जहाजावर असताना बऱ्याच वेळा पाऊस पडताना न दिसता कधी धावत पळत जाताना तर कधी मस्तपैकी रमतगमत चालत जाताना दिसतो. जेव्हा सोसाट्याचा वारा असतो तेव्हा धावतपळत तर जेव्हा मंद वारा असतो तेव्हा रमतगमत चालताना दिसतो. कधी कधी एका दिशेकडील क्षितिज काळे कुट्ट होते तर कधी दोन किंवा तीन आणि कधी कधी तर चहुबाजूचे क्षितिज अंधारून जाते. एका बाजूला गडद काळोख तर एका बाजूला लख्ख सूर्यप्रकाश. कधी कधी तर काही ढगांच्या आडून डोकावणारा सूर्य त्याच्या सोनेरी किरणांची उधळण पाण्यावर करताना दिसतो. अंधारलेल्या अवस्थेत मध्येच पाण्यावर तरंगणारा सोनेरी किरणांचा खेळ बघता बघता डोळ्यात आनंद मावेनासा होतो. हवामान खराब झाले तर अंधार काय आणि सोनेरी किरणं काय जीव मुठीत धरून पावसाचे आक्राळविक्राळ रूप पण बघायला मिळतं. जहाज जोरात हलायला लागत, वाऱ्याचा घोंगावणारा आवाज आणि विजांचा कडकडाट कानांवर पडला की छाती धडधडायला लागते. सुं सुं करत घोंगावणारा वारा पावसाच्या थेंबांना लहान लहान तुषारांमध्ये परावर्तित करून समोर धुक्यासारखी गडद चादर पांघरतो. 10 मीटरच काय पण एक मीटरची सुद्धा व्हिझिबिलिटी राहत नाही. त्यात आमचे जहाज 150 ते 200 मिटर लांब मग व्हिझिबिलिटी 10 मीटर असो की 100 मीटर रात्री अमावसेच्या अंधारात हेड लाईट नसताना गाडी चालवल्यासारखं वाटतं. खोल समुद्रात असताना अशा वेळेला भीती नसते पण किनाऱ्याजवळ असलो की सगळ्यांची हवा टाईट असते. वादल वार सुटलं गो वाऱ्यानं तुफान उठलं गो हे गाणं ऐकायलाच बरं वाटतं जहाजावर अनुभवायला नाही. भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात कंपनीने जहाजाला पाण्यात लोटलं गो असं म्हणायची वेळ येते. तस पाहिले तर मला सुरवातीला 40 हजार टन कॅपॅसिटी असलेली जहाजे मिळाली त्यावर असे अनुभव बऱ्याच वेळा मिळाले पण नंतर नंतर सगळी मोठं मोठी एक लाख टना पेक्षा कॅपॅसिटी असलेली जहाजे मिळायला लागल्यावर वादल वारा सुटल्याची भीती आणि त्रास कमी होत गेला. कधी जहाजाच्या फॉरवर्ड म्हणजेच समोरून येणारा पाऊस जहाजाला धडकून आणि ओलचिंम्ब करून आफ्ट म्हणजे मागे पळत जाताना दिसतो. कधी कधी आफ्ट वरून येताना दिसतो मग वाऱ्याचा वेग कमी असला तर मागेच पडत पडत पाऊस खोळंबल्यासारखा वाटतो पण जर वाऱ्याचा वेग जास्त असला तर मागून येऊन ओव्हरटेक करताना जहाजाला ओलेचिंब करून पुढे पुढे वेगाने पळत जाताना दिसतो. कधी कधी काही मिनिटे तर कधीकधी तासनतास पावसाचा खेळ बघायला मिळतो. मंद वारा असताना पाऊस आला की समुद्रात अक्षरशः पाऊस रमतगमत चालतोय की काय असा भास होतो. रिमझिम करत पडणारा पाऊस जहाजासोबत वेगाची स्पर्धा न करता हातात हात घालून पुढे येतोय असे वाटते. भर दुपारी अचानक पाऊस आला की स्टीम पाईप आणि जहाजा च्या तापलेल्या लोखंडावर पडून एक छानसा अनामिक सुगंध दरवळतो. तापलेल्या मातीवर पहिल्या पावसाचा मृदगंध पावसाळ्यात सुरवातीलाच येतो पण जहाजावर असा सुगंध भर दुपारी पाऊस आल्यावर नेहमीच येतो. अतिवृष्टी झाली तर जमिनीवर पूर येतो घरं बुडतात तळी भरतात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागतात. अथांग समुद्रात तरंगणाऱ्या जहाजावर अतिवृष्टी होऊ दे नाही तर पुषवृष्टी होऊ दे दिवस रात्र चालू राहायलाच लागतं. जहाजावर पाऊस पडला म्हणून सुट्टी नाही मिळत आणि पावसात भिजलो म्हणून आजारी असल्याचे कारण नाही देता येत.
ऊन पावसाच्या खेळात सप्तरंगी इंद्रधनुष्य कितीतरी वेळा बघायला मिळाले. कधी जहाजाच्या पुढे तर कधी मागे समुद्राच्या पाण्यातून क्षितीजाच्या पडद्यावर दिसणारे इंद्रधनुष्य पाहिल्यावर निळे पाणी व आकाशाशिवाय समुद्रात इतर रंग अत्यंत मोहक वाटतात.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply