एका मोठ्या शहरात नामवंत साधूचं व्याख्यान एका संस्थेनं आयोजित केलं होतं. हजारोंच्या संख्येने त्यांचे भक्तगण व्याख्यान ऐकायला जमले होते. साधूने ‘संपर्क आणि सहवास’ या विषयावर बोलून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
व्याख्यान संपलं. प्रेक्षकांतील एक पत्रकार साधूला भेटायला आला. त्याने त्यांच्या चरणांवर डोके ठेवून एक प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली. साधूने होकार दिला. त्याने विचारलं, ‘साधू महाराज, आता आपण संपर्क आणि सहवास या विषयावर बोललात, खरं तर हे दोन्ही शब्द गोंधळात टाकणारे आहेत, यात ‘फरक’ तो काय?’
साधूने ओळखलं की, याला व्याख्यान काही समजलेलं नाहीये. त्यांनी त्यालाच उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली.
‘तुम्ही याच शहरातील रहिवासी का?’ पत्रकाराने होकार दिला. पुढचा प्रश्न होता, ‘घरी कोण कोण असतं?’ त्यावर पत्रकाराचं उत्तर होतं, ‘माझी आई आता नाहीये, वडील व दोघे भाऊ आणि एक बहीण.’सगळ्यांची लग्नं झालेली आहेत. प्रत्येकजण स्वतंत्र राहतो आहे.’
साधूचा पुढचा प्रश्न होता, ‘तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलता का? शेवटी कधी बोलला होता?’ पत्रकाराला आता राग येऊ लागला तो म्हणाला, ‘एक महिना झाला असेल, त्यांच्याशी बोलून.’
‘तुमच्या बहीण-भावांना तुम्ही नेहमी भेटता का?’ पत्रकार आता खजील झाला होता. त्याच्या मूक रहाण्यातूनच साधूला उत्तर मिळाले. साधूने विचारले, ‘तुम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून कधी भेटला होता?’ त्याला उत्तर आले, ‘गेल्या दिवाळीत आम्ही एकत्र आलो होतो.’ आता पत्रकारांचा स्वर हळवा झाला होता, ‘आम्ही तीन दिवस आनंदात एकत्र घालवले.’
साधूने विचारले, ‘त्या तीन दिवसांत तुम्ही वडिलांसोबत किती वेळ घालवला? त्यांच्याबरोबर किती वेळा नाष्टा, जेवण, गप्पा मारल्या? आई गेल्यानंतर त्यांच्या मनःस्थितीचा कधी विचार केला?’ साधूने त्या कंठ दाटून आलेल्या पत्रकाराला जवळ घेतले आणि म्हणाले, ‘बाळा, तू नाराज मुळीच होऊ नकोस आणि लाजिरवाणे देखील वाटून घेऊ नकोस. तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तूच आता दिलेलं आहेस.’
‘संपर्क’ आणि ‘सहवास’ मध्ये हाच तर फरक आहे. तू आता तुझ्या वडिलांच्या संपर्कात आहेस, मात्र सहवासात नाहीस.
वडिलांशी फोनवर बोलून, पत्रव्यवहार साधून तू संपर्कात राहशील. परंतु तू त्यांच्या जवळ गेल्याशिवाय तुला त्यांचा सहवास लाभणार नाही. कारण सहवास एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी असतो. एकत्र बसणं, जेवण करणं, आपुलकीनं हातात हात घेणं, काळजी घेणं, डोळ्यांची भाषा समजून घेऊन तसा प्रतिसाद देणं याला ‘सहवास’ म्हणतात.
तुम्ही, तुमची भावंडं, वडील सर्व जण एकमेकांच्या संपर्कात आहात, मात्र आपसात कोणीही एकमेकांच्या सहवासात नाही.’
पत्रकारांचे डोळे भरुन आले. साधूकडून एक चांगला बोध घेतल्याचा त्याला आनंद झाला होता..
आज आपल्या भोवतीही असंच दिसतं आहे. आपण आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात आहोत, मात्र सहवासात नाही.कधी मनसोक्त बोलणं नाही, चर्चा नाही. आपण सारेच ‘स्वमग्न’ झालो आहोत. फक्त स्वतःचाच विचार! आपण बदलत चाललो आहोत. आपल्यावर गुरुजनांनी, आई-वडिलांनी केलेले संस्कार विसरत चाललो आहोत. दाहक असलं तरी हे ‘सत्य’ हेच आहे. त्यावर उपाय एकच आहे. एकमेकांशी प्रत्यक्ष समोरासमोर सुसंवाद वाढवा, एकमेकांना जाणून घ्या. फोनवरून, व्हाॅटसअपवरुन, ई-मेल सारख्या इलेक्ट्रॉनिक संपर्कापेक्षा, ईमोजी वापरुन भावना व्यक्त करण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलून मन मोकळं करा.पहा जीवन किती आनंदी आहे.
या कथेतील साधू होते, स्वामी विवेकानंद!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३१-३-२१.
Leave a Reply