समय कोणा काय शिकवे
कोणाचे अश्रू काय सांगे
आधी कळून घ्यावे पुसुनी
मग बोलावे
वेळ, प्रसंग, परिस्थिती गंभीर
सर्व क्रियेसी लागीला घोर
गप्प राहुनी जगती थोर
अशा समयी
अर्थ–
समय कोणा काय शिकवे
कोणाचे अश्रू काय सांगे
आधी कळून घ्यावे पुसुनी
मग बोलावे
(समोरचा काय वागतोय त्यापेक्षा, तो तसा का वागतोय हे समजून, विचारून घेणं जास्त महत्वाचं असतं. कोणाचे अश्रू सुखाचे तर कोणाचे दुःखाचे हे कळणं फार कठीण कारण आजच्या जगात माणुसकी धर्म आणि आपुलकी फार कमी पाहायला मिळते. म्हणून कठीण समय येता एकमेकांना धरून, विचारून, समजून रहाणं केव्हाही हिताचं असतं.)
वेळ, प्रसंग, परिस्थिती गंभीर
सर्व क्रियेसी लागीला घोर
गप्प राहुनी जगती थोर
अशा समयी
(सध्या जगावर फार मोठं संकट आलेलं आहे, त्यात सारं जनजीवन ठप्प झाल्यामुळे अनेकांना आपलं ज्ञान प्रकट करायला फार चांगला मौका आहे. पण त्यातून काही वितुष्ट येणार नाही ना याचा विचार होणं गरजेचं आहे कारण जग चांगलं विसरून जातं पण वाईट बोलणं कदापी विसरत नाही आणि म्हणूनच अशा वेळी मोठी आणि समजूतदार लोकं गप्प रहाणं पसंत करतात.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply