माणसांनी मोठी स्वप्न बघावीत. या उक्तीला गुंडाप्पा सुद्धा अपवाद नव्हता. त्याचे स्वप्न होते कि, सरकारी ड्रेस असलेली नौकरी असावी. पोलिस आणि सैन्याच्या दुर्दैवाने, गुंडप्पाची फूटभर उंची कमी पडली, आणि त्यांनी एक लढवय्या, दमदार ,मर्द गडी त्यांनी गमावला. त्यांचे न भरून येणारे नुकसान झाले! पण गुंडाप्पानी मुळीच कच खाल्ली नाही. सब्र का फल मीठा होता है! उंचीची बाधा न येता, वर्दीवाली नौकरी गुंडप्पाला मिळाली!
तो ‘नित्य सेवा’ त कंडक्टर म्हणून रुजू झाला! (म्हणजे सिटी बस मध्ये कंडक्टर म्हणून!) रीतसर ट्रेनिंग झाले. आणि प्रत्यक्ष कार्यास आरंभ झाला. पहिले चारसहा दिवस, स्टेजेसचे पंचिंग कसे करावे, पैशाचा हिशोब कसा ठेवावा, ड्रायव्हरला बस थांबवण्यासाठी कशी बेल वाजवावी, वगैरे गोष्टी नीट समजावून सांगण्यासाठी, एक जेष्ठ कर्मचारी, सोबत होता. मग तो रूट स्वतंत्रपणे गुंडप्पाच्या ताब्यात आला.
एक आठवडा व्यवस्थित गेला. गुंडाप्पा काटेकोरपणे पंचिंग करायचा. त्याच्या बस मध्ये बिनतिकिट प्रवास करणे, केवळ अशक्य! असा लौकिक हळू हळू त्याच्या डेपोत पसरू लागला. गुंडप्पाची खाकी कॉलर टाईट!!
पण समस्या नाही असा माणूस नाही! गुंडाप्पा त्याला अपवाद होता. म्हणजे कालपर्यंतच होता! आज ती ‘समस्या’ समोर उभी राहिली. त्याचे झाले काय कि, नेहमीप्रमाणे त्याची बस सकाळी-सकाळी डेपोतून निघाली. पाच सहा स्टेजेस निर्विघनपणे पार पडली. लोक शिस्तीत बस मध्ये, मागच्या दाराने चढत होते, तिकीट घेत होते, आणि पुढच्या दराने उतरत होते. अन अचानक ती ‘समस्या’ पुढच्या दराने बस मध्ये घुसली! समस्या दांडगी हाती. सहा फूट उंच, भरदार छाती, पिळदार दंड, लोखंडी गोळ्या सारखी मान (जुन्या तोफेच्या गोळ्या सारखी!), अंगाला घट्ट चिकटलेले कपडे घातलेला रुमनदांडगा पैलवान!
गुंडप्पाच्या पोटात खड्डा पडला. किमान चार ‘गुंडाप्पा’ एकत्र केल्यावर, तो एक गडी झाला असता! तरी अंगावरच्या खाकी कपड्याचे कवच असल्याची जाणीव गुंडप्पाला झाली. मुळात निडर असलेला गुंडाप्पा ‘तिकीट, तिकीट’ करत हातातला पंचींगचा चिमटा वाजवत त्या धटिगणाच्या दिशेने निघाला. बरेच जणांनी तिकिटे घेतली. शेवटी त्याला त्या सहाफुटी ‘पासिंजर’ समोर यावेच लागले. ‘तिकीट -तिकीट’ म्हणत त्याने, त्या पॅसेंजरच्या नाका समोर चिमटा वाजवला. गुंडाप्पाच नाही तर, त्याचा तो पंचिंगवला चिमटापण धास्तावला असावा. त्या चिमट्यातून नेहमीच्या ‘कट-कट’ आवाजा ऐवजी, ‘राम-राम’ आवाज निघतोय असा गुंडप्पाला भास झाला.
“बाबू पैलवान, तिकीट कधीच काढत नसत्यात!” तो रणगाड्याच्या फायरिंग सारख्या आवाजात गुरगुरला.
गुंडाप्पाचा चिमटा चुपचाप जागेत परतला.
एक दिवस, दोन दिवस, आठवडा झाला, रोजच तो गुरगुऱ्या पैलवान, त्या ठराविक स्टेजला चढत होता, लास्ट स्टेजला उतरत होता. फुकट प्रवासाला सोकलाय बेटा! गुंडप्पाच्या मनाने नोंद घेतली. बस कंपनीचे नुकसान आपल्यामुळे होत आहे, हि टोचणी त्याचा मनाला वाळवी सारखी कुरतडू लागली.
जसे ‘ ज्याला समस्या नाही असा माणूस नाही.’ हे सत्य आहे, त्याच प्रमाणे, ‘समाधान नाही, अशी समस्या हि नाही!’ हे हि सत्यच आहे! आणि हे गुंडप्पाला माहित होते. गुंडाप्पाने त्या ‘समस्ये’चे ‘समाधान’ आपल्या कुवती प्रमाणे हुडकलेच! नुसते हुडकले नाही तर, त्याच्या अम्मलबजावणीची कार्यवाही सुद्धा सुरु केली.
‘जशास तसे’ या नियमाप्रमाणे, त्या पैलवानाला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचे त्याने ठरवून टाकले. डेपोत दिवसभराचा हिशोब दिला कि, तो जिम आणि कराटेच्या क्लासला जाऊ लागला. सकाळी तासभर घरातून लवकर निघून योगा आणि ध्यानाच्या शिबिरात न चुकता हजेरी लागू लागली. याचा परिणाम लवकरच दिसू लागले. निम्याच्या वर पगार जिम आणि योगा गुरु यांच्या चरणी अर्पण होऊ लागला!
शेवटी तो सुदिन उगवला. सारी हिम्मत एकवटून, जमेल तेव्हडी छाती काढून तो, बाबू पैलवाना समोर उभा राहिला.
“तिकीट-तिकीट!”
“हा बाबू पैलवान तिकीट काढीत नसतो!”
“पण का?”
“कारण बाबूकडे वार्षिक पास आहे!”
आता गुंडाप्पा, फक्त आपल्याच डोईचे केस उपटायचे बाकी होता! या समस्येचे, हे असले समाधान असेल हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते.
तर मित्रानो ‘समस्या नाही असा माणूस नाही, आणि समाधान नाही अशी समस्या, या जगात नाही!’ हे सत्यच आहे. फक्त ‘समस्या!’ नक्की काय आहे, हे कळले पाहिजे. नसता पैसे, वेळ वाया जातोच, पण त्याही पेक्षा ‘गाढवपणा’ पदरी पडतो! पण वाईटातहि काही तरी चांगले असतेच. कालांतराने हाच ‘गाढवपणा’ ‘अनुभव’ म्हणून, अभिमानाने चार लोकांना सांगता येतो.
शेवटी अनुभव -अनुभव म्हणजे तरी काय असत? आयुष्यभर केलेल्या चुकांच्या परिणामाचे गाठोडे! (अर्थात हि माझी व्याख्या आहे.)
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
(मूळ कल्पना नेट वरून.)
Leave a Reply