गुरुबंधू आणि भगिनी,
श्री गुरुदेव दत्त!
नमो नमः!!
आत्ता करोना व्हायरसमुळे आपण सर्व भयभीत झालोय. असा काळ सगळ्यांचा आयुष्यात येतो असा नाही. येथे मला थोरले स्वामी (टेंब्ये स्वामी) महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आठवतोय. स्वामींचे वास्तव्य ब्रह्मावर्तला होते त्या वेळी त्या गावात प्लेगची साथ आली होती,अनेक माणसे मृत्यूमुखी पडत होती, अनेक उपाय झाले पण कोणत्याच औषधाने गुण येत नव्हता त्यावेळी स्वामींनी सर्व गावकऱ्यांना दत्त महाराजांच्या चरणी अनन्य भावाने शरण जाण्यास सांगून कली युगात नामस्मरण श्रेष्ठ आहे हे सांगून सप्ताहाच्या सप्ताह सामूहिक नामस्मरण करून घेतले त्यावेळी त्यांना ” दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हे नामस्मरण दत्त कृपेने स्फुरले! त्याने त्या गावातील प्लेगची साथ संपूर्ण नायनाट झाली!
अर्थात सामूहिक अध्यात्मिक उपासनेने कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो! आत्ताच म्हणजे संध्याकाळी नेहमी प्रमाणे ७.२५ ला दिवे लावण्याचा वेळी आम्ही घरातील सगळे (सुट्टीच्या निमित्ताने) परवचा म्हणायला बसलो, किती तरी वर्षांनी असा योग जुळून आला. असो!
आम्ही लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत सगळी भावंडे जमायचो १५/२० मुले असायचो आमचे आजोबा संध्याकाळी सगळ्यांना दिवे लागणीच्या वेळी एकत्र बोलवायचे त्या वेळी आम्ही एका सुरात रामरक्षा म्हणायचो! आज दिवे लावताना त्या गोष्टींची आठवण झाली.
स्वामी कृपेने गेली २८ वर्षे त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणे माझ्याकडून घडत आहे ही त्यांचीच कृपा आहे! स्वामी महाराजांचे गुरू श्री नारायणानंदसरस्वती ! ते रामदासी होते.त्यामुळे स्वतः दत्त भक्त असून सुद्धा आपल्या आयुष्यात दरवर्षी दास नवमी साजरी करायचे!
ह्या आठवणीला धरून एक संकल्प करावासा वाटतो आपण सर्वांनी नक्की लहानपणी रामरक्षा म्हंटली आहे. आता अनायसी सुट्टी मिळाली आहे. दररोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी नेमाने देवापुढे दिवा लावून घरातील सर्वांनी एकत्र जमून “रामरक्षा” म्हणायला बसूया!
सद्गुरूंनाथ महाराजकी जय !
जय जय रघुवीर समर्थ !!
— पाध्येकाका
Leave a Reply