सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.
ऑफिसला जायला निघालो की नजर आपोआप वर जाते. मी राहतो त्याच्या शेजारच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर खिडकीत तो बसलेला असतो. शांतपणे येणारे-जाणारे पाहत असतो, सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत खिडकीत बसण्याची त्याची वेळ आहे हे मला चांगल माहीत आहे.
तसं मुद्दाम त्याच्याकडे लक्ष जाव असं काही नाही. पण लहानाचा मोठा होताना त्याला मी पाहिला आहे. त्यामुळे तो खिडकीत बसलेला दिसतो. सहजच लक्ष जातं. इतर लोकांच लक्ष जात असावं असं वाटत नाही. कारण इतक्या वर कोण कशाला बघायला जातो. बरं तो भुंकतही नाही. माणसांकडे बघून भुंकत नाही. कुत्र्यांकडे बघून भुंकत नाही. बरं माणसू नाही, कुत्रा नाही. किमान इतर जनावरांकडे पाहून तरी भुंकत असेल असं वाटलं. रस्त्यावर गाय-म्हशी येतात, पण त्याला कधी भुंकताना पाहिलं नाही. एकदा अस्वलवाला आला. रविवारचा दिवस होता. अस्वलाच्य नाकातील दोरी खेचून त्यांने त्याला बऱ्याच उलट-सुलट कोलांटया उडया मारायला लावल्या. खूप गर्दी झाली. गल्लीतल्या कुत्र्यांनी ओरडून एकच आकांत केला. ओरडत होती आणि लांब लांब पळत होती. तो बाकी पाचव्या मजल्यावरच्या गच्चीत बसून मख्खपणे पाहत होता. जणू काही खाली काय चाललंय याच्याशी त्याचा काहीच संबंध नव्हता. घरातली मंडळी दुसऱ्या खिडकीतून खाली पाहत होती. ती कंटाळून निघून आत गेली. पण तो बाकी आपल्या जागेवर बसूनच होता.
खुर्चीत बसल्यासारखा बसून असतो. त्याला बसण्यासाठी खास स्टुल किंवा दिवाण केला असावा. त्याशिवाय बरोबर खिडकीबाहेर डोकं काढून रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणा-यांची टेहळणी करत तो बसला असता. खिडकी पूर्ण उघडी असते. जाळी वगैरे काही नाही. उभा रहिला तर अर्धी खिडकी कापेल. वाटलं तर तो खाली उडी मारु शकतो. पण तसा विचारसुध्दा त्याच्या मनात कधी येत असेल असं वाटत नाही.
त्याचा फिरायला जाण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. रात्री 11 वाजता तो खाली येतो. त्याचा मालक त्याच्या बरोबर असतो. मालकाबरोबर तो पाय मोकळे करतो. साखळीने गळपट्टा बांधलेला असतो. ओरड नाही की ओढत नाही. मालकाच्या चालीने त्याच्याबरोबर चालत राहतो. रस्त्यावरुन एक-दोन चकरा झाल्या की परत लिफ्टने पाचव्या मजल्यावर. सकाळी साडेसहा वाजता प्रभातफेरी. त्यांवेळी मालकीण बरोबर असते. ती एक-दोन चकरा मारते. परत लिफ्टने पाचवा मजला आणि खिडकी यात फारसा फरक नाही. कधी तरी शाळेतला मुलगा रविवारी त्याला थोडसं लांब असलेल्या मैदानावर घेऊन जातो. पण खेचाखेच नाही.
अगदी छोटासा होता तेव्हापासून त्याचा हा उपक्रम चालू आहे. बघता बघता तो अंगाने उंचीने वाढत गेला. नवीन नवीन रंगीत पट्टे त्याच्या गळयात चमकू लागले. पांढराशुभ्र आणि करडया रंगाचे ठिपके. खाली पडलेले लांब केसाळ कान व झुपकेदार शपूट. ती शेपूट कापतील असं मला सारखं वाटायचं. कारण कुत्राची शेपूट कापण्याची फॅशन आहे. आमच्या बिल्डींग मधील एकजात कुत्रांच्या शेपटया कापल्या. लहान असताना कापली तर फारसा त्रास होत नसेल. पण मोठमोठया कुत्र्यांच्या शेपटया कापणारे तज्ञ डॉक्टर्स आहेत.
त्याला बाहेर काढल्यावर रस्त्यावरचे कुत्रे ओरडायचे. त्याच्या मागे लागायचे. त्याच्या मालकाच्या हातात वेताची छडी असायची. तिने तो सपासप फटके मारायचा. इतर कुत्रे कधीच त्याच्या जवळ जाऊ शकले नाहीत. भांडण्यासाठी किंवा मैत्री करण्यासाठी. काही दिवसानी गल्लीतल्या कुत्र्यांनाही त्याची सवय झाली. ते त्याकडे दुर्लक्ष करायला लागले. सुरवातीला तो इतर कुत्र्यांना प्रतिसाद द्यायचा. सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर याचची. कुत्रे भुंकायचे तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंई कुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो. त्याला काय पहिजे कुणास ठाऊक. विव्हळण्यावरुन तो मुका नाही एवढं तरी लक्षात येतं.
एकच प्रश्न मला नेहमी पडतो. घरी येणाऱ्या अनोळखी माणसांवर तरी हा भुंकतो का? मला माहीत नाही. कारण त्याचा मालक आणि मालकीण माझ्या ओळखीचे नाहीत त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलेलो नाही. कधीतरी एकदा ते पाच मजले चढून त्यांच्या फ्लॅटची बेल मारायचा विचार आहे.
जिथे माणसांना राहायला जागा नाहीत, तिथे दाटीवाटीने कुत्र्याला पाळणाऱ्या माणसांची मुंबई शहरात कमी नाही. तशीच रस्त्याच्या मोकाट बिनकामाच्या कुत्र्यांची. त्यातील पिसाळलेली किती आहेत माहीत नाही. पण सतत बाधूंन ठेवलेल्या न भुंकणाऱ्या कुत्र्यांना जर शहरात सोडून दिलं, तर तासा-दोन तासात ही कुत्री पिसाळल्याशिवाय राहणार नाहीत. पिसाळलेला कुत्रा भुंकत नाही तो एकदम लचकाच तोडतो.
त्यामुळे बेल मारावी की मारु नये या विचारात मी थांबलो आहे.
————————————————————————–
— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : 19 मे 1994
Leave a Reply