काहीवेळा आपल्या आपापसातील संवादाची सुरुवातच विसंवादानं होत असल्याचं दिसून येतं. संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण असतं. अलीकडच्या काळांत विभक्त कुटुंब, कौटुंबिक कलह आणि निर्माण झालेले क्लेश, द्वेष ह्यामुळे बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, पती-पत्नी, पिता-पुत्र, सासू-सून यांच्यात संवाद असतोच असं नाही. रक्ताच्या नात्यांत देखील संवादाआभावी अनेक गैरसमज, समस्या निर्माण झाल्याचं दिसून येतं.
आपली सुख-दु:ख, भाव-भावना, विचार-आचार, ह्या बाबींची देवाणघेवाण करायला वावच नसतो, असं नाही. परंतू संवादाच्या माध्यमातून सुखाच्या यशोशिखरांवर पोहोचण्यासाठी आपापसातील संवादालाच बगल दिली जाते. परस्परांमधील नातेसंबंध, आपलेपणाची भावना, जिव्हाळा, प्रेमाचा ओलावा कसा आणि कोण टिकवणार? हाच कळीचा मुद्दा आहे. खरं तर संवादाला “सु” हे विशेषण लावून जगण्यापलीकडचं जीवन अधिकाधिक आनंदी करणं जरुरीचं असतं, हे प्रत्येकानं समजून घेण्याची गरज असते.
परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्याची त्यानी अनुभूती घेण्याची बाब असते. स्वतःच भावनिक, मानसिक, आंतरिक आणि शारीरिक पातळीवर प्रत्येक संवाद घडवून आणायचा असतो. ह्या सर्वच बाबींचं समीकरण कसं मांडायचं हे ज्याला माहिती होतं, त्याला संवादात पूर्णपणे सहभागी होऊन त्या संवादाचं सुख प्राप्त करून घेता येतं. संवादाचं सुख प्राप्त करण्यासाठी सकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहार अंगीकारण्याची गरज असते.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply