अलीकडच्या सोशल मिडीयाच्या आभासी जमान्यांत हे नेटवर्क खरंच नीट वर्क करत आहे का? असा नेहमी प्रश्न पडतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉटस् अॅप इत्यादींच्या माध्यमांतून आपण एकमेकांशी आणि एकाच वेळी अनेकांशी कनेक्टेड असतो खरे, पण परस्परांच्या दु:खात नाही तर सुखांत तरी आपण खरंच कनेक्ट होतो का? आपल्या व्यक्त होण्यांत काहीतरी कमी असल्याचं नाही का हो जाणवत? त्या कनेक्ट होण्यांत खरंच थेट संवादाचं सुख मिळतं का? ह्या माध्यमातून पुरावा निश्चितच मिळेल पण दुरावा वाढतोय यांत यत्किंचितही शंका नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या केवळ शारीरिक मूलभूत गरजा असतात, मात्र संवाद ही आपल्या अंतर्मनाची मूलभूत गरज असते.
“संवाद” म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं. अनेकदा समजून घेण्यापेक्षा समजून सांगण्यासाठी आपण उतावीळ असतो. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते, तशीच दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा आपल्या अंतर्मनाची गरज असते, हे समजून घेणं आवश्यक असतं.
ह्या विचारांच्या देवाणघेवाणीमुळे आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो, अर्थात वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते, सृजनशीलतेला नवे पैलू पडत जातात, ज्ञानात भर पडत जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि उणिवांचं स्वतःला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सद्रुढ रहातं, हे महत्वाचं आहे. संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक असतं आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज असते.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply