ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी उर्फ ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ यांचा जन्म २१ मे १९२८ रोजी मुंबईच्या उपनगरातील जोगेश्वरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सर चंदावरकर शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण राममोहन शाळेत आणि चिकित्सक समूहाच्या शाळेत झाले. त्यांचे प्रारंभीचे महाविद्यालयीन शिक्षण एल्फिस्टन आणि विल्सन महाविद्यालयात झाले. १९४९ मध्ये बी. ए . आणि इंग्रजी घेऊन त्यांनी एम. ए . केले. त्यांना शाळेत असल्यापासून लेखनाची आवड होती. १९४९ च्या सुमारास प्रमुख नियतकालिकातून त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. मौज साप्ताहिकांतून नियमितपणे ते स्फुट लेखन करत होते.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी मौज साप्ताहिक आणि सत्यकथे मधून ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ या नावाने त्यांनी लेखन केले..
त्यांचे ‘ तुकाराम शेंगदाणे ‘ हे नाव आणि लेखन त्यावेळी खूपच गाजले. १९५१ ते १९५३ या काळात त्यांचे इंग्लंडमध्ये वास्तव्य होते . त्यांनी भारतीय परराष्ट्रीय हायकमिशनच्या परराष्ट्र खात्यात नोकरी केली. त्यानंतर ज्ञानेश्वर नाडकर्णी पत्रकारितेत स्थिरावले . १९५६ ते १९५९ या काळात त्यांनी ‘ शिल्पी ‘ या जाहिरात संस्थेत काम केले. अनेक इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्ह्णून त्यांनी काम केले. त्यांनी दोन बहिणी , कोडी या दोन कादंबऱ्या लिहिल्या . तर पाऊस आणि भरती हे त्यांचे कथासंग्रह सुरवातीला प्रसिद्ध झाले. त्यांचा ‘ चिद्घोष ‘ हा कथासंग्रह खूप गाजला. नाडकर्णी यांचे लिखाण वेगळे होते कारण त्यांच्याकडे जगावेगळी दृष्टी होती , त्यांची अनोखी प्रतिमा सृष्टी होती . त्यांच्या कथांमधून भरपूर पात्रे असत आणि त्यामध्ये विलक्षण गुंतागुंत असे. १९८८ साली त्यांचा प्रस्थान हा कथासंग्रह प्रकाशित झाला . परंतु त्यांना कादंबरी लेखन हे जास्त आव्हानत्मक वाटत असल्यामुळे त्यांनी चरित्र , नजरबंद , वलयांकित ह्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या ललितलेखनातून कालक्षेत्रातील निरिक्षणांवर तसेच मुंबईतील उच्चभ्रू , पारशी , ख्रिस्ती अशा समाजातील बहुरंगी वातावरणावर , त्यांच्या संबंधातील गुंतागुंतीवर , त्या समाजाच्या सहवासावर आधारलेले असे वाटत असे आणि त्यामुळे ते वास्तव , ताजे वाटत असे. नाडकर्णी यांनी विलायतेंतील कलाक्षेत्राचे दर्शन घडवणारी लेखमाला लिहिली होती. ह्यावरून आठवले की ते उत्तम स्केचेस काढत . एकदा ते आणि एम. एफ. हुसेन जहांगीरच्या हॉटेलमध्ये भेटले होते तेव्हा मी त्यांना माझ्या छंदाबद्दल संगितले तेव्हा गप्पा मारता मारता लॉरेन्स ऑलिव्हीएचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले मी त्याला भेटलो आहे , मी त्यांचे स्केच काढले आणि त्यावर त्याची ऑटोग्राफही घेतली होती. त्यांचे अनेक लेख ‘ सत्यकथेमधून ‘ प्रकाशित झालेले होते , त्यात त्यांनी स्केचेसही काढली होती . ते लेख आणि स्केचेस त्यांच्या १९५९ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ विलायती वारी ‘ मध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी अभिनय , पिंपळपान ही पुस्तके लिहिलेली आहेत.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या आवडीची आणखी दोन क्षेत्रे होती नाटक आणि चित्रपट.त्यांनी पिकासो , हिचकॉक , मराठी नाटक आणि रंगभूमी , भारतीय चित्रपटसृष्टीतील नवे प्रवाह इत्यादी पुस्तके लिहिली. त्यांच्या १९८८ साली लिहिलेल्या ‘ अश्वस्थाची सळसळ ‘ या त्यांच्या पुस्तकात नानासाहेब फाटक , मा. दत्ताराम , चार्ली चॅप्लिन, शंभूमित्र , मार्सेल मार्लो यासारख्या कलावंतांवर लिहिले आहे तसेच बॅरिस्टर , अपुर संसार , जलसाघर , गांधी ह्या चित्रपटांवर आस्वादात्मक लेख लिहिले आहेत. त्याचा ‘ कलासाहित्य क्षेत्रातील शिलेदार ‘ ही पदवी देऊन फ्रेंच सरकारने त्यांचा गौरव केला होता.
एम. एफ . हुसेन आणि त्यांची मैत्री होती. त्यांनी एम.एफ. हुसेन यांचे ‘ अनवाणी ‘ हे अत्यंत सुंदर असे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘ Balgandhrav and the Marathi Theater ‘ आणि ‘ Gaitonde ‘ ही दोन समीक्षात्मक पुस्तके इंग्रजीमध्ये लिहिली आहेत. ज्ञानेश्वर नाडकर्णी हे कालसमीक्षेमधील अत्यंत अग्रणी होते.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती , मराठी नाट्यपरिषदेचे वि.स.खांडेकर पारितोषिक , त्यांच्या ‘ चिद्घोष ‘ या कथासंग्रहाला ललित परितोषिक, ललित अकादमी असे अनेक मानसन्मान लाभले.
अशा या कलासमीक्षकाचे २३ डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply