संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ…. यांचे ज्ञान होऊ लागते. एक एक शब्दाने तो आपल्या आजूबाजूचे जग ओळखू लागतो. मानवी स्नेहसंबंधातील सर्वात महत्वाची साखळी म्हणजे संवाद. आपली इच्छा, आकांक्षा, विचार, भावना, गरजा, आपली मतं आपण इतरांशी संवाद साधून व्यक्त करत असतो. तुम्ही मुक लोकांना पहिलं असेल ते सुद्धा वाणी शिवाय ही संवाद साधून आपली भावना व्यक्त करतात. हातवारे, इशाऱ्यांनी ते आपले विचार दुसऱ्या पर्यन्त पोचवण्याचा प्रयत्न करतात. मानवी स्नेहसंबंध जोपासायला सर्वात महत्वाचं ब्रह्मास्त्र म्हणजे ‘संवाद’.
आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्यातील सुसंवाद कमी होत चालला आहे. किंवा संवाद करायला वेळ असला तरी तो वेळ टीव्हीचं चॅनल बदलण्यात किंवा मोबाइलवर इतर लोकांसोबत बोलण्यात जातो. घरातील मंडळी मात्र आपल्याशी बोलण्यासाठी उपेक्षितच राहतात आणि असं वारंवार घडायला लागलं तर, त्यांनादेखील या सर्व गोष्टींची सवय होते. आणि हळूहळू ती नाती दुरावली जातात. अशी नाती आयुष्यात असून नसल्यासारखी प्रतीत होतात. ‘काही नाती तुटत नाहीत; ती संवाद नसल्यामुळे नकळत मिटून जातात, जसं बोटावर पंखांचा रंग ठेवून फुलपाखरं उडून जातात.’
खरंतर या आधुनिक युगात संवाद साधणं खूप सोपं आहे. पण संवाद हा दूर असलेल्या लोकांशी सोपा आणि जवळ असलेल्यांशी कठीण होत चालला आहे. मोबाइलच्या माध्यमाने विडियो कॉल किंवा मेसेज द्वारे आपण आपल्या भावना पोहोचवतो. नवीन नाती जोडली जातात पण तेच नातं जेव्हा नकोसं होतं तेव्हा संवाद बंद ही केला जातो. एखाद्या व्यक्तिचा तिटकारा येऊ लागला की त्या व्यक्तीला ब्लॉक केलं जातं. म्हणजेच संवाद बंद केला जातो. व हळूहळू ते नातं आयुष्यातून नाहीसे केले जाते. संवाद साधण्यासाठी खूप वेळ हवा असं नाही पण त्या व्यक्तिशी बोलण्याची इच्छा हवी.
संवादाची गंमत अशी की नवदाम्पत्यांमध्ये अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये असतो तो सुखद सुसंवाद; मग हळूहळू एक अपत्य झाल्यावर जर समंजसपणा टिकला नाही, तर सुसंवादातील ‘सु’ निघून जातो, उरतो तो फक्त संवाद आणि काही वर्षांनी आयुष्यात तोचतोचपणा शिल्लक राहिल्याने अंती ‘सं’ ही निघून जातो. शेवटी उरतो तो फक्त वाद. पण काही जोडपी नात्यांतील ताजेपणा अगदी वृद्धापकाळापर्यन्त जपून ठेवत आयुष्य खऱ्या अर्थाने बहरत नेतात. मनमोकळे संवाद आपलं धकाधकीचं आयुष्य तणावरहित व सुरळीत करतात.
नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी व सुसंवाद साधण्यासाठी पहिले आपला स्वतःशी संवाद होणे आवश्यक आहे. आजच्या या स्पर्धात्मक युगात, धावपळीच्या आयुष्यात आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकत नाही. मनात सतत ताणतणावाचे विचार, आर्थिक समस्या, नैतिक जवाबदाऱ्या या सर्वांमुळे आपण मनाने थकलेले असतो. काहींच म्हणणं असतं की, “ आम्ही पहाटे घरातून बाहेर पडतो; परतेपर्यंत रात्र होते. त्यात दिवसभराची दगदग, प्रवास, कामाचं दडपण! घरी पोहोचल्यावर कधी एकदा झोपतोय, असं होतं. मग बोलायचा मुडच कुठे असतो.” पण खरं सांगा ज्या नात्यात प्रेम, जिव्हाळा व काळजी असते त्या नात्यासाठी आपण थोडा वेळ काढू शकत नाहीत का? एक एसएमएस सुद्धा समोरच्या व्यक्तीला ही जाणीव करून देतो की मला तुझी आठवण येते. दोन मिनिटे बोलल्याने समोरच्या व्यक्तीला आपलेपणाची भावना करून देतो. घरी आल्यावर सर्वांना फक्त विचारलं की ‘सर्व ठीक ना?’ यांनी सुद्धा नाती नेहमी ताजी राहतात.
जसं एखाद्या रोपट्याला पाणी दिल्याने ते टवटवीत राहते तसंच संवाद हे नात्याला टवटवीत ठेवणारं पाणी आहे. हे पाणी प्रत्येक नात्याला दया. तुम्हाला माहीत असेल काही झाडांना रोज पाणी दयावे लागते तर काहींना काही दिवसानंतर दिले तरी चालते. रोज पाणी दिले तर काही झाडे मरून जातात. आपल्या नात्यांचं ही असंच आहे. काही नात्यात रोज बोलणं आवश्यक असतं तर काही नात्यात कधीकधी बोललेलंच बरं असतं. रोज बोलल्याने ते नातं लवकर तुटण्याची संभावना असते. म्हणून आपल्या जीवनात कोणत्या नात्याला रोज व कोणत्या नात्याला कधीतरी संवादाचे पाणी दयावे ते आपण ठरवावे.
नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply