प्राचीन काळची ही कथा आहे. एका नगरात रामरतन नावाचा एक धनाढ्य व्यापारी राहात होता. व्यापारधंद्यात त्याने इतकी संपत्ती मिळवली होती की, त्या नगरीच्या राज्याच्या खजिन्यातदेखील इतकी संपत्ती नसावी. एकदा रामरतनला वाटले की, राजाला आपली संपत्ती दाखवावी व त्याची मर्जी प्राप्त करून घ्यावी म्हणून त्याने राजाला बोलावण्याचा निर्णय घेतला.
रामरतनला एकूण तीन मुले होती. त्यापैकी धाकट्या मुलाने मात्र याला विरोध केला. कारण तो हुशार होता. रामरतनला तो म्हणाला राजाला बोलावून तुम्ही आपल्या घरावर संकट ओढवून घेत आहात. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत रामरतनने राजाला एके दिवशी घरी बोलावले. राजा आल्यावर त्याला आपली सर्व संपत्ती दाखवली. तळघरात ठेवलेले सोने-चांदी, हिरे, पावू माणके व अगणित सोन्या-चांदीची नाणी पाहून राजाचेही डोळे दीपले. मात्र एवढी संपत्ती आपल्या खजिन्यात आली तर फार चांगले होईल असाही त्याच्या मनात विचार आला.
राजवाड्यात परतल्यानंतर त्याने प्रधानाशी चर्चा केली. प्रधान म्हणाला, रामरतनची संपत्ती तुमची होऊ शकते. तुम्ही त्याला राजवाड्यात बोलावून असा एक प्रश्र विचारा की, त्याचे उत्तर त्याला देता येणार नाही व ‘ज्याच्याकडे धन आहे, परंतु बुद्धी नाही, तो धन बाळगायला लायक नाही’ असे सांगून त्याची सर्व संपत्ती तुम्ही जप्त करू शकता.
त्याप्रमाणे राजाने रामरतनला बोलावून प्रधानाने पढविल्याप्रमाणे सांगितले व ‘सतत काय वाढत जाते व काय कमी होत जाते’, या प्रश्राचे उत्तर तू एका दिवसात दिले नाही तर छी सर्व संपत्ती सरकारी खजिन्यात जमा होईल, असे सांगितले. राजाची ती अट ऐकून रामरतन बेशुद्ध होण्याच्याच मार्गावर होता. परंतु कसाबसा स्वताला सावरत घरी आला व त्याने घरातील सर्वांना राजाची ही अट सांगितली. त्यामुळे घरातील सर्वजण काळजीत पडले. धाकट्या मुलाने मात्र रामरतनला धीर दिला व त्याने रामरतनच्या कानात या प्रश्राचे उत्तर सांगितले.
दुसऱ्या दिवशी रामरतन आनंदाने राजाकडे गेला व आदल्या दिवशी त्याने विचारलेल्या प्रश्राला उत्तर देताना म्हणाला, तृष्णा (वासना) ही अशी एकच गोष्ट आहे जी सतत वाढत जाते व माणसाचे आयुष्य सतत कमी होत जाते. त्याचे उत्तर ऐकून राजाही खूष झाला व त्याने रामरतनला संपत्ती तुझीच आहे, तूच त्याचा चांगला वापर कर, असे सांगून परत पाठविले.
रामरतनने घरी आल्यावर धाकट्या मुलाचे कौतुक केले व त्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे विनियोग करण्याचे धाकट्या मुलालाच अधिकार दिले.
Leave a Reply