दि. २९ डिसेंबर २०१७ रोजी ‘कमला मिल्स’ येथील पबमधे आग लागून त्यात १४ बळी गेले. या घटनेला ९ दिवस होऊन गेल्यावर आज ‘मोजो बिस्ट्रो’ पबचे मालक आणि भारतीय पोलीस सेवेतले (IPS) अधिकारी श्री. के. के. पाठक -आता निवृत्त- यांचे सुपुत्र श्री. युग पाठक यांना आज पोलीसांनी अटक केल्याची बातमी पाहिली आणि नेटवर वाचली.
श्रीमान युग पाठक पोलीस स्टेशनात स्वत: त्यांचं स्टेटमेंट रेकाॅर्ड करण्यासाठी गेले असता पोलीसांनी त्यांना अटक केलं, असंही पुढे या बातम्या सांगतात. म्हणजे पोलीसांनी त्यांना शोधून काढून, बेड्या घालून फरफटत आणलं, असं मला बातमीचं हेडींग पाहून वाटलं, पण तसं काही घडलं नाही, हे पूर्ण बातमी वाचली तेंव्हा समजलं. अर्थात,पोलीसांनी श्रीमान युगजीना धरण्यासाठी या ९ दिवसांत अगदी आकाश-पाताळ एक केलं असेल, यात माझ्या मनात अजिबात शंका नाही, तुमच्याही नसावी. मुंबई पोलीसांची ख्याती आहेच तशी. पण एवढं करुनही पोलीस त्यांना शोधून काढू शकले नाहीत. कदाचित असंही झालं असावं, की श्रीमान युगजींना शोधण्याच्या धांवपळीत आकाश आणि पाताळाच्यामधे जमिन नांवाचा काही प्रकार असतो, हेच पोलीस कामाच्या प्रेशरमधे विसरले असावेत. दिवा कसं, नेमका स्वत:च्या बुडाखाली प्रकाश पाडायचा विसरतो, अगदी तसंच. हे असं होणं नैसर्गिकच असावं बहुदा. शेवटी घटनेला ९ दिवसांचा कालावधी उलटून गेल्यावर, आपल्या वडीलांनी ज्या खात्यात इतकी वर्ष इमाने इतबारे चाकरी केली, त्या खात्यावर कसलाही बट्टा लागू नये म्हणून, श्रीयूत युग पाठक यांनी पोलीस ठाण्यात स्वत:च हजर होऊन स्वत:ला अटक करवून घेतली. कलीयुगात असं उदाहरण विरळाच झालंय हल्ली..
श्री. युग पाठक यांच्या मनाच्या मोठेपणाबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन करायला हवं. या ९ दिवसांच्या कालावधीत, आपल्यामुळे १४ बळी गेले, या पच्छातापाच्या आगीत दग्ध होऊन त्यांच्या मनाला अतीव यातना झाल्या असतील. मनाला यातना झालेला माणूस काय करतो नि काय नाही, याचं त्याला भान राहात नाही. माजी अती वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री. पाठक यांची भावूक संतान असलेल्या श्री. युगजी पाठक यांचीही मानसिक अवस्था काहीशी अशीच झाली असावी आणि या परिस्थितीत नेमकं काय करावं हे त्यांना उमगलं नसावं आणि म्हणून त्यांना पोलीसांसमेर हजर होण्यास ९ दिवसांचा कालावधी लागला असावा. लोकं काय, काहीही बोलतात. काय तर म्हणे, पोलीसांचा माणूस म्हणून तो सापडत नाही. पोलीसांना कायद्यासमोर सर्व सारखे असतात, हे इतकी वर्ष हिन्दी सिनेमे पाहूनही लोकांना कळलं कसं नाही, याचंच आश्चर्य वाटतं..
असो. ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड. शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!!
हिन्दी कवी ‘मंगल विजय’ म्हणतात,
“समय है दिव्य जागरण का,
समय है स्वर्ग अवतरण का..
साधको, सावधान रहना,
समय है युगपरिवर्तन का..!!”
हे मला हल्ली बऱ्यापैकी पटू लागलंय..म्हणून मी असं काही घडलं, की त्याचं स्वागत करतो (दुसरं असतं तरी काय आपल्या हातात?). यातलं ‘साधको’ हा शब्द जन्तेलाच उद्देशून असणार. सध्या समाजात जे काही चाललंय, ते पाहून समाजासोबत आनंदी राहायला साधनाच लागते..
बाकी तिथलाच आग लागलेला अन्य बार ‘वन अबव्ह’चे मालक मात्र गेले ९ दिवस पोलीसांना हुलकावण्या देत फिरतायत आणि त्यांना आता नाईलाजाने ‘फरार’ घोषित करून, त्यांना पकडून देणाराला १ लाखाचे इनाम घोषित करावं लागलंय. या ‘खलां’ना मात्र पोलीसांनी कायद्यातली कठोरात कठोर कलमं लावून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करावेत. आमच्यासारखी जन्ता तुमच्यासोबत आहेच..
— ©नितीन साळुंखे
9331811091
chann!