नवीन लेखन...

समतोल…

“आम्ही पैसा नसेल कमावला पण आम्ही माणसं कमावली …” आपल्या परिचयाच्या ज्येष्ठ पीढी चे प्रतिनिधी (आजोबा , आजी) बऱ्याचदा हे वाक्य म्हणतात. हा विषय अलीकडे घरातही निघाल्यामुळे माझी उजळणी झाली.

मुळात या गोष्टी एकत्र होऊच नयेत का, असा प्रश्न , हे विधान ऐकल्यावर नेहमी पडतो. नशिबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालावायची तर आपल्या नशीबात जितका पैसा येणं आहे तितका आपोआप येणार. असं म्हटलं तर मग माणसांचही तसंच असलं पाहिजे.

तसंच, आपण आपलं नशीब स्वतः घडवतो यावर ज्यांची श्रद्धा आहे ते म्हणतील कि आपल्या आयुष्यातील माणसं कोण व किती हे जसं आपण ठरवतो तसंच किती पैसे येणार हेही आपल्याच हातात आहे.

माणसं खरंच कमवता येतात का? जे कमवतो त्यावर आपला संपूर्ण अधिकार असतो. म्हणूनच आपण पैशांचा विनियोग करु शकतो. माणसं, अगदी दिवसाला एक या प्रमाणे जरी जोडली तरी माणसांवर आपला अधिकार नाही हे मुळात समजून घेण्याची गरज आहे. केवळ ती माणसं आपल्या नात्याची आहेत, परिचयाची आहेत का आपले मित्र आहेत म्हणून आपण अपेक्षा ठेवतो मात्र त्यांच्यावर अधिकार गाजवू शकत नाही.

पैसे आणि माणसं याला आपापलं महत्वाचं स्थान आहे. यातलं काहीतरी एक आहे आणि दुसरं नाही, तरी अडणारच आहे. केवळ पैसा जोडला तर आयुष्य इतकं यांत्रिक होऊन जाईल की ते पुन्हा रुळावर आणण्याकरता माणसाची गरज पडेलच . तसंच माणसं जोडण्याच्या नादात पैसे मिळवण्याकडे , साठवण्याकडे व गुंतवण्याकडे दुर्लक्ष केलं तर वेळप्रसंगी जोडलेली माणसं मदतीला येतीलच याची खात्री नाही. विशेषतः ज्या वयात आधाराची गरज असते त्या वयात माणसं मदतीला नाही जरी आली तरी पैसा मदतीला येतो. प्रात्यक्ष पैसा काही करत नसला तरी पैशांनी माणसं नाही, माणसांची मदत मात्र नक्की विकत घेता येते.

याचा अर्थ असा नव्हे की ज्येष्ठ पिढीचं म्हणणंच खोडुन काढावं . या पिढीचं कौतुक यासाठी की त्यांच्याकाळी संपर्क व संवाद घडावा याकरता प्रत्यक्ष भेटणं किंवा हजर असणं महत्वाचं होतं. त्यामुळे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यापर्यंत या पिढीने माणसांची विविधता अनुभवली आहे. प्रत्येकाचे स्वभाव निराळे , गरजा निराळ्या , वागायची पद्धत निराळी . मात्र या पिढीने हे लीलया जमवलं कारण यांचा जनसंपर्क आपोआप घडत असे.

यामुळे एका माणसाला वारंवार भेटणं होत असे तसंच रोज वेगवेगळ्या माणसांना, एकाच्या ओळखीने दुसऱ्याला भेटणं , ओळख होणं घडत असे. याला ही पीढी, माणसं जोडली असं म्हणत असावी. व त्यांच्या भावना बरोबरही आहेत. यामुळे काहींशी जन्मजन्मांतरीचा ऋणानुबंध जुळले तर काहींशी फक्त ओळखी झाल्या.

आज काहिही न बोलता एक? type केला तरी अर्थ कळतो. प्रत्यक्ष भेटायची किंवा बोलायची गरज पडत नाही. आणि तरीही गरजेपुरता संपर्क राहतो.

याशिवाय एक महत्वाचा मुद्दा असा की , पूर्वी सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागत नसत. उदाहरणार्थ भाजी, धान्य, तेल तूप इ बऱ्याचदा घरचं असायचं..याही व्यतिरिक्त किडूकमिडूक बऱ्याच गोष्टी पैसे देऊन विकत घ्याव्या लागायच्या नाहीत. त्यामुळे पैसा वाचवायचा, साठवायचा आणि गुंतवायचा कशासाठी? हा प्रश्न पडणं त्या काळी स्वाभाविक होतं .

आता परिस्थिती पूर्णतः बदलली .आज पैसे मोजल्याशिवाय काहीही मिळत नाही हेच सत्य आहे. मात्र काही अपवाद वगळता ज्येष्ठ पिढीला मात्र आजच्या काळाशी जुळवून घेता जड जात असावं . पूर्वी इतका जनसंपर्क नाही, स्वस्ताई नाही आणि कदाचित स्वतःकडे पुरेसे savings नाही. पैशाला माणसांपेक्षा जास्त किंमत असेल हे कुणाला ठाऊक होतं? कितीही कटू असलं तरी savings हीच आपली मुलं ..खरी काळजी उतारवयात तेच घेतात हे पचनी पडणं अवघड असल्यामुळे आखेर हे म्हणायची वेळ येते कि आम्ही माणसं कमावली…

ताठ मानेने जगता येण्याकरता पुरेसे पैसे आणि पुरेशी माणसं तेवढी हवी. कुठल्याही गोष्टीला अति महत्व देणं जसं अयोग्य तसं कुठल्याही एकाला अधिक महत्व देणंही अयोग्य आहे.

पैसे हा कमावण्याचा विषय तर माणसं हा जिव्हाळ्याचा विषय .मात्र माणसं जितकी जोडावी तितकी कमी तसाच पैसे जितका मिळवावा तितका कमीच. त्यामुळे दोन्ही बाबतीत कुठे थांबावं हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे. विषयांची भेसळ न करता दोन्हीला आपापल्या ठिकाणी राहू दिलं तर कुठलाच विषय दुसऱ्याहून मोठा होणार नाही.

वर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा..

यानेच ऐक सशक्त समाज उभा राहू शकेल व येणाऱ्या पिढीचा विवेक जागृत राहू शकेल.

— गौरी सचिन पावगी
©️gauripawgi.blogspot.com

Image: google

Avatar
About गौरी सचिन पावगी 26 Articles
व्यवसायाने भरतनाट्यम नृत्यांगना आणि नृत्य शिक्षिका आहे. मराठी या माझ्या मातृभाषेचा मला अभिमान आहे .दैनंदिन जीवनातले अनुभव गोळा करून त्यावर लेखन करणं हे विशेष आवडीचं .ललित लेखन हा सुद्धा आवडीचा विषय . वेगवेगळ्या धाटणीचं लेखन करायच्या प्रयत्नात आहे. वाचकांनी प्रतिक्रिया आवर्जून comments किंवा ई-मेल द्वारे कळवाव्या ही नम्र विनंती. email id: gauripawgi@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..