हृदय म्हणजे मानवी शरीरातील मांस-पेशीने बनलेले एक असे अंग आहे ज्याला मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कार्य करताना एका क्षणाचीही विश्रांती नसते. हृदयाचे कार्य थांबले म्हणजे मानवाचे आयुष्य संपते. म्हणूनच शरीरातील सर्व अवयवांचा विचार केला तर हृदयाला सर्वोच्च स्थान आहे. जी व्यक्ती स्वतःच्या जीवनावर मनोमन प्रेम करते त्या व्यक्तीचा स्वस्थ जीवन जगण्यासाठी स्वतःच्या ह्रदयाशी संवाद असणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
हृदयाशी संवाद साधणे म्हणजे नेमके काय? हृदयाशी संवाद साधणे म्हणजे दोन गोष्टी तपासणे. एक तर तांत्रिकदृष्ट्या आपले हृदय आणि त्याचे कार्य उत्तम स्थिती मध्ये आहे का हे तपासणे. आणि दुसरे म्हणजे भावनिक तसेच मानसिक दृष्ट्या दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना त्या घडामोडींचा आपल्या मनावर म्हणजेच नकळत आपल्या हृदयावर आपण कितपत परिणाम करून घेतोत? तांत्रिक दृष्ट्या काम करताना एका मिनिटात हृदयाचे साधारणतः ७२ ठोके पडतात. पण व्यक्तीच्या प्रकृतीनुसार हे प्रमाण काहीसे बदलू देखील शकते. तसेच हृदयातील ४ कप्प्याद्वारे अशुद्ध रक्त घेऊन शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीराला केला जातो. हृदयाने हे काम अविरतपणे व्यवस्थित करावे म्हणून आपण खाण्या-पिण्याच्या काय सवयी बाळगतो, व्यायामाला महत्त्व देतो का, जमेल तसे योगा करतो का, शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळावा म्हणून आपण प्रदूषण मुक्त वातावरणात फिरतो का हे प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे. तसेच दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना आपण त्या गोष्टींचा हृदयावर किती ताण येऊ देतो यावर सुद्धा हृदयाचे स्वास्थ्य पूर्ण कार्य अवलंबून आहे.
आपण सतत ताण घेऊन जगत असतोल तर त्या परिस्थितीमध्ये एका मिनिटात हृदयाचे ठोके ७२ पेक्षाही खूप जास्त पडू शकतात ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. सतत एखाद्या दडपणाखाली किंवा भीती बाळगत जगण्याने सुद्धा हृदयावर ताण येऊ शकतो. कायम स्वरूपी अशा परिस्थिती मध्ये जगणे हृदयाला नक्कीच हानिकारक ठरू शकते. शरीराच्या इतर कोणत्याही अवयवापेक्षा हृदयाला झालेली तांत्रिक, मानसिक, भावनिक जखम ही जास्त त्रासदायक ठरू शकते. बरेच वेळेस या जखमेतून माणूस सावरतोच असे नाही. आपण जेव्हा जीवाला जपावे असे म्हणतोत त्याचा अदृश्य अर्थ हृदयाला जपावे असा असतो. हृदयाची ही जपणूक तांत्रिक, मानसिक आणि भावनिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून सारखीच महत्त्वाची आहे.
हृदयाचा आकार साधारणतः हाताच्या झाकलेल्या मुठी एवढाच असला तरीही संपूर्ण शरीराच्या शुद्ध रक्त प्रवाहाची जिम्मेदारी या छोट्या अवयवावर असते. तसेच अदृश्य रित्या या जगात वावरताना हृदय संपूर्ण जगाला स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता देखील बाळगते. जशी माणसाच्या जिवंत अथवा मृत शरीराची ओळख ही हृदयाच्या कार्यावरून होते तसेच माणसाचे व्यक्तिमत्व देखील हृदयाच्या अदृश्य मोठेपणावरच अवलंबून असते. त्यामुळे हृदयाशी होणारा अंतर्बाह्य संवाद शारीरिक स्वास्थ्य आणि माणसाचे व्यक्तिमत्व या दोन्ही गोष्टीवर परिणाम करणारा ठरतो.
हृदयाशी होणारा हा संवाद संपला की माणूस आणि माणुसकी दोन्हीही संपू लागतात.
लेखक : राहुल बोर्डे
सुंदर लेखन