आपल्या प्रत्येकाला जगण्यापलीकडचं जीवन अधिक आनंद देत असतं. ह्या आनंदात अनेकदा आपण आत्मकेंद्रित झालो तर मात्र इतरांच्या बाबतीतील आपल्या जाणिवाच संपुष्टात येण्याची शक्यता असते. आयुष्यात दुसऱ्यांसाठी करण्यासारखं खूप काही असतं, पण आपलंच तिकडे लक्ष नसतं. आनंदातिरेकानं काहीवेळा आपल्याला जगाचा, इतरांचा विसर पडतो, पण दु:खाच्या वेळी मात्र प्रत्येकाच्या आठवणी आल्याशिवाय आपला एकही क्षण जात नाही. एखाद्याच्या दु:खापेक्षा कोणालाही सुखात सहभागी व्हायलाच आवडत असतं. सद्य:स्थितीत तर ह्या व्हर्च्युअल जगात रममाण झालेल्या व्यक्ती फेसबुकवरील तुमच्या पोस्टला कदाचित लाईक करतीलही, पण ती पोस्ट शेअर करतीलच असं नाही, अथवा त्यावर कमेंट करतीलच असंही नाही. आपणही अनेकदा ट्विट करण्याऐवजी क़्विट करणं अधिक पसंत करतो, योग्य समजतो. का? काय कारण असू शकेल बरं? आपापसातील गोष्टी शेअर करण्यातून परस्परांची केअर केल्याची प्रचीती येते, काहीवेळा बेअर देखील करावं लागतं; तरच कोणालाही डेअर करताना आश्वासक वातावरणाची अनुभूती येत असते. ह्यांपैकी खरंच आपण काय काय करतो? ह्याची गरज नसते का? ह्या सर्वच बाबींची अभ्यासपूर्वक जाणीव करून घेण्याची जरुरी असते.
- संस्कृतीच्या नावाखाली…..
आजच्या आधुनिक युगातही एकूणच समाजाच्या दृष्टीकोनातून स्त्रीची समानता आभासीच असल्याचं स्पष्ट होतं. अर्थात सद्य:स्थितीत समता आणि स्वातंत्र्य स्त्रीला दिलेलं दिसतं; ते एकूणच शिक्षणानं आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे, कायद्यामुळे आणि एकंदरच जगात सर्वत्र वाहत असलेल्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. अगदी खोलात जाऊन अभ्यासाच्या दृष्टीकोनातून वस्तुस्थितीकडे बघितलं तर, मुळातच विकृतीतून येणारी समाजातील वर्चस्वाची मानसिकता आणि त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही, हे स्पष्ट होतं. ही विकृतीच असल्याचं म्हणावं लागेल. अनेकदा संस्कृतीच्या नावाखाली अनेक विचार मांडले जातात, स्त्रियांशी वर्तनही त्याचप्रमाणे केलं जातं आणि तिच्याबरोबर व्यवहार न करता व्यभिचारच केला जातो. एकीकडे आपला देश प्रगत होत असल्याची चर्चा आपण करत असतो, तर दुसरीकडे संस्कृतीच्या बुरख्याखाली स्त्रीचं अस्तित्वच झाकून ठेवतो. काहीवेळा तर ते अस्तित्वच संपुष्टात आणलं जातं, स्त्रीभ्रूणहत्या करून. ही असली संस्कार विरहीत संकृती काय कामाची? अर्थात संकृती इतकाच ह्या विकृतीला देखील मोठा इतिहास आहे, अलीकडच्या काळांत हे विषय चव्हाट्यावर यायला लागले आहेत इतकेच. एखाद्या विशिष्ट संस्कृतीच्या बाबतीत अजिबात आक्षेप असायचं कारण नाही, परंतू त्या संस्कृतीच्या नावाखाली जे विकृतीकरण होत आहे, त्यातील गांभीर्याची जाणीव होणं जरुरीचं आहे.
- “मी” विकृतीचा पगडा
एकूणच आपल्या समाजात हजारो वर्षांपासून परंपरागत रूढी-परंपरा, धोरणांमुळे आणि धारणांमुळे अनेकदा एखाद्या विशिष्ट वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष होत असतो, पण त्यातून स्त्रीबद्दल सामाजिक घटकांच्या ठायी असूया निर्माण होत असते ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचं म्हणता येईल. खरं तर, स्त्रीला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे आणि अंगी असलेल्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश ती मिळवत असते, ते यशच आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का समाजात वाटत असतो का? समाजाकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली, स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक अनाकलनीय वक्तव्य आपण ऐकत असतो, हे प्रत्येक सुज्ञ व्यक्ती केवळ मान्यच करेल असं नाही, तर त्याच्याशी सहमत देखील होईल. कदाचित ह्याच रोषाचं प्रकटीकरण म्हणून एखादं वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल, तिथे बलात्कारात, स्त्रीवरील अत्याचारांत दिसून येतं. ह्या अशाप्रकारच्या “मी” विकृतीचा पगडा इतका असतो कि, स्त्रीच्या बाबतीत समाजातील काही घटक हिंसाचार करायला देखील मागे-पुढे बघत नाहीत, ते अत्यंत घातक असते. अशा प्रकारे समाजातील विशिष्ट घटकाचे जाहीर प्रदर्शन करण्यांत कोणते कर्तुत्व दाखवायचे असते, हाच कळीचा मुद्दा आहे. किमान एक माणूस म्हणून तरी ह्याची जाणीव ठेवणं आवश्यक असतं.
- “ति” च्या प्रकृतीचा विसर
स्त्रीला खरं तर अबला म्हणण्याची सद्य:स्थितीत आवश्यकता नाही. अनेक कारणामुळे कि ती देखील आता सर्वच पातळ्यांवर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचं कर्तुत्व जगासमोर सिद्ध करून दाखवत आहे. स्त्रीचं कर्तुत्व, नेतृत्व, वक्तृत्व, दातृत्व आणि मातृत्व तिच्या प्रत्येक विचार, वर्तन आणि व्यवहारांतून स्पष्ट होत असल्याचं जग बघत आहे. तरीही तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन न बदलला जाणे हीच समाजामध्ये उणिव असल्याचं म्हणलं तर काय चुकीचं आहे? “ति” च्या प्रकृतीचा विसर पडल्याचं आपल्यातील सुज्ञ जाणू शकतील. सुज्ञांना झालेल्या जाणिवांमुळे कदाचित समाजात तिच्यावर प्रत्येक गोष्ट लादणे कमी होईल. अनेक समस्या अशा असतात कि, त्या तिच्या पुरत्याच मर्यादित असतात, त्या समस्यांवरील उपायांची सुरुवात तिला स्वतःपासूनच करायला लागणं ह्यासारखी दुसरी शोकांतिका नसावी. समाजातील काही विकृत प्रवृत्ती करत असलेल्या अनेक अन्याय, अत्याचारांमुळे तिला आलेला शारीरिक थकवा आणि मानसिक लखवा हा क्षणिक नसतो. तिच्या प्रकृतीचा विसर पडलेले मात्र तिचं शरीर यंत्रासारखं आणि मन मंत्रासारखं कार्यरत राहावं असं अपेक्षित करत असतात. जेव्हा एखाद्या घरांत ज्येष्ठ स्त्रीमध्येच विशिष्ट प्रकारचे वर्चस्व असतं, तेव्हा त्याचे विपरीत परिणाम त्याच घरातील इतर स्त्रियांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याप्रमाणे भोगावे लागतात. स्त्रियांच्या आयुष्यातील ह्यासारखी दुसरी शोकांतिका कोणती असू शकेल? “ति” च्या प्रकृतीचा विसर होणं, हीच मोठी उणिव म्हणावी लागेल.
- चूल-मूलच्या विचारांची भूल
आपल्या संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक स्त्रीला चूल-मूलच्या विचारांमध्येच गुरफटून राहावं लागतं. आपण प्रगतीपथावर असल्याचा आभास निर्माण करून काही निष्पन्न होत नसतं, ह्याची जाणीव होणं महत्वाचं असतं. स्त्री-पुरुष समानता म्हणजे आपापसातील स्पर्धा निश्चितच नाही अथवा स्पर्धात्मक बरोबरी देखील नाही. कुटुंबातील सर्वच पातळीवरील निर्णय मग ते शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अथवा कौटुंबिक कोणतेही असोत, त्या निर्णयांमध्ये स्त्रीचा सहभाग असणं म्हणजेच स्त्री-पुरुष समानता असणं होय. ह्या समानतेत विचार, वर्तन आणि व्यवहार सर्वच बाबी समसमान असणं अभिप्रेत असतं. अर्थात, स्त्रीनं देखील केवळ नोकरी करून, सर्व कामे करून, इतरांसारखे कपडे घालून, पार्टीत दारू, सिगारेट सारखी व्यसनं करून समानता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेकांना कोणताही निर्णय घेताना “मी किती हुशार” हे दाखवून देण्यांत आनंद वाटत असतो. “ति” च्या बाबतीत तिचे विचार, वर्तन आणि व्यवहार अभ्यासपूर्वक समजून घेतले पाहिजेत, तिच्या कर्तृत्व आणि नेतृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. तिच्या केवळ शरीराचाच विचार केला जातो, पण तिच्या मनाला अव्हेरून तिची क्रूर थट्टा केली जाते. परंपरागत स्त्रीला चूल-मूलच्या विचारांची भूल दिली जात असते. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला त्याची सातत्यानं आठवण आणि जाणीव करून देत असते. का बरं, एखाद्या स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीच्या संवेदनांची जाणीव होत नाही? त्या संवेदना सहवेदना का वाटत नाहीत? चूल-मूलच्या विचारांची भूल दिल्यामुळे असं होतं का?
प्रत्येक अनुचित घटना ह्या “ति” च्याच बाबतीत घडतात आणि घटनेविरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी मेणबत्त्या पेटत राहतात. तिच्या काळजीपेक्षा त्या मेणबत्त्या पसरवत असलेल्या काजळीत आपण धन्यता मानत राहतो. प्रत्येक पीडितेला न्याय मिळतोच असं नाही आणि घडलेल्या घटनेतून काही बोध घेऊन तशाच घटनेची पुर्नारावृत्ती होणार नाही असंही नाही. म्हणजे ही जाणिवांचीच उणिव म्हणावी लागेल. अर्थात, स्त्रीचं कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी म्हणून तिनं चूल-मूल सांभाळणे एकवेळ ठीक आहे. परंतू तिच्यावर त्याची भूल घातल्याप्रमाणे तिची अवस्था होणं कितपत योग्य आहे, ह्याचाही गांभीर्यानं विचार होणं जरुरीचं आहे. अशी अवस्था न होण्यासाठी समाजमनातूनच काही तरी व्यवस्था होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी केवळ चूल-मूलच्या कचाट्यातून तिची सुटका होऊ दिली जात नाही. तिला तिचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पातळीवरील काम दुर्लक्षित करावं लागतं. तिला ह्याच कारणानं प्रत्येक बाबतीतील प्राधान्य बाजूला सारून सामान्यच राहावं लागतं. चूल, मूल ह्यांपैकी मूल तिचं आपत्य असतं निश्चितच आपत्ती नसते, त्यासाठी देखील कायद्यानं, नियमानुसार पुरेसा कालावधी तिच्या आपत्याच्या संगोपनासाठी मिळत असतो. चूल मात्र तिला चुकत नाही, कारण समाजातील मानसिक पातळीवरील वैयक्तिक कायद्यात चुलीचा कायदा चुलीत घालणारी मानसिकता बदलतच नाही.
- तरीही सक्सेसफुल
एकाच स्त्रीला अनेक पात्रांच्या भूमिका एकाच वेळेस साकारायच्या असतात. कधी बहिण, पत्नी, जाऊ, नणंद, मैत्रीण, आई, आजी, मावशी, आत्या, काकू इत्यादी सर्व घराशी, कुटुंबाशी संबंधित तर, सल्लागार, मार्गदर्शक, शिक्षिका, लेखिका, डॉक्टर, पत्रकार, अधिकारी वगैरे भूमिका तिला घराबाहेर अगदी तंतोतंत साकारायच्या असतात. प्रत्येक भूमिका साकारताना तिला चूल-मूल दुर्लक्षित करून चालत नाही. तिला तिच्या आयुष्यातील सर्वच नाती जपायची असतात, ती टिकवून ठेवावी लागत असतात. घरी काय किंवा दारी काय “ति” ला फूल समजणारे आणि नेहमीच एप्रिल फूल करणारे एकूणच संख्येनं काही कमी नसतात. तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा १ एप्रिल सारखाच एप्रिल फूल करणारा असतो. एकीकडे तिचं तोंडभर कौतुक केलं जातं, कि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. दुसरीकडे मात्र तिच्या कर्तुत्वावर शंका घेतली जाते, तिच्यावर टीकास्त्र सोडलं जातं. अशा परिस्थितीत सक्षमपणे प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन, सहन करून तिच्या यशप्राप्तीच्या प्रवासाचा आनंद तिलाच मिळवायचा असतो. चूल आणि मूल समर्थपणे सांभाळून देखील सक्सेसफुल होणाऱ्या स्त्रीशक्तीला मनापासून मानाचा मुजरा.
विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply