शाहाणें करूं नेणें | आपलें हित आपण
नेणें | जनीं मित्रि राखों नेणे | वैर करी ||२९||
ऐसे प्रकारीचे जन | त्यास म्हणावें अज्ञान |
तयापासीं समाधान | कोण पावे ||३०||
आपण येकायेकी येकला | सृष्टींत भांडत चालिला |
बहुतांमध्यें येकल्याला | येश कैंचें ||३१||
बहुतांचे मुखी उरावें | बहुतांचे अंतरीं भरावें |
उत्तम गुणीं विवरावें | प्राणीमात्रांसी ||३२||
शाहाणे करावे जन | पतित करावे पावन |
सृष्टिमधें भगवद्‍भजन | वाढवावें ||३३||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चातुर्यलक्षणनाम समास सहावा || १४.६ ||

— चिंतामणी कारखानीस 

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..