मालतीने त्या डब्यामधल्या नोटा आणि नाणी पुन्हा पु्न्हा मोजली.
बरोबर सत्तावन्न रूपये.
कमी नाही जास्त नाही.
तिने वाणी, भाजीवाली, शिंपी आणि कोणा कोणाबरोबर घासाघीस केली नव्हती ?
प्रत्येक ठिकाणी दोन आणे, चार आणे तरी वाचवायचा ती प्रयत्न करी.
मग वाचवलेली ती चवली किंवा पावली ती ह्या डब्यात ठेवून देई.
आतां दिवाळीचा पाडवा उद्यावर आला होता.
पुन्हा एकदा ते पैसे मोजून तिने डबा ठेवून दिला.
त्यावेळी करण्यासारखं दुसरं कांहीच नव्हतं.
म्हणून मालती काॅटवर लवंडली.
असं पडून राहिलं आणि आपल्या परिस्थितीवर नजर टाकली की उसासे टाकणे, मुसमुसणे, हुंदके देणे हे अपरिहार्य असतं.
ह्या पहिल्या अवस्थेतून बाहेर पडून त्या घराच्या स्वामिनीने घरावर एक नजर टाकली.
३० रूपये भाड्याची ती खोली.
ते भिकाऱ्याचं खोपटं नसत म्हणतां आलं पण त्याची एकंदर अवस्था अशा विशेषणाला योग्य होती.
दरवाजावर एक घंटा वाजवायचे जुने बटन दिसत होते पण ते चालत नव्हते.
खोलीचं बांधकाम कुठल्या राजाच्या राजवटीत झालं माहित नाही पण त्यानंतर दरवाजा कधी रंगवला नव्हता व आतांचा रंग नेमका कोणता, हे सांगता येत नव्हते.
दारावर पाटी मात्र होती.
“श्रीयुत माधव शांताराम”
माधव शांतारामला पूर्वी महिन्याला १८० रूपये मिळत तेव्हा आपली आर्थिक आघाडी ठीक आहे असे दोघांनाही वाटत असे.
त्याऐवजी पगारकपातीमुळे महिना रूपये १२० मिळू लागल्याने आपण गरीबच आहोत व ही पाटी बदलली पाहिजे असेही त्यांना वाटे.
मात्र जेव्हां माधव घरी परत येई, तेव्हा दारांत उभी असलेली मालती इतक्या आनंदाने आणि प्रेमाने हंसून त्याचे जे जंगी स्वागत करत असे त्याला तोड नव्हती.
मालती उठली.
तिने डोळे पुसले.
लांकडी पेटीतली जुनीच पावडरची डबी काढून तोंडावरून पावडरचा हलका हात फिरवला.
ती खिडकीशी उभी राहिली.
मागच्या कंपाउंडच्या काळपट भिंतीवरून जाणारं काळं मांजर तिने काळ्या मैदानाकडे जाताना पाहिले.
उद्या दिवाळीचा पाडवा.
आपण माधवला कांही तरी भेट द्यावी असं तिला मनोमन वाटतं होतं.
तिने खूप बचत केली होती.
पण आता ती मोजून फक्त सत्तावन्न रूपयेच होती.
माधवच्या १२० रूपये पगारांत बचत करणं कठीणच होतं.
खर्च बरेच होते.
तिने त्याला कांहीतरी भेट देण्याचा बेत मनाशी अनेकदा केला होता.
अशी भेट जी उमद्या, देखण्या आणि हंसतमुख माधवला शोभून दिसली असती.
अगदी वेगळीच.
खोलीच्या दोन खिडक्यांच्या मधे जुना मोठ्या चौकटीचा आरसा होता.
अशा जुन्या आरशात आपलं प्रतिबिंब पहाणं हे एक कौशल्यच होतं.
बारीक आणि चपळ व्यक्तीच त्या अारशांत भासणाऱ्या उभ्या रेघांतून आपलं एकसंध रूप पाहू शके.
सडपातळ मालतीने ही कला मेहनतीने साध्य केली होती.
अचानक ती खिडकीकडून वळली आणि आरशासमोर उभी राहिली.
तिचे डोळे चमकत होते पण चेहरा म्लान झाला होता.
तिने आपले लांबसडक केस पूर्णपणे मोकळे सोडले.
त्या कुटंबाकडच्या दोन गोष्टींचा त्या दोघांना खूप अभिमान वाटत असे.
एक म्हणजे माधवकडचं खिशांत ठेवायचं घड्याळ.
ते त्याच्या आजोबांच होतं आणि वडिलांकडून त्याच्याकडे आलं होतं.
दुसरी गोष्ट म्हणजे मालतीचे लांबसडक घनदाट केस.
इंद्राच्या दरबारांतल्या मेनका, रंभा, आदी अप्सरांनाही तिच्या केशसंभाराचा हेवा वाटला असता तर माधवला आपल्या घड्याळापुढे त्रावणकोरच्या राजाचा खजिनाही फिका वाटत असे.
राजाचा खजिना आणि घड्याळ ह्यांत त्याने घड्याळाचीच निवड केली असती.
मालतीने आपले केस लांब सोडले तसे ते तिच्या गुडघ्यांच्याही खाली पोहोचले.
त्यावर एक चमक होती.
एखादा लांब कोटच तिने घातलाय असंच वाटले.
मग तिने विमनस्कपणे ते पटकन् गुंडाळून बांधून टाकले.
तिची नजर खाली जमिनीवर गेली तेव्हां तिला स्वतःचेच दोन अश्रू पडलेले दिसले.
तिने साडी नीटनेटकी केली आणि ती बाहेर जायला निघाली.
जुना एकुलता एक चप्पल जोड पायांमधे सरकवला आणि दरवाजाला नीट कुलुप लावून ती बाहेर पडली.
ती मुख्य रस्त्यावरील बाजारात आली आणि ललना केश भांडार समोर येऊन थांबली.
स्त्रियांना केशभूषा करायला लागणाऱ्या साऱ्या वस्तूंसाठी बहुसंख्य स्त्रिया तिथेच येत असत.
ते दुकान स्त्रियांसाठी वेगवेगळी गंगावनेही विकत असे.
दुकानावर एक पन्नाशीची निर्विकार चेहऱ्याची स्त्री बसली होती.
मालतीला थोडी धांप लागली होती.
श्वास सांवरत तिने विचारलं, “तुम्ही माझे केस विकत घ्याल ?”
दुकानावरील बाई म्हणाली, “आम्ही केस विकत घेतो. तुमचे केस सोडून दाखवा.”
मालतीने पिना काढल्या व आपले केस मोकळे सोडले.
ती बाई तो केशसंभार हातात उचलून घेत म्हणाली, “पांचशे रूपये मिळतील याचे.”
मालती म्हणाली, “द्या मला लवकर.”
पुढचे दोन तास आनंदाच्या भरांत मालती जणू हवेत तरंगत चालत होती.
ती माधवसाठी योग्य भेट शोधायला बाजारपेठेतील मोठी मोठी दुकानं धुंडाळत होती.
बराचसा शोध दुकानांच्या बाहेरून कांचेआड ठेवलेल्या वस्तू न्याहाळूनच चालला होता.
तिला शेवटी एक अशी वस्तू दिसली की जी अगदी माधवसाठीच बनवलेली असावी.
त्याच्या तोडीचं दुसरं कांही कुठल्याच दुकानांत तिला दिसलं नव्हतं.
ती एक प्लॅटिनमची घड्याळासाठीच बनवलेली सुंदर सांखळी होती.
ती पाहताच ती नुसती किंमतीनेच नव्हे तर गुणांनीही मौल्यवान असावी हे कळत होते.
तिने मनाशी ठरवले, ही माधवसाठी बनवली आहे.
त्याच्यासारखीच शांत आणि मौल्यवान.
त्या चेनचे दुकानदाराने पांचशे पंचवीस रूपये घेतले.
बाकीचे बत्तीस रूपये पर्समधेच ठेऊन ती घरी परतली.
ती चेन घड्याळाला लावल्यावर माधव अभिमानाने ते घड्याळ खिशातून बाहेर काढून चार चौघांसमोर वारंवार वेळ पाहू शकला असता.
आतापर्यंत सांखळी नसल्याने वेळ बघायला ते राजेशाही घड्याळ खिशातून काढून तो हळूच चोरून पहात असे.
सांखळी नसल्याने त्याने चामड्याचा पट्टा त्या घड्याळाला लावला होता.
मालती घरी येईपर्यत हवेतून जमीनीवर आली.
तिने घरी येताच प्रथम काय केलं असेल तर आपल्या डोक्यावर राहीलेल्या केसांच्या खुंटाना कुरळे करायचा प्रयत्न केला.
औदार्य आणि प्रेम ह्या दोन्हीच्या आवेगांत केसांवर जो अत्त्याचार केला होता, तो ती सांवरून घेऊ पहात होती.
पण मित्रहो, हे असं काम कठीणच असतं.
नेहमीच खूप कठीण असतं.
चाळीस मिनिटात तिचं डोकं अगदी छोट्या कुरळ्या केसांनी झांकलेलं वाटू लागलं व ती एखाद्या द्वाड शाळकरी मुलासारखी दिसू लागली.
तिने आरशात स्वत:च्या प्रतिबिंबाकडे बराच वेळ काळजीपूर्वक नीट न्याहाळलं.
ती मनाशी म्हणाली, “माधवने मला पहातांच रागाने मारून टाकलं नाही तर तो दुसऱ्यांदा पाहून म्हणेल की मी नाच्यासारखी दिसत्येय.
पण मी तरी काय करू ?
सत्तावन्न रूपयांत काय येणार होतं ?
संध्याकाळी सातला गरमागरम थालीपीठ आणि चहा यांनी माधवचं स्वागत करायची तिने तयारी केली.
शिवाय चिवडा केलेला होताच.
माधव नेहमी वेळेवर घरी येई.
चमकदार घड्याळाची सांखळी हातात घेऊन ती दरवाजापाशी असलेल्या एका स्टूलावर बसली.
तिला जिन्यावर पावलांचा आवाज आला.
क्षणभर आपल्या अशा दिसण्यावर माधवची प्रतिक्रिया वाईट तर नाही ना होणार, ह्या विचाराने ती स्वतःशी दचकली.
तिने मनांत देवाचा धांवा केला, “देवा, मी आता जशी आहे, तशीही त्याला सुंदर वाटू दे.”
माधव आत आला आणि त्याने दरवाजा बंद केला.
तो थोडा थकलेला आणि गंभीर वाटत होता.
बिच्चारा माधव.
फक्त तेवीस वर्षाचा आणि एवढ्यांतच घराचा भार सांभाळत होता.
त्याला नवे जोडे, नवा कोटही छान दिसला असता.
माधव दरवाजाशीच उभा राहिला.
वारा जेव्हा पूर्ण पडतो तेव्हा एखाद्या सुंदर वृक्षाचं पानही न हलतां तो जसा निश्चल असतो, तसा तो निश्चल उभा होता.
त्याचे डोळे मालतीवर खिळलेले होते पण त्यांत नक्की कोणता भाव होता, हे मालतीला आज कळेना आणि ती घाबरली.
तो राग नव्हता, आश्चर्य नव्हतं, नकार नव्हता, भय नव्हतं, तीने मनाशी विचार केलेली कुठलीही प्रतिक्रिया त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.
तो वेगळ्याचं नजरेने तिच्याकडे एक टक पहात होता.
मालती झटकन् स्टूलावरून उठून पुढे झाली आणि त्याच्याजवळ गेली.
ती उद्गारली, “माधव, असा नको ना पाहूस माझ्याकडे.
ह्या दिवाळीत तुला छानशी भेट दिल्याशिवाय मला चैन पडली नसती.
माझे केस काय परत वाढतील.
तू समजून घेशील ना!सांग ना! माधव !”
त्याचा हात हातात घेत ती म्हणाली, “माझे केस खूपच भराभर वाढतात.
मला हे करणं आवश्यक होतं.
ही दिवाळी आपल्याला आनंदाची जावो. बोल ना !
तुला ठाऊक नाही मी तुझ्यासाठी किती छान आणि मौल्यवान भेट आणली आहे !”
माधवने मोठ्या कष्टाने शब्द उच्चारले, “तू तुझे केस कापलेस ?”
जणू कांही अजून ते सत्त्य त्याच्या जाणीवेपर्यंत पोहोचलंच नव्हतं.
मालती म्हणाली, “केस कापले आणि विकले.
तरी मी केसांविना तुला तितकीच प्रिय वाटत नाही काय ?”
माधवने खोलीवरून एक भकास नजर फिरवली आणि तो वेड्यागत परत तेंच म्हणाला,
“तू म्हणत्येयस, तुझे केस गेले ?”
मालती प्रेमाने त्याला म्हणाली, “माधव, खोलीत इकडे तिकडे पाहू नकोस, मी केस विकले.
आज दिवाळी आहे. माझ्यावर रागावू नकोस. मी तुझ्यासाठीच ते विकले. ते जायचेच होते असतील पण कोणी माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाची खोली समजू शकणार नाही.
मी तुझ्या आवडीची थालीपीठं केली आहेत. चिवडाही आहे. चल.”
माधव आपल्या तंद्रीतून जागा झाला.
त्याने मालतीला कवेत घेतले व म्हणाला, “मालू, माझे तुझ्यावरचे प्रेम इतके तकलादू आहे कां ?
ते केसांमुळे, शांपूमुळे किंवा एवढ्या तेवढ्याने कमी होईल का ?
माझी मालती मला त्यामुळे कमी सुंदर दिसेल कां ?
मुळीच नाही.”
खिशातून भेटवस्तूसारखी बांधलेली एक पेटी बाहेर काढून टेबलावर ठेवत तो पुढे म्हणाला,
“हे उघडून बघ. म्हणजे तुला कळेल की तू प्रथम मला कसला धक्का दिलास ते !”
मालतीने ती भेट नाजूक, थरथरत्या हातांनी दोरा सोडवून आणि कागद फाडून उघडली.
ती भेट पहातांच अत्यानंदाने तिच्या तोंडून आनंदाचा चित्कार उमटला पण क्षणभरच !
मग वास्तव लक्षांत आले आणि स्त्रियांच्या स्वभावाप्रमाणे तिच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या व ती मुसमुसू लागली. माधवला तिची समजूत काढावी लागली.
त्या पेटीत कासवाच्या पाठीपासून बनवलेले व त्याला जडावकाम केलेले केसांना लावायचे अतिशय सुंदर आणि चमकदार कंगवे व चाप यांचा सेट होता, जे तिच्या विकलेल्या केसांत अत्यंत खुलून दिसले असते.
तिला माहित होतं की ते फार महागडे होते.
तिने ते एका मोठ्या दुकानाच्या कांचेआड पाहिले होते व अनेकदां तिला मनापासून ते हवेसे वाटले होते.
तेव्हां तिला माहित होतं की ते आपल्याला परवडणार नाहीत.
आता ते तिचे झाले होते पण जो केशसंभार त्यांनी सुशोभित व्हायचा होता तोच गेला होता.
तिने ती भेट छातीशी धरली आणि माधवकडे पाहून हंसत म्हणाली, “माधव, मला भेट खूप आवडली. माझे केस खूप भराभर वाढतात. मग वापरेन मी. अरे ! पण मी तुझ्यासाठी आणलेली भेट तू पाहिली नाहीस अजून.”
बोलतां बोलतां तिने उत्सुकतेने हातातली सांखळी आपल्या उघड्या तळहातावर माधवच्या नजरेसमोर धरली. तो चमकणारा प्लॅटीनमचा निर्जीव धातू जणू तिच्या भाबड्या पण उत्साही भावनांचं प्रतिबिंब दाखवत होता.
ती म्हणाली, “किती छान आहे ना ! आता तू दिवसांतून शंभरदा घड्याळ अभिमानाने बाहेर काढून वेळ पाहू शकशील ! आण तुझं घड्याळ इकडे. मला पाहू दे. सांखळी लावल्यावर कसं दिसतं ते !”
घड्याळ बाहेर काढण्याऐवजी हात मानेमागे धरून माधव कॉटवर बसला आणि हंसला.
तो म्हणाला, “मालती, आपण दोघेही ह्या दिवाळीच्या भेटी कांही काळ दूर ठेवूया.
ह्या वस्तू इतक्या सुंदर आहेत की त्या ताबडतोब वापरणं बरोबर नाही. पुढे कधीतरी वापरू.
तुला दिलेली भेट घेण्यासाठी मी माझे घड्याळ विकले आहे.
मला वाटते आपण आतां तुझ्या हातची चविष्ट थालीपीठं खाण्यावरच लक्ष केंद्रीत करूया.”
शहाणी चतुर माणसं भेटी कुशलतेने निवडतात.
घरी पसंत न पडल्यास किंवा त्याच वस्तु दोन दोन आल्यास दुकानदारांशी बदली करण्याचीही बोली करून येतात.
आणि मी तुम्हांला एका खोलीत संसार करणाऱ्या दोन भाबड्या पोरकट मुलांची गोष्ट सांगतोय, ज्यांनी अत्यंत मूर्खपणे आपल्याकडल्या सर्वोत्तम गोष्टी दुसऱ्याला भेट देण्यासाठी घालवल्या.
पण मी हेही सांगतो की जगांतील भेटी देणाऱ्या सर्व लोकांत ही दोघं सर्वांत शहाणी होती कारण त्या समृध्द प्रेमाच्या अनमोल भेटी होत्या.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – द गिफ्ट ऑफ मॅगी
मूळ लेखक – ओ हेनरी (१८६२- १९१०)
तळटीपः ह्या कथेवर १८ चित्रपट झाले. शिवाय लहान पडद्यावर अनेक कथा, मालिकांत ही गोष्ट घेण्यांत आली. शाळा/महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांत आली. कथा इतकी लोकप्रिय आहे की ती छोट्या रूपात लेखकाचे नाव न देता सामाजिक माध्यमांवरही फिरते. खूप लोकप्रिय हळवी कथा.
Leave a Reply