आला वसंत बहरोनि वनीं, कोकील गायीं आम्रावरी ।
बहावा लाल, धुन्द केशरी डुले, गुल-मोहर वार्यावरी ।।
तैसा स्नेह बन्धनांतुनि दरवळे, गंध आप्तांचिया अंतरी ।
मोदे प्रसन्नचित्त आप्त गणहे, स्वागतां उभे द्वारावरी ।।
कुर्यात् सदा मंगलम ।।१।।
वसुधा सुन्दरी अधीर मीलना, गगनासि क्षितिजावरी ।
सरिता चपळ रूपवती निघे, मीलनोत्सुक दर्याप्रती ।।
देखोनि शशिकान्त, नभीं फुले, स्वप्न सुन्दरी ती चंद्रिका ।
निरखोनि मंडपी अभिषेक मनींचा, खुलली मनीं संपदा ।।
कुर्यात् सदा मंगलम ।।२।।
झाले आज शुभ मंगल द्वयींचे, सूर वाद्यांतुनि रंगले ।
होती धन्य गुलाब पुष्प माला, अर्पुनि अपुले गंध हे ।।
मधुर हे मनो मीलन तयांचे, गंध प्रीतिचा दरवळे ।
अयु: आरोग्य उदंड लाभो, वैभवे फुलोत आगळे ।।कुर्यात् सदा मंगलम ।।३।।
झाले धन्य कुटुंब द्वय हे, गाडगीळ नि काटदरे ।
संतोषिले आप्त स्वकीय अवघे, पाहुनि सुरम्य सोहळे ।।
अशिर्वच उदंड पाठीं अमुचे, अभिषेक संपदा लाभले ।
गुरुदास हार्षित होऊनि वदे,
कुर्यात् सदा मंगलम् ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
२७ मे २०१०
काटदरे मंगल कार्यालय, बदलापूर
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply